Navratri Mahotsav 2023: महालक्ष्मीच्या पूजेत घागरी फुंकण्याची प्रथा आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 11:43 AM2023-10-20T11:43:30+5:302023-10-20T11:44:05+5:30

Navratri Mahotsav 2023: अश्विन शुद्ध अष्टमीला मुखवट्याच्या लक्ष्मीचे पूजन करण्याची आणि तिच्यासमोर घागर फुंकण्याची प्रथा आहे, त्याबद्दल जाणून घेऊया. 

Navratri Mahotsav 2023: Blowing pots in Mahalakshmi worship, let's know in detail! | Navratri Mahotsav 2023: महालक्ष्मीच्या पूजेत घागरी फुंकण्याची प्रथा आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ!

Navratri Mahotsav 2023: महालक्ष्मीच्या पूजेत घागरी फुंकण्याची प्रथा आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ!

>> मकरंद करंदीकर 

अश्विन शुद्ध अष्टमीला सरस्वती आणि महालक्ष्मीचे पूजन केले जाते. ही महालक्ष्मी पिठाच्या मुखवट्याची असते. त्यासंदर्भातील माहिती कालच्या लेखात आपण पाहिली, या लेखात आपण घागर फुंकण्याच्या प्रथेबद्दल आणि या पूजनाशी संबंधित पडणाऱ्या इतर प्रश्नांबद्दल जाणून घेणार आहोत. यंदा २१ ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन केले जाणार आहे. 

Navratri Mahotsav 2023: अश्विन शुद्ध अष्टमीला मुखवट्याच्या महालक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे; त्याबद्दल जाणून घ्या!

१ ) ही पूजा, स्त्रिया करतात. जिची देवी म्हणून पूजा करायची ती सुद्धा स्त्रीच !  मग हा मुखवटा बनवितांना तेथे स्त्रियांना प्रवेशबंदी का ? 
पूर्वी गरोदर स्त्रीने कुठलीही मूर्ती साकारताना किंवा त्याचे वेगवेगळे अवयव, छिन्नविच्छिन्न देह इ. पाहू नयेत असा दंडक होता. तिच्या मनावर त्याचा परिणाम होऊन, जन्म घेणाऱ्या संततीत व्यंग निर्माण होईल अशी भीती वाटत असे. पूर्वी शास्त्र इतके प्रगत नव्हते. गरोदरपणामध्ये स्त्रीच्या मानसिक आणि शारिरीक संवेदनांमधील बदल लक्षात घेता हा नियम केला गेला होता. पूर्वी तर स्त्रीची जननक्षमता असे पर्यंत ती मुलाना जन्म देत असे. त्यामुळे ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन येथे सरसकट सर्वच स्त्रियांना बंदी केली गेली होती. येथे स्त्री- पुरुष वर्चस्वाचा प्रश्न नव्हता. 

२ ) घागरी फुंकण्याचे प्रयोजन काय ? 
अशा प्रकारे घागरी फुंकण्याचे हे एकमेव व्रत असावे. यामुळे देवीमध्ये, वातावरणामध्ये चैतन्य भरून राहते असे मानले जात असे. याचे महत्व उत्तम प्रकारे समजण्यासाठी सध्याचा कोरोना काळ हा अत्यंत योग्य काळ आहे. उन्हाळा, पावसाळा आणि थंडी या तिन्ही ऋतूंच्या बदलाच्या वेळी वातावरणामध्ये जंतू, विषाणूंची वाढ होत असते. हे रोखण्यासाठी, सध्याच्या अत्यंत प्रगत काळातसुद्धा जगभर वाफ घेणे, औषध फवारणी करणे अशा गोष्टी केल्या जात आहेत. जुन्या काळाचे हे एक उत्तम निर्जंतुकीकरण आणि fumigation होते. पावसाळ्याच्या ४ महिन्यात घरातच अडकलेल्या स्त्रियांसाठी तर ते फारच महत्वाचे होते. 

३ ) घागरी फुंकतांना कांही स्त्रियांच्या अंगात देवीचं संचार होतो का ?
पूर्वी असे मानले जात असे. असा " देवीचा संचार " झालेल्या स्त्रियांना, अनेक स्त्रिया आपल्या अडचणी, प्रश्न सांगून त्याची उत्तरे विचारत असत. त्या काळात अत्यंत साधे साधे प्रश्नही जाहीरपणे विचारता येत नसत. भक्कम वैज्ञानिक आधार असलेले  वैद्यकीय, मानसशास्त्रीय, सामाजिक समुपदेशन हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे तेव्हा  हाच एक आधार वाटत असे. खरे कारण असे की  तेथे धूर वाढल्यामुळे, तो अतिरिक्त प्रमाणात हुंगल्यामुळे, कांही स्त्रियांच्या शरीरातील oxygen level कमी होत असे. कार्बन आणि कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण तात्पुरते वाढत असे. मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने ही एक भ्रम, भ्रांतीची, तंद्रीची अवस्था असे. अध्यात्मातील उन्मनी अवस्था नव्हे. देवीचा संचार नव्हे. लोकजागृती, शिक्षण, अन्य पर्यायांची उपलब्धता अशा गोष्टींमुळे हल्ली हा  " देवीला प्रश्न विचारण्याचा " प्रकार बंद झाला आहे.  

