नित्य नाम वाचे तोचि एक धन्य...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:06 PM2020-12-16T16:06:51+5:302020-12-16T16:07:06+5:30
संतजण म्हणतात मानसिक समाधान मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
प्रचलीत स्पर्धात्मक धावपळीच्या जीवन वाटचालीत माणसाला नामस्मरण करायलाही वेळ नाही आणि तेवढा उत्साहही नसतो. परंतु संतजण म्हणतात मानसिक समाधान मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग तोही पैसे न खर्च न करता कोणता असेल तर केवळ ‘नामस्मरण’ होय. बाह्य जगातील भाैतिक सुविधांच्या विलासात मनाला अजिबात समाधान लाभत नाही. तेव्हा मनुष्य नकळत परमेश्वराकडे धाव घेतो. प्रभुचे नुसते नामस्मरण जरी केले तरी विविध विकारापासून सुटका होते. नाम तुझे देवा, केशवा माधवा। कोणतेही घ्यावे गोडावा तयात।।
संत ज्ञानेश्वर महाराज हरीपाठात सांगतात - सात पाच तीन दशकांचा मेळा, एक तरवी कळा दावी हरी।
तैसे नव्हे नाम सर्वमार्गा वरीष्ठ, तेथे काही सर्वमार्गा लगती।।
सात म्हणजे योगमार्गाच्या ७ पायऱ्या ज्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यानाचा समावेश होतो. ह्यापासून समाधी साधणे होय. पाच म्हणजे