Nirjala Ekadashi 2021 : हे मजेशीर 'भारूड' वाचून तुमची निर्जला एकादशी नक्कीच छान साजरी होईल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 12:03 PM2021-06-21T12:03:38+5:302021-06-21T12:03:59+5:30
Nirjala Ekadashi 2021 : 'एकादशी आणि दुप्पट खाशी' असे आपण नेहमी म्हणतो आणि तसे वागतोही. पण निर्जला एकादशीला तर पाणीही प्यायचे नसते. तसे असताना आपण पाण्याला पर्याय कसा शोधत जातो, याचे रसभरीत वर्णन त्यांनी या भारुडात केले आहे...
भारूड हा शब्द उच्चरताच आठवण होते, ती संत एकनाथ महाराजांची. भारूड नामक काव्यातून समाजातील परिस्थितीचे मार्मिक वर्णन केले जाते. नाथ महाराजांनी सुरू करून दिलेली परंपरा अद्याप सुरू आहे. चंदाताई तिवाडी यांचा बुरगुंडा, निरंजन बाक्रे यांचा विंचू चावला, शाहीर साबळे यांचा दादला नको गं बाई अशी अनेक भारुडे आपण ऐकली असतील. अलीकडच्या काळात या सर्व कलाकारांनी त्याला आधुनिक विषयांची जोड देऊन भारूड काव्य जिवंत ठेवले आहे. त्यातलाच एक प्रकार आज निर्जला एकादशीच्या निमित्ताने खास लोकमत वाचकांसाठी...
शिरपूर, धुळे जिल्हा येथील श्रीमती विजयाबाई गाडगीळ यांनी निर्जला एकादशीचे गमतीदार भारूड लिहिले आहे. 'एकादशी आणि दुप्पट खाशी' असे आपण नेहमी म्हणतो आणि तसे वागतोही. पण निर्जला एकादशीला तर पाणीही प्यायचे नसते. तसे असताना आपण पाण्याला पर्याय कसा शोधत जातो, याचे रसभरीत वर्णन त्यांनी या भारुडात केले आहे...
बाई माझी एकादशी, एकादशी,
पाणी पिऊ कशी? पाणी पिऊ कशी?
बाई माझी एकादशी।।
सुनेने केला सुंठवडा,
मला म्हणाली देऊ का थोडा,
अहो आग झाली अशी,
बाई माझी एकादशी ।।१।।
शेजारणीने केला शिंगाड्याचा शिरा,
मला म्हणाली देऊ का जरा,
तिला नाही म्हणू कशी,
बाई माझी एकादशी ।।२।।
मैत्रिणीने केले साबुदाण्याचे वडे,
त्यातले मी खाल्ले ५-७ थोडे,
आता आणखी मागू कशी,
बाई माझी एकादशी ।।३।।
लेकीने केला दुधाचा चहा,
(आज निर्जला एकादशी आहे ना, म्हणून बिना पाण्याचा चहा)
मला म्हणाली पिऊन तर पहा,
तिला नाही म्हणू कशी?
बाई माझी एकादशी ।।४।।
अहो पण अशी एकादशी करून का फळ मिळणारे? म्हणून...
तुम्ही एकादशी करा,
आणि त्या विठ्ठलाचे स्मरण करा,
तरच, जागा मिळेल पायाशी,
बाई माझी एकादशी ।।५।।