Nirjala ekadashi 2023: निर्जला एकादशीला कुंभदान करा, आनंदाचे घबाड मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 07:00 AM2023-05-31T07:00:00+5:302023-05-31T07:00:01+5:30
Nirjala Ekadashi 2023: निर्जला एकादशी हा केवळ अध्यात्माच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस नसून माणसातली माणुसकी जागवणारा दिवस आहे, त्यासाठी कुंभदान!
३१ मे रोजी निर्जला एकादशी आहे. निर्जला एकादशीच्या निमित्ताने पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हे व्रत ऐन पावसाळ्यात येत असल्याने, पावसाचे पाणी साठवा अन्यथा बिनापाण्याचे राहावे लागेल, असा संदेश जणू काही या व्रताच्या निमित्ताने आपल्या पूर्वजांनी दिला आहे. म्हणून निर्जला एकादशीचे व्रत निर्जळी राहून अर्थात पाणी न पिता केले जाते. द्वादशीला कृष्णाला फुल वाहून या उपास सोडला जातो. त्याचबरोबर या दिवशी जलकुंभदान करण्याची प्रथा आहे.
दानाच्या अनेक प्रकारांमध्ये जलकुंभदानाला महत्त्व आहे. घरी आलेल्या पाहुण्यांना आपण जसे आदरातिथ्य म्हणून पाणी देतो, तसेच पावसाळ्यात मचूळ पाण्यामुळे अनेक गरीब कुटुंबियांना दुषित पाणी प्यावे लागते. यासाठी अशा कुटुंबांना आपल्या कडून एक घडाभर स्वच्छ पाणी पुरवता आले, तर ते जलकुंभदान पुण्यदायी ठरेल.
दानाचा उद्देशच हा आहे, की समोरच्याची गरज ओळखून अडल्या-नडलेल्याला यथाशक्ती मदत करणे. जलदान केवळ उन्हाळ्यात नाही, तर पावसातही गरजेचे आहे, हे ओळखून वस्त्रगाळ केलेले अथवा उकळलेले पाणी गरजवंतांना द्यावे, यासाठी निर्जला एकादशी निमित्त या विधीचे आयोजन केले आहे.सर्व पापांचा नाश होऊन स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून हे व्रत केले जाते.
आदल्या दिवशी गंगादशहरा पूर्णत्वास जातो. तर ज्येष्ठ शुक्ल एकादशी ही `निर्जला एकादशी' म्हणून प्रसिद्ध आहे. पाण्याचे महत्त्व निर्जला एकादशी केल्याशिवाय कसे कळणार? पाण्याला आपण `जीवन' म्हणतो. `जलति जीवयति लोकानिती' म्हणजे जीव जगवण्याचे काम पाणी करते. मग तो प्राण्यांचा असो की, वृक्षवेलींचा! सर्व उपचारविधी करता येणे शक्य नसेल त्यांनी निदान चार पाच जणांना थंड पेय पदार्थ तरी जरूर द्यायला हरकत नाही.
अशा तऱ्हेने तुम्हीदेखील हे सोपे व्रत अथवा जलदान विधी करून पुण्याचे भागीदार सहज होऊ शकता.