Navratri 2024: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीच्या रूपाची पुजा का? जाणून घ्या कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 03:54 PM2024-10-03T15:54:16+5:302024-10-03T15:55:00+5:30
Navratri 2024: नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीच्या नऊ रूपांचा सविस्तर परिचय करून घेणार आहोत, सुरुवात देवी शैलपुत्रीच्या रूपाने!
आज आश्विन शुद्ध प्रतिपदा. देवी नवरात्रीचा प्रारंभ आजच्या तिथीपासून होतो. घटस्थापना केली जाते. घटाच्या बाजूलाच पसरलेल्या थोड्याशा मातीवर धान्य रुजविले जाते. देवीच्या मूर्तीसमोर अथवा सप्तशतीच्या पोथीसमोर अखंड दिवा तेवत ठेवला जातो. वेगवेगळे लोक आपापल्या प्रथा-परंपरांनुसार नवरात्र उत्सव साजरा करतात. नवरात्र हा सत्त्व-रज-तम अशा त्रिगुणविशेषात अवतरलेल्या महाकाली, महालक्ष्मी, आणि महासरस्वती अशा तीन देवतांच्या पराक्रमाचा गुणगौरव करणारा व्रतोत्सव आहे. त्याबरोबरच देवीच्या नऊ रूपांचाही सविस्तर परिचय करून घेऊया.
प्रथम शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी
तृतीयं चंद्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।।
देवीच्या नऊ रूपांची नावे वरील श्लोकात दिली आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायणी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री अशी ती नावे आहेत. देवीने जो पराक्रम गाजवला, त्याला अनुसरून देवीला या नावांनी ओळखले जाऊ लागले. काय आहे त्यामागील कथा, रोज एक जाणून घेऊया.
शैलपुत्री :
आई दुर्गा आपल्या पहिल्या स्वरूपात `शैलपुत्री' या नावे ओळखली जाते. हिमालयकन्या म्हणून तिचा जन्म झालेला असल्याने, तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले. तिच्या उजव्या हातात त्रिशुळ आणि डाव्या हातात कमळ शोभून दिसत आही. दुर्गेच्या सर्व रूपांमध्ये ती पहिली दुर्गा आहे.
शैलपुत्रीचा पूर्वजन्म प्रजापती दक्ष यांच्या कन्येच्या रूपात झाला होता. तेव्हा तिचे नाव `सती' होते. त्यावेळेस सतीचा विवाह भगवान शंकराशी झाला. एकदा प्रजापती दक्ष यांनी मोठा यज्ञ केला. सर्व देवी-देवतांना यज्ञात आमंत्रित केले. मात्र, भगवान शंकराला आमंत्रण दिले नाही.
आपल्या वडिलांनी भल्या मोठ्या यज्ञाचे आयोजन केले आहे, ही वार्ता जेव्हा सतीला कळली, तेव्हा तिने यज्ञाला जाण्याचा मनोदय भगवान शंकराजवळ व्यक्त केला. भगवान शंकर म्हणाले, `सती, तुझ्या वडिलांनी सर्वांना आमंत्रण दिले आहे, परंतु आपल्याला आमंत्रण दिले नाही. याचा अर्थ त्यांचा आपल्यावर काहीतरी राग असला पाहिजे. अन्यथा, त्यांनी असे केले नसते. कारण जाणून घेतल्याशिवाय आणि आमंत्रण मिळाल्याशिवाय तिथे जाणे, मला योग्य वाटत नाही. परंतु, सतीचे मन माहेरी धाव घेऊ लागले. आपण एकाच घरचे आहोत, म्हणून कदाचित वेगळे आमंत्रण दिले नसेल किंवा घाईगडबडीत राहून गेले असेल, असे म्हणत सतीने पुन्हा भगवान शंकराकडे यज्ञाला चलण्याचा आग्रह केला. तिची माहेराप्रती असलेली ओढ पाहून शंकरांना तिचा आग्रह मोडवला नाही. त्यांनी सतीला जाण्याची अनुमती दिली, परंतु आपण येणार नाही, असे कळवले. सती आनंदाने यज्ञ समारंभी सहभागी झाली.
संपूर्ण राज्यात रोषणाई केली होती. प्रजाजन प्रसन्न दिसत होते. अनेक पाहुणे आले होते. सगळे वातावरण आनंदी झाले होते. तिथे गेल्यावर सतीचा आनंद द्विगुणीत झाला. कधी एकदा जाऊन आपल्या पित्याला, मातेला, बहिणींना भेटते, असे तिला झाले होते. ती राजवाड्यात पोहोचली. परंतु, तिला पाहुनही कुटुंब सदस्यांपैकी कोणीही तिचे स्वागत केले नाही. उलटपक्षी तिला दुर्लक्षित केले. त्यांच्या नजरेतले भाव अत्यंत अपमानास्पद होते. सतीला गहिवरून आले. भगवान शंकरांचे बोल आठवले. आमंत्रणाशिवाय आपण उगीचच येथे आलो, असे तिला जाणवू लागले. तिच्या मनात एकाच वेळी दु:ख, कारूण्य, क्रोध, संताप उफाळून येत होता. हा अपराधी भाव घेऊन शंकरांसमोर कसे जाणार, या विचाराने तिने तिथल्या तिथे स्वत:ला संपवून टाकले.
सतीचा असा अपमान झाल्याचे कळताच, भगवान शंकरांनी रागाच्या भरात आपल्या गणांना पाठवून दक्ष प्रजापती राजाचा यज्ञ समारोह उधळून लावला.
सतीने योगाग्निद्वारे पुढचा जन्म हिमालयाच्या कुळात घेतला आणि तिथे ती `शैलपुत्री' या नावे नावरूपाला आली. पार्वती, हेमवती ही देखील तिचीच नावे. गेल्या जन्मात अपूर्ण राहिलेला संसार पूर्ण करण्यासाठी शैलपुत्रीने तपश्चर्या करून पुन्हा एकदा भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आणि ती त्यांची अर्धांगिनी झाली. तिने अनेक देव-देवतांचे गर्व हरण केले.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीचे स्मरण आणि पूजन केले जाते. अनेक योगी, साधू आजच्या दिवशी मूलाधार चक्रात मन केंद्रित करून योगसाधनेचा प्रारंभ करतात.