New year 2023: २०२३ मध्ये कोणत्या व्यक्तींना यश मिळेल आणि कोण अपयशी ठरेल ते जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 04:33 PM2022-12-28T16:33:27+5:302022-12-28T16:39:49+5:30
New year 2023: जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करताना नवी उमेद जागृत होते, तीच उमेद यशस्वी होण्यास हातभार लावते!
थांबा थांबा. शीर्षक वाचून, सदर लेख भविष्याशी निगडीत आहे, असे कदाचित आपल्याला वाटू शकेल. परंतु नाही. हा लेख भविष्य कथन करण्यासाठी नाही, तर भविष्य घडवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या गोष्टींचा आढावा घेणारा आहे.
१ जानेवारी हे हिंदूंचे नववर्ष नाही, तरीदेखील आपले दैनंदिन व्यवहार इंग्रजी तारखेनुसार चालतात. त्यामुळे इंग्रजी सालाप्रमाणे त्याचे स्वागत ओघाने आलेच. स्वागत म्हटले, की जल्लोष, आनंद, नवे संकल्प या गोष्टीही आल्याच. या सर्व गोष्टींसाठी मुख्यत्वे लागणार आहे, ती म्हणजे प्रचंड सकारात्मकता. येत्या काळात तीच व्यक्ती टिकून राहील, तीच व्यक्ती राज्य करेल, तीच व्यक्ती बदल घडवू शकेल, जिच्याजवळ सकारात्मकतेचा मोठा स्रोत असेल. म्हणून नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक खूणगाठ मनाशी पक्की बांधून घ्या, ती म्हणजे, परिस्थिती कितीही वाईट असेल, परंतु आपल्याला सकारत्मकतेनेच विचार करायचा आहे. सकारात्मकता अंगी बाणण्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतील, ती पुढीलप्रमाणे-
चित्रपटात आपण पाहतो, कोणी काही अपशब्द काढला, वाईट बोलले, की नायिका ते वाक्य मध्यातून तोडत नायकाच्या तोंडावर हात ठेवते. या गोष्टी फिल्मी किंवा रोमँटिक वाटतात. परंतु, वास्तवातही कोणी अभद्र बोलले की आपण, त्याला तिथेच हटकतो. कारण, वाईट गोष्टींचा उच्चारही नको. म्हणूनच मनात कितीही वाईट विचार आले, तरी ते एकवेळ कागदावर लिहून काढावे, फाडून टाकावे, पण त्यांचा उच्चार करू नये.
गुगलवर एखादी गोष्ट सर्च केली, की गुगलशी संलग्न असलेल्या सर्व समाज माध्यमांवर संबंधित जाहिराती झळकू लागतात. कारण, या गोष्टी सर्व्हरने आपापसात जोडलेल्या असतात. त्याचप्रमाणे जी गोष्ट आपण सातत्याने बोलतो, त्या गोष्टीचे आपल्याभोवती वलय तयार होते आणि तशाच गोष्टी घडू लागतात. हा काही चमत्कार नाही, तर हे आपल्याच विचारांनी निर्माण केलेले जाळे आहे. त्यात न अडकता आपल्याला अलिप्तपणे बाहेर पडायचे असेल, तर नकारात्मक विचार, उच्चार टाळले पाहिजेत. बोलायचेच आहे, तर चांगलेच बोलूया, चांगलेच वागूया, चांगलाच विचार करूया.
आपण बऱ्याचदा, आपल्याजवळ काय आहे, ते न पाहता, काय नाही, त्याचा विचार करत दु:खी होतो. येत्या वर्षात आणि पुढील आयुष्यातही आपल्याला उणिवांचा विचार न करता, जमेची बाजू कोणती, त्याचा विचार करायचा आहे. जे नाही, त्यावर मात कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करायचा आहे. तसे केल्याने आपोआपच आपल्या विचारात परिवर्तन घडेल. आपल्या मनाला नैराश्य शिवणार देखील नाही आणि शिवलेच तरी त्यातून बाहेर पडण्याची आपल्या मनाची तयारी असेल.
आपल्या आयुष्यातला मोठा काळ रुसव्या, पुâगव्यांमध्ये, कोण काय बोलला, कसा वागला, या गोष्टींच्या चिंतनात खर्च होतो. त्यामुळे नात्यांचा आणि वेळेच क्षय होतो. ज्या गोष्टींचा त्रास होतो, त्या तिथेच सोडून, दुर्लक्षित करून पुढच्या कामाला सुरुवात केली, तर भूतकाळातल्या कटू आठवणींचा आपल्याला त्रास होणार नाही. फार काळ कोणावर राग न ठेवता, नदीच्या प्रवाहाप्रमाणे आयुष्यही प्रवाहित ठेवण्याचा प्रयत्न करूया.
कटू आठवणी मागे सोडून भविष्य घडवण्यासाठी सकारात्मकतेने पाऊल टाकणे गरजेचे आहे. आपल्या परिस्थितीतून आपल्याला एकच व्यक्ती बाहेर काढू शकते, ती म्हणजे आपण स्वत:! यासाठीच चांगल्या कार्याचा, चांगल्या विचाराचा आणि चांगल्या कृतीचा श्रीगणेशा करूया आणि नव वर्षाचे सहर्षाने स्वागत करूया.