Nirjala Ekadashi 2024: इतर दिवशी तुळशीला पाणी घाला, पण एकादशीच्या दिवशी अजिबात नाही; वाचा नियम!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 03:59 PM2024-06-17T15:59:50+5:302024-06-17T16:00:15+5:30
Nirjala Ekadashi 2024: १८ जून रोजी निर्जला एकादशी आहे, या दिवशी आपण अन्न-पाणी ग्रहण करायचे नाहीच शिवाय तुळशीलाही पाणी घालायचे नाही; सविस्तर वाचा.
हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुळशीचे आयुर्वेदिक फायदेही आपणास माहित आहे. शिवाय तुळशीला धार्मिकदृष्ट्या मातेसमान मानले जाते. ज्या घरात तुळशीची नित्यनेमाने पूजा होते, त्या घरातून दु:खं, दारिद्रय कायमचे निघून जाते. यासाठी प्रत्येक घरात तुळशीचे रोप असतेच.
परंतु तुळशीचे काही नियम आहेत. त्याचे पालन करणे बंधनकारक असते. त्या नियमांचे अचूक पालन केले तरच तुळशी, विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशिर्वाद तुम्हाला कायम लाभेल. म्हणून अनावधानाने देखील तुळशीच्या रोपाबाबत पुढील चुका करू नका अन्यथा आर्थिक अडचणी, आरोग्याची हेळसांड, प्रगतीत अडथळे इ गोष्टी भेडसावतील!
>> तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका. येत्या सोमवारी एकादशी असल्याने हे दोन्ही दिवस सलग येत आहेत. त्यामुळे दोन दिवसात तुळशीचे रोप मान टाकणार नाही, अशा बेताने ठिबक सिंचन सदृश सोय करून ठेवावी.
>> या दिवशी पाणी न घालण्याचे कारण या दोन्ही दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी व्रत करते, उपास करते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचे व्रतभंग होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे.
>> तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मरते. आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते, पण तेव्हा घरादारात तुळशीचे वृंदावन असे. मोठ्या वृंदावनात पेलाभर पाणी सहज शोषले जात असे. परंतु आपण लावलेले रोपटे छोटेसे असते आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर ते मरते. म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल एवढेच पाणी घालावे.
>> कुंडीतून पाणी झिरपेल अशा बेताने दोन छिद्र पाडावीत. तुळशीचे र लावताना कुंडीमध्ये सर्वात खाली वाळूचा एक थर पसरवून घ्यावा. तसेच भुसभुशीत माती, वाळू आणि कोरडे शेण एकत्र करून कुंडीत पसरवून घ्यावा. यात मातीचे प्रमाण सत्तर टक्के, वाळूचे प्रमाण पंधरा टक्के आणि शेणाचे प्रमाण पंधरा टक्के असावे.
>> तुळशीचे रोप निवडताना त्याची पाने चांगली तपासून घ्यावीत. पाने मोठी, छान आणि हिरवीगार असतील आणि त्याला मोहोर असेल, तर ती तुळस चांगली मानली जाते. अशा तुळशीला प्लॅस्टिक आवरणातून बाहेर काढून कुंडीतील मातीत रुजवावे आणि वरून आणखी एक मातीचा थर रचावा व पहिल्या वेळेस व्यवस्थित पाणी टाकून घ्यावे आणि नंतर थोडे थोडे पाणी टाकत राहावे. यात कोकोपीटचाही वापर करता येईल.
>> तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा. अपुऱ्या सूर्य प्रकाशाअभावी तुळशीचे रोपटे मलूल होते आणि त्याची अन्न निर्मिती प्रक्रिया थांबते. काही काळातच रोपटे मान टाकते. म्हणून तुळशीचे रोप सूर्य प्रकाश मिळेल अशा जागी लावावे.
>> तुळशीला कीड पटकन लागते. यासाठी दर वीस-बावीस दिवसांनी त्यावर सैंधव मीठ मिश्रित पाण्याचा फवारा करावा. हा फवारा केल्यानंतर एक दोन दिवसानंतर तुळशीची पाने धुवून मगच वापरावीत.
>> गोवऱ्यांचा एक तुकडा पाण्यात एक दिवसभर भिजवून ते पाणी महिन्यातून एक दोनदा तुळशीला घालावे. तुळशीला आवश्यक सर्व घटक त्यातून मिळतात.
>> तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी मंजिरी फार दिवस ठेवू नये. ती खुडून तिचा चुरा पुन्हा कुंडीतल्या मातीत टाकावा. मंजिरी खुडल्यामुळे आणि वरवरची पाने अलगद तोडल्यामुळे तुळशी अधिकाधिक बहरते, फोफावते.