Navratri 2024: नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या विविध रूपांचे होणार दर्शन; घटस्थापनेपासून भाविकांची अलोट गर्दी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 03:48 PM2024-10-03T15:48:28+5:302024-10-03T15:50:02+5:30
Navratri 2024: यंदा कोल्हापूरची अंबाबाई दिसणार देवीच्याच सुंदर नऊ रूपांत; कधी कोणते रूप बघायला मिळणार ते जाणून घ्या.
कोल्हापूर : सिंहासनारूढ श्री अंबाबाई, गजेंद्रलक्ष्मी, चंद्रलांबा परमेश्वरी, महाप्रत्यांगीरा अशा दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शन करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या माध्यमातून लाखो भाविकांना होणार आहे. श्री अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या वतीने देवीच्या या रूपांची जय्यत पूर्वतयारी करण्यात आली आहे.
शारदीय नवरात्रोत्सवात रोज श्री अंबाबाईची दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांतील मनोहारी पूजा बांधली जाते. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात देवीची अशा पद्धतीने पूजा बांधली जात असणारे हे एकमेव मंदिर असावे. त्यामुळेच जगभरातील भाविक देवीच्या या रूपांचे दर्शन घेण्यासाठी आतुर असतात. दुपारच्या आरतीनंतर ही पूजा बांधली जाते.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
मंदिरात रोज सकाळी सहा ते सात या वेळेत संगीता रेवणकर यांचे ललितसहस्रनाम तसेच सकाळी सात ते आठ या वेळेत जगदीश गुळवणी यांचे श्रीसूक्त पठण होणार आहे. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेपर्यंत कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांतील भजनी मंडळे, सांस्कृतिक संस्थांच्या वतीने कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे.
नवरात्रोत्सवात अंबाबाईची विविध रूपे अशी
गुरुवार (दि. ३) : सिंहासनारूढ अंबाबाई
शुक्रवार (दि. ४) : गजेंद्रलक्ष्मी
शनिवार (दि. ५) : चंद्रलांबा परमेश्वरी
रविवार (दि. ६) : गायत्री माता
सोमवार (दि. ७) : सरस्वतीदेवी
मंगळवार (दि. ८) : गजारूढ अंबारीतील पूजा
बुधवार (दि. ९) : महाप्रत्यांगीरा
गुरुवार (दि. १०) : दुर्गामाता
शुक्रवार (दि. ११) : महिषासुरमर्दिनी
शनिवार (दि. १२) : रथारूढ