मनात आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 08:24 PM2020-07-15T20:24:43+5:302020-07-15T20:24:55+5:30

सुख-दु:ख समान मानून मनाची स्थिती स्थिर ठेवायची असते. आपणच आपल्या मनाला समजावू शकतो. आपणच आपल्या मनाला घडवू शकतो.

need to build confidence in the mind | मनात आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज

मनात आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज

Next

कोणतीही वृत्ती प्रथमत: मनात निर्माण होते. मनाने ठरवले तर हात, पाय, वाचा, दृष्टी इत्यादी इंद्रियाकडे ते धाव घेते. ज्याप्रमाणे बाहुलीला दोरी जिकडे नेईल तिकडे बाहुली जाते, त्याचप्रमाणे मनाप्रमाणेच सर्व इंद्रिये कार्य करतात. मन हे सर्व इंद्रियांच्याद्वारे धाव घेते. आज सध्याच्या घडीला कोरोने विषाणूच्या महामारीमुळे सर्वांची मने धास्तावली आहेत. मनाला आधार देणे गरजेचे आहे. मनात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. मन स्थिर बनवा. मनाला या दु:खापासून हटवा. स्वत:ची काळजी घ्या. मनाला आराम द्या, मनाला भरकटू देऊ नका. मनानेच मनपण राखायचे आहे. आपल्या मनाने धास्ती घेतली की, आपण हारतो. मनाने खंबीर बनून येणाऱ्या संकटांना तोंड द्या. या विश्वात जी गोष्ट निर्माण होते तिचा नाश अटळ असतो. तसा या कोरोना विषाणू महामारीचा नाश अटळ आहेच. थोडा काळ जावा लागेल. कोणत्याही बाबतीत शुभ संकल्प करावेत. आपले मन कशाशीही चिकटता कामा नये. मनाला स्थिर करण्यासाठी सकाळी ध्यान व योगाचा आधार घ्या. नाना प्रकारच्या दु:खानी ग्रासलेल्या मानसिकतेतून बाहेर पडा. आहे त्या परिस्थितीशी एकरूप व्हा. मनातून भीती काढून टाका. मनाच्या वरून तुमच्या सुखाची पावती मिळते. मग दु:खी असले तर शरीरावर त्याचा परिणाम होतो. ज्याप्रमाणे अंकुराचा लुसलुशीतपणा हा जमिनीचा मृदूपणा सांगतो, त्याप्रमाणे मनुष्याच्या हावभावावरून त्याच्या मनाचा स्वभाव सांगता येतो. मनाला भ्रांतीत अडकवू नका. मनातून मुळासकट कोरोनाची भीती घालवा. कोणत्याही वेळी, कशानेही न मळता आपण मनाने स्वच्छ राहावे. शरीराद्वारे घडणाऱ्या हालचाली मनाच्या मार्गाने घडतात म्हणून मनाला सावरा. मनाची स्थितीच सुख-दु:खांना कारणीभूत आहे. म्हणून मनाची स्थिरता महत्त्वाची आहे. या चंचलरूपी मनाला सावरायचे झाले तर १० मिनिटे का होईना मौनात राहा. ज्याच्या योगाने मन शांत होईल. मौनाच्या संगतीने मनाला शांत करा. जीवनात अनेक गोष्टी मनाविरुद्ध घडतात. या प्रपंचरूपी डोहात सगळे आपल्या मनासारखे होत नसते. जरी एखादी घटना घडली तरी आपले मन परत-परत इच्छा करते. या संसाररूपी सागरात मन नेहमी भटकत असते. त्याला सुखाची अपेक्षा असते. परंतु सुख-दु:ख समान मानून मनाची स्थिती स्थिर ठेवायची असते. आपणच आपल्या मनाला समजावू शकतो. आपणच आपल्या मनाला घडवू शकतो.
- डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

Web Title: need to build confidence in the mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.