Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 11:06 AM2024-10-01T11:06:41+5:302024-10-01T11:08:03+5:30

Navratri 2024: यंदा ३ ते १२ ऑक्टोबर आपण नवरात्री साजरी करणार आहोत, पण त्याआधी या उत्सवाचा खरा आणि उपासना जाणून घेऊया. 

Navratri 2024: Why Navratri only for nine days? Why do ghatasthapna? What is Navratri worship? Read on! | Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा!

Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा!

>> ज्योत्स्ना गाडगीळ-पंचमुखी 

२ ऑक्टोबर रोजी पितृपक्षाची (Pitru Paksha 2024) सांगता होऊन ३ ऑक्टोबर पासून नवरात्र (Navratri 2024) सुरु होत आहे. ठिकठिकाणी नवरात्रीचे मंडपही उभारले गेले आहेत. घराघरातून गृहिणींची आवराआवरीची लगबग सुरु आहे. तरुणांना गरब्याचे, दांडियाचे वेध लागले आहेत आणि ते कमी म्हणून की काय, तर नवरात्रीच्या नऊ रंगांच्या कपड्यांची जुळवाजुळव सुरु आहे. एकूणच सर्वत्र उत्सवाचे, जल्लोषाचे वातावरण आहे. अशातच देवीचे नवरात्र का साजरे करायचे, ते आधी जाणून घेऊ. 

पौराणिक पार्श्वभूमी :

देवीची नवरात्र आपण साजरी करतो. कारण शरद ऋतूमध्ये अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमी पर्यंत तिने महिषासुर नावाच्या राक्षसाशी घनघोर युद्ध केलं आणि त्याचा दारुण पराभव करून दहाव्या दिवशी विजयश्री मिळवली म्हणून विजयादशमी साजरी करतो. या विजयोत्सवाची आठवण म्हणून नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याचा दहावा दिवस आपण देवीची पूजा अर्चा करतो, जागरण करतो, दानधर्म करतो आणि उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी भोंडला,गरबा, दांडिया खेळत आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतो. 

Navratri 2024: ऐन नवरात्रीत गुरु वक्री; 'या' राशींची दसरा-दिवाळी दणक्यात होणार साजरी!

घटस्थापनेचा अर्थ : (Reason behind Ghata Sthapana 2024)

नवरात्रीत बसवले जाणारे घट हे पृथ्वीचे प्रतीक मानले जातात. त्यात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते. हा घट मातीवर ठेवून त्या मातीत नवधान्य पेरले जाते. नऊ दिवसांत सर्वात अधिक फोफावणारे धान्य पाहून शेतकरी राजाला कोणते पीक पुढील वर्षात जास्त येणार याचा अंदाज बांधता येतो. उपासनेचा भाग म्हणून या ऋतूमध्ये सर्वात जास्त उपलब्ध असणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या माळा रोज एक याप्रकारे नऊ दिवस घाटावर बांधल्या जातात. दहाव्या दिवशी पूजेचे उद्यापन म्हणून तो घट हलवला जातो. निसर्गाने जे काही दिले आहे, ते सर्व जतन करून संवर्धन करण्याचा बोध या घटस्थापनेच्या कृतीतून मिळतो. पावसाचे पाणी घटासारखे अडवून पाणीसाठा केला तर दुष्काळ जन्य परिस्थिती उद्भवणार नाही, हा संदेश मिळतो. 

नवरात्र उपासना : (Navratri Upasna 2024)

या दहा दिवसांत सप्तशतीचे पाठ वाचून, त्यातील मंत्र जप करून देवीच्या विविध शक्तिरूपाची पूजा केली जाते. यात शांती, क्षुधा (भूक), तृष्णा (तहान), निद्रा, लक्ष्मी, सरस्वती, सावली, वात्सल्य ही सगळीच रूपं शारीरिक आणि मानसिक बळ देतात म्हणून या सप्तशतीतील सिद्धमंत्र म्हटले जातात. कुंकुमार्चन केले जाते, कुमारिकांचे पूजन केले जाते, सवाष्ण ओटी भरून जेऊ घातली जाते, तसेच नऊ दिवस देवीची आरती म्हणून, ओटी भरून, जोगवाही मागितला जातो. काही जण उपास करतात, कोणी अनवाणी चालतात, कोणी नामस्मरण, स्तोत्रपठण करतात. भौतिक सुखातून मन वळवून अध्यात्मात, भगवंत चिंतनात वेळ घालवावा आणि ऊर्जा संपादन करावी हा त्या कृतीमागचा हेतू असतो. 

हादगा, भोंडला : (Bhondla 2024)

नवरात्रीत गरबा, दांडिया खेळतात हे आपल्याला माहीत आहे, पण कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुरु असणारा भोंडला नव्या पिढीला कदाचित परिचयाचा नसेल. तरी अजूनही काही ठिकाणी भोंडला खेळला जातो. भोंडल्याची मजेशीर गाणी म्हणत मनावरचा ताण घालवला जातो. प्रत्येक जण काही ना काही खाऊ घरून घेऊन येतात, तो बाकीच्यांनी ओळखायचा, यालाच खिरापत ओळखणे म्हणतात. मग सगळ्यांनी आणलेला सगळा खाऊ सगळ्यांना पुरेल या बेताने वाढला जातो. पाटावर खडूने, रांगोळीने किंवा तांदुळाने हत्तीचा आकार काढला जातो. हत्ती हे लक्ष्मीचे वाहन म्हणून त्याचे पूजन केले जाते, शिवाय हस्त नक्षत्रावर कोसळणारा धो धो पाऊस, निसर्गाची भावी तरतूद करून जातो, पृथ्वी सुजलाम सुफलाम करून जातो, त्याबद्दल कृतज्ञता म्हणूनही हत्तीची पूजा करून त्याभोवती फेर धरला जातो. 

नवरात्रीमधील सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यातून होणारे लाभ : (Navratri Cultural Program 2024)

उत्सवाच्या निमित्ताने श्रीसूक्त या वैभव देणाऱ्या स्तोत्राचे सामूहिक पठण केले जाते. नऊ दिवस नऊ ठिकाणी भोंडला, हातगा खेळला जातो. त्यानिमित्ताने गृहिणी, नोकरदार महिला नटून थटून एकत्र येतात, पारंपरिक गाणी म्हणतात, रात्री गरबा खेळून जागरण करतात, खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम करतात, खाऊ खातात आणि तना-मनाचा ताण घालवून शब्दश: 'मोकळ्या' होतात. सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने स्त्रियांसाठी हे एकप्रकारचे आउटलेट आहे, असे म्हणतात येईल. जे नितांत गरजेचे आहे. नवरात्रीमुळे तो हेतू देखील साध्य होतो. फक्त त्यात अश्लील नृत्य तसेच शरीर प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांचा वापर टाळला पाहिजे, तरच उत्सवाचे पावित्र्य जपले जाईल. 

Web Title: Navratri 2024: Why Navratri only for nine days? Why do ghatasthapna? What is Navratri worship? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.