OMG! पुढचे वर्ष ३६५ नव्हे तर ३६६ दिवसांचे; २०२४ मध्ये चाकरमान्यांसाठी सुट्यांची चंगळ, विवाह मुहूर्त भरपूर
By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 28, 2023 01:26 PM2023-12-28T13:26:23+5:302023-12-28T13:27:12+5:30
नूतन वर्षात एक दिवस अधिक, एकही ग्रहण दिसणार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: सोमवारी १ जानेवारी रोजी नूतन वर्ष २०२४ चा प्रारंभ होत आहे. यावर्षी सन २०२३ मध्ये लिप सेकंद धरला जाणार नसल्याने नूतन वर्षाचा प्रारंभ रविवार ३१ डिसेंबर रोजी रात्री ठीक १२ वाजता होणार आहे. सन २०२४ हे लीप वर्ष असल्याने या वर्षात जास्त काम करण्यासाठी आपणासर्वांस एक दिवस जास्त मिळणार आहे. सन २०२४ मध्ये ३६५ ऐवजी ३६६ दिवस असणार आहेत असे ज्येष्ठ पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
सन २०२४ मध्ये (१) २५ मार्च रोजी छायाकल्प चंद्रग्रहण , (२) ८ एप्रिल रोजी खग्रास सूर्यग्रहण, (३) १८ सप्टेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण, (४) २ ॲाक्टोबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. परंतू यापैकी एकही ग्रहण भारतातून दिसणार नाही. सन २०२४ मध्ये १८ सप्टेंबर आणि १७ ॲाक्टोबर या दोन पौर्णिमांना सुपरमून ( चंद्रबिंब १४ टक्के मोठे आणि ३० टक्के जास्त प्रकाशित ) दिसणार आहेत.
२२ सुट्या इतरवारी...
सन २०२४ मध्ये २४ सार्वजनिक सुट्ट्यांपैकी २ सुट्या रविवारी येणार आहेत. २२ सुट्या इतरवारी येणार असल्याने चाकरमान्यांची सुट्ट्यांसंबंधी चंगळ होणार आहे. सन २०२४ मध्ये सोनेखरेदी करणारांसाठी २५ जानेवारी, २२ फेब्रुवारी, २६ सप्टेंबर, २४ ॲाक्टोबर आणि २१ नोव्हेंबर असे ५ गुरुपुष्य योग येणार आहेत.
गणेश भक्तांसाठी...
गणेश भक्तांसाठी २५ जून रोजी एकच अंगारकी संकष्ट चतुर्थी योग येणार आहे. विवाहेच्छुकांसाठी सन २०२४ मध्ये जानेवारीमध्ये १२, फेब्रुवारीमध्ये १३, मार्चमध्ये ८, एप्रिलमध्ये १०, मेमध्ये २ , जूनमध्ये २, जुलैमध्ये ६, नोव्हेंबरमध्ये ६ आणि डिसेंबरमध्ये १३ विवाह मुहूर्त दिले आहेत असे सोमण यांनी सांगितले.