Nirjala Ekadashi 2022: दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्यासाठी करा निर्जला एकादशीचे व्रत; सविस्तर माहिती वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 07:15 AM2022-06-09T07:15:00+5:302022-06-09T07:15:01+5:30

Nirjala Ekadashi 2022:असे म्हणतात, की वर्षभरातील २३ एकादशी करता आल्या नाहीत तरी निर्जला एकादशीचे व्रत जरूर करावे. का आहे तिचे एवढे महत्त्व, चला जाणून घेऊ!

Nirjala Ekadashi 2022: Make Nirjala Ekadashi vows for longevity and good health; Read the details! | Nirjala Ekadashi 2022: दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्यासाठी करा निर्जला एकादशीचे व्रत; सविस्तर माहिती वाचा!

Nirjala Ekadashi 2022: दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्यासाठी करा निर्जला एकादशीचे व्रत; सविस्तर माहिती वाचा!

Next

ज्येष्ठ मासातील एक महत्त्वाचे व्रत म्हणजे निर्जला एकादशी. यंदा ११ जून रोजी म्हणजे येत्या शनिवारी निर्जला एकादशी आहे. हिला 'भीमसेनी एकादशी' असेही म्हणतात. यासंबंधीची एक कथा आहे.

भीमाला भूक आवरत नसे. साहजिकच इच्छा असूनही तो उपवास करू शकत नव्हता. त्यामुळे खिन्न होऊन एके दिवशी त्याने आपली ही व्यथा व्यासांना सांगून उपाय विचारला. त्यावेळेस व्यासांनी त्याला `निर्जला एकादशी' चे व्रत करण्याचा सल्ला दिल. ही एकच एकादशी केल्याने इतर तेवीस एकादशी केल्याचे फळ मिळते. त्याप्रमाणे भीमाने ही एकादशी आनंदाने आणि भक्तीपूर्वक केली. 

गुजरातमध्ये या एकादशीला भीम एकादशी असे दुसरे नावही प्रचलित आहे. तशीच आणखीन एक प्रथाही गुजराथी मंडळी पाळतात. ती म्हणजे अजीर्ण-अपच या शारीरिक व्याधीपासून मुक्ती मिळावी, म्हणून या दिवशी उपास करतात. शिवाय भीमाचे नाव घेऊन दिवसभरात शक्य होईल तेवढ्या वेळा पोटावरून हात फिरवायचा. मात्र ही प्रथा केवळ गुजरातपुरतीच मर्यादित आहे. 

संपूर्ण वर्षातील दुसरी कोणतीही एकादशी न करता या एकादशीचे व्रत विधीपूर्वक केले, तर सर्व एकादशीचे पुण्य लाभते, अशी श्रद्धा आजही टिवूâन आहे. या दिवशी आचमनाखेरीज काहीही न खातापिता उपास करावा. रात्री विष्णूच्या मूर्तीची विधिवत पूजा करावी. गायन, नृत्य करून त्या रात्री जागरण करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी विष्णूंची यथासांग पूजा करून, गरजूंना दान दक्षिण देऊन मग उपास सोडावा. हे व्रत केल्याने दीर्घायुष्य व सुदृढ आरोग्य प्राप्त होत़े 

आजच्या धकाधकीच्या जीवनात, अनेक व्याधींनी ग्रस्त असल्यामुळे सगळ्यांनाच हे व्रत शक्य होईल असे नाही. त्यामुळे पूर्ण अन्न पाण्याचा त्याग करून नाही, तर निदान फक्त फलाहार करून हे व्रत करण्याचा प्रयत्न करावा. 

निर्जला एकादशीचा आदला दिवस हा गंगादशहरा चा आणि दुसरा दिवस निर्जला एकादशीचा. या दोन्ही दिवसांत पाण्याचे महत्त्व अधोरेखित करून आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी सांगड घालून दिली आहे. जलाचे महत्त्व जाणून त्याची पूजा करावी आणि निसर्गासमोर नतमस्तक व्हावे, हा त्यामागचा शुद्ध भाव आहे.  

असे म्हणतात, की ज्याने मैलोनमैल पायी चालून पाणी भरण्याचा सराव केला असेल, त्याच्यापेक्षा जास्त पाण्याची किंमत दुसरे कोणीही समजू शकत नाही. निसर्गाने सहल उपलब्ध करून दिलेले पाणी हे नासवण्यासाठी नसून त्याची बचत करणे हे आपले कर्तव्य आहे, याचे भान करून देणाऱ्या या दोन तिथी आहेत. ऐन पावसाळ्यात या व्रतांचे आयोजन हे समाजभान राखण्याच्या दृष्टीनेच केले असावे. 

या औचित्याने गरजू लोकांना जलदानाच्या निमित्ताने छत्री, ताडपत्री, रेनकोट, उबदार कपडे यांचे दानही करता येईल. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हीच तर आपल्या धर्माची खरी शिकवण आहे...!

Web Title: Nirjala Ekadashi 2022: Make Nirjala Ekadashi vows for longevity and good health; Read the details!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.