Navratri Mahotsav 2023: आपल्या नावात आईचे नाव लावण्याची प्रथा पूर्वीपासून; ललिता पंचमीनिमित्त वाचा ही पौराणिक कथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 02:35 PM2023-10-19T14:35:41+5:302023-10-19T14:36:01+5:30

Navratri Mahotsav 2023: अनेक जण आपल्या नावात आई वडिलांचे किंवा फक्त आईचे नाव जोडतात, पण ही काही आजची गोष्ट नाही, पुराणातही त्यासंदर्भात कथा सापडते. 

Navratri Mahotsav 2023: The practice of putting mother's name in one's name dates back; Read this mythological story on the occasion of Lalita Panchami! | Navratri Mahotsav 2023: आपल्या नावात आईचे नाव लावण्याची प्रथा पूर्वीपासून; ललिता पंचमीनिमित्त वाचा ही पौराणिक कथा!

Navratri Mahotsav 2023: आपल्या नावात आईचे नाव लावण्याची प्रथा पूर्वीपासून; ललिता पंचमीनिमित्त वाचा ही पौराणिक कथा!

गेल्या काही वर्षांपासून आपल्या प्रगती पुस्तकावर, प्रशस्तीपत्रकावर, जन्मदाखल्यावर वडिलांबरोबरच आईचेही नाव लिहिण्याचा कायदा सुरू झाला. परंतु, पौराणिक कथा शोधल्या, तर असे अनेक दाखले मिळतील, जिथे आईच्या नावावरून पुत्राला ओळख मिळत असे. अशीच एक कथा, सत्यकाम जाबालची...

एकदा गौतम ऋषी आपल्या आश्रमात शिष्यांना शिकवत होते. त्यावेळी फाटकी वस्त्रे नेसलेला एक मुलगा मोठ्या धैर्याने ऋषींना सामोरा गेला आणि म्हणाला, 'गुरुदेव, आपल्यासारख्या ज्ञानी व उदात्त गुरुदेवांचे शिष्य व्हावे, अशी माझी उत्कट इच्छा आहे.' 

त्याची उत्सुकता, ज्ञानार्जनाची ओढ आणि विनम्र भाव पाहून ऋषींनी त्याला सौम्यपणे विचारले, 'पुत्र, तुझे पूर्ण नाव काय? तुझे कुळ कोणते? तुझा पूर्वइतिहास काय? मला तुझा सविस्तर परिचय दे.'

यावर तो नम्रपणे म्हणाला, `गुरुदेव, माझ्याकडे तुमच्या एकही प्रश्नाचे उत्तर नाही. उलट स्वत:ची ओळख कमवावी, म्हणून तर मी आपल्याकडे आलो आहे.' 

स्वत:बद्दल ज्याला काही माहित नाही, असा मुलगा विश्वाचे ज्ञान करून घ्यायला गुरुदेवांकडे आला आहे, हे पाहून इतर शिष्य  तिरस्काराने त्याच्याकडे बघून हसू लागले. गौतम ऋषींनी त्यांच्यावर एक कटाक्ष टाकला आणि त्यांना गप केले. गुरुदेव म्हणाले, 'तू अनाथ आहेस का?' 

'नाही गुरुदेव, मला आई आहे. तीच मोठ्या कष्टाने माझा सांभाळ करते.' - मुलगा उत्तरला. 

गुरुदेव म्हणाले, `ठीक आहे. मग तुला मी जे प्रश्न विचारले, ते जाऊन तू तुझ्या आईला विचार. स्वत:ची ओळख करून घे, मग मला येऊन तुझी ओळख करून दे. मग आपण ज्ञानार्जनाला सुरुवात करू.'

छोटासा मुलगा वायूवेगाने धावत घरी आला. त्याने आपल्या आईला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. आईने त्याला शांत केले. मुलगा किशोरवयीन होता. म्हटले तर समजूतदार आणि म्हटले तर अल्लड, असे त्याचे वय. परंतु आता त्याच्या प्रश्नांना उत्तर देणे भाग होते. म्हणून आईने त्याच्या बालबुद्धीला पटेल असे, परंतु सत्यपरिस्थितीवर आधारित उत्तर देऊन त्याचे कुतुहल शमवले. आई म्हणाली,

'बाळा, इतर मुलांना असतात, तसे तुला वडील नाहीत, कारण मी एक दासी आहे. तुझी जबाबदारी पूर्णपणे माझ्या एकटीवर येऊन पडली. त्यामुळे तुला वडील नाहीत, फक्त आई आहे, ही जाबाली. मात्र, यात वैशम्य वाटून घेण्याचे काहीच कारण नाही, कोणी विचारले, तर ठणकावून सांग, मी जाबालीपुत्र जाबाल आहे.'

आपली ओळख कळल्यावर, पटल्यावर जाबालला खूप आनंद झाला. त्याने आईला कडकडून मिठी मारली आणि म्हणाला, 'आई, सगळे जण वडिलांचे नाव लावतात, पण खरी ओळख देणारी तर आईच असते ना आणि माझे भाग्य असे की मला तुझे नाव लावण्याची संधी मिळाली. तुझे नाव मी खूप मोठे करेन.' 

जाबालने पण केला आणि तो आश्रमात परत आला. गुरुंसमोर त्याने सर्व हकिकत कथन केली. बाकीच्या मुलांना टिंगल टवाळी करायला नवा विषय मिळाला. गौतम ऋषींनी पुन्हा एकदा मुलांना गप्प केले आणि जाबालकडे बघत म्हणाले, 

'जाबाल, तू धन्य आहेस, तुझी माताही धन्य आहे. आपल्या आयुष्याचे सत्य स्वीकारण्याची तू तयारी दाखवलीस. यामुळे तुझा नक्कीच उत्कर्ष होईल. तू मोठा ऋषी होशील. आपल्या कर्तृत्त्वाने तू आईचेही नाव मोठे करशील. तुझे सत्यावरील प्रेम पाहून तुला मी 'सत्यकाम जाबाल' असे नाव प्रदान करतो.'

गुरुमुखातून निघालेले आशीर्वाद आणि आईने दाखवलेला विश्वास जाबालने खरा करून दाखवला आणि इतिहासात त्याने जबालीपुत्र जाबाल याच नावाने, थोर ऋषी होऊन महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Web Title: Navratri Mahotsav 2023: The practice of putting mother's name in one's name dates back; Read this mythological story on the occasion of Lalita Panchami!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.