४ ) या देवीच्या बरोबर शंकराचे अस्तित्व कशासाठी ? 
या उभ्या मूर्तीच्या शेजारी, पूर्वी एका मोठ्या कलशावर एक असोला नारळ, शेंडीसह ठेवला जात असे. त्यावर पगडी किंवा टोपी, गळ्याशी उपरणे आणि कपाळाच्या जागी गंधाचे त्रिपुंड्र ( तीन आडवे पट्टे ) लावून तो ठेवला जात असे. हे शंकराचे प्रतीक म्हणून त्याला शंकरोबा, सकरोबा, शिवशंभू असे संबोधले जात असे. हल्ली काही ठिकाणी असोला नारळ  ठेवण्याऐवजी तांब्याचा कलश उपडा ठेवतात. येथे उभ्या केलेल्या महालक्ष्मीचा आणि शंकराचा अन्योन्य संबंध काय ?  याचे उत्तर देतांना बोरिवली येथील ज्येष्ठ जाणकार श्रीमती विद्याताई परांजपे यांनी असे सांगितले की सप्तशतीच्या पोथीमध्ये याचा थोडासा दुवा आढळतो. देवांना हरवून उन्मत्त झालेल्या महिषासुराचा वध करण्यासाठी केलेल्या " ओम सहस्रक परशुं ....... महालक्ष्मीं सरोजस्थिताम् " या ध्यानमंत्रामध्ये महालक्ष्मीची प्रार्थना करण्यात आली आहे. महिषासुराचा वध करण्यासाठी अठरा हातांच्या या महालक्ष्मीला विविध देवांनी आपली शस्त्रे बहाल केली. संहाराचा विभाग हा शंकराच्या अधिपत्याखाली असल्याने, भगवान शंकराने देवीला अत्यंत संहारक अशी शस्त्रे आणि शक्ती बहाल केल्या. त्यामुळे या घनघोर लढाईत देवीचा विजय झाला.  त्याची आठवण म्हणून येथे महालक्ष्मी देवतेबरोबर भगवान शंकर पाहायला मिळतात.  याबद्दल  गोपा, कार्तिकस्वामी, गौरीचे बाळ अशा उल्लेखाच्या कांही कथाही आहेत. 

आता या मध्येही बदल घडत आहेत. मुंबईतील कांदिवलीमधील गणेश क्षीरसागर हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ, असे उकडीचे मुखवटे बनवितात. त्यांनी याबद्दल माहिती दिली.  हा मुखवटा दुपारनंतर, ताज्या उकडीचा आणि खूप मेहेनतीने बनवावा लागतो. त्यामुळे एखादाच मुखवटा साकारता येतो. साहजिकच त्याचा मेहेनताना अधिक असतो. या ऋतुतील कोरडेपणामुळे त्याला सूक्ष्म भेगा पडू लागतात. वेळ, जागेची उपलब्धता अशा अनेक कारणांमुळे आता फायबरचे मुखवटे बनविण्याकडे कल वाढतो आहे. 

यात चांगले बदलही होतायत. नव्या पिढीला संस्कार हवे आहेत. पण ते सुसंगत बदलांसह हवेत. दादरच्या  रानडे रोडवरील  ' साडीघर ' या तयार आणि शिवलेल्या साड्यांच्या दुकानाचे मालक राजन राऊत आणि गौतम राऊत यांनी सांगितले की आता तर या महालक्ष्मीसाठी पूर्ण उभी मूर्ती ही फायबर किंवा soft toys च्या धर्तीवर कापड व कापसाची बनवून घेतली जाते. चांदी आणि फायबरच्या मुखवट्यांची मागणी वाढत आहे. यासाठी विदेशातून विशेष मागण्या येतात. 

परंपरा आणि सण साजरे करण्याच्या पद्धती कालानुरूप बदलणारच.  पण हा बदल जेव्हा परंपरेची प्रतिष्ठा वाढविणारा असतो, तेव्हा तो आनंददायी आणि स्वागतार्ह असतो. 

नमस्तेस्तु महामाये । श्री पीठे सुर पूजिते ।
शंख चक्र गदा हस्ते । महालक्ष्मी नमोस्तुते ।। 

Web Title: Navratri Mahotsav 2023: Blowing pots in Mahalakshmi worship, let's know in detail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.