Navratri Mahotsav 2023: नवरात्रीत देव्हाऱ्यातील नंदादीप अखंड तेवत ठेवण्यामागे काय कारण आहे जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 01:59 PM2023-10-19T13:59:11+5:302023-10-19T13:59:45+5:30

Navratri Mahotsav 2023: प्रथा-परंपरा म्हणून अनेक गोष्टींचे आपण पालन करतो, पण त्या समजून उमजून केल्या की त्याचा आनंद द्विगुणित होतो. 

Navratri Mahotsav 2023: Know the reason behind keeping the Nandadeep lightening continuously during Navratri! | Navratri Mahotsav 2023: नवरात्रीत देव्हाऱ्यातील नंदादीप अखंड तेवत ठेवण्यामागे काय कारण आहे जाणून घ्या!

Navratri Mahotsav 2023: नवरात्रीत देव्हाऱ्यातील नंदादीप अखंड तेवत ठेवण्यामागे काय कारण आहे जाणून घ्या!

आज नवरात्रीचा पाचवा दिवस, ललिता पंचमीचा! नवरात्रीचे सगळेच दिवस महत्त्वाचे तरीही पंचमी, अष्टमी, नवमी  तिथीला विशेष महत्त्व असते. या नऊ दिवसात लोक विविध प्रकारे शक्तीची उपासना करतात. याच उपासनेचा एक भाग म्हणून काही लोक या नऊ दिवसात अखंड ज्योत लावतात. देव्हाऱ्यात शांतपणे आणि अखंडपणे तेवणारा नंदादीप डोळ्यांना जितका सुखद वाटतो, तेवढाच तो उपासनेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरतो. कसा ते पाहू!

सर्वसामान्यपणे आपण दररोज सकाळ-संध्याकाळ देवासमोर दिवे लावतो. तरीदेखील विशेषतः नवरात्रीच्या काळात अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. दिवा अखंड तेवत ठेवण्याला खूप महत्त्व आहे, ही गोष्ट सर्वांनाच ठाऊक आहे. पण ही प्रथा का आणि कशासाठी ते जाणून घेऊया!

नवरात्रीत भक्तीचा, शक्तीचा जागर केला जातो. जागर करणे अर्थात जागृत राहणे. दिवा अखंड तेवत ठेवणे हे आत्मज्योत जागृत ठेवण्याचे प्रतीक आहे. जसा देव्हाऱ्यातील दिवा तेवत राहतो, तशी आपली जागृतावस्था कायम राहून आत्मज्योत तेवत राहो ही त्यामागील संकल्पना आहे. नव्हे तर ती जाणीव करून देणारे हे प्रतीक आहे. 

कोणताही भक्त दिव्यात उपस्थित असलेल्या अग्नितत्त्वाद्वारे देवाशी संलग्न होण्याचा प्रयत्न करतो. ती केवळ दिव्याची ज्योत नसून ती आत्मज्योत मानली जाते. जिवा शिवाला जोडणारी ही वात अखंडित राहून ज्ञानदीप प्रकाशमान व्हावा ही त्यामागील मुख्य संकल्पना आहे. 

कोणत्याही प्रकारच्या पूजेची सुरुवात दिवा प्रज्वलित करून केली जाते आणि पूजेच्या शेवटी आरती ओवाळून सांगता केली जाते. असे म्हणतात, की दिवा भक्ताचा दूत बनून आपल्या इष्ट देवापर्यंत आपल्या भावना पोचवतो, म्हणून असे म्हणतात की ज्या घरांमध्ये देवाची नित्य पूजा, दिवे लावणे, घंटा वाजवणे आणि शंख वाजवणे अशी परंपरा असते तिथे देवीदेवतांचा सदैव वास असतो. 

दिवा अखंड तेवत राहावा म्हणून त्या भली मोठी वात लावली जाते. समईच्या काठोकाठ तेल भरले जाते. तेल संपत आले की त्यात भर घातली जाते आणि दिव्याची ज्योत मंद तेवत ठेवली जाते. 

नवरात्रीत अखंड दिवा तेवत ठेवल्याने घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्ती होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. अर्थात हा दिवा तेलाचा हवा तसेच ज्ञानाचा आणि जागृतीचादेखील असायला हवा!

Web Title: Navratri Mahotsav 2023: Know the reason behind keeping the Nandadeep lightening continuously during Navratri!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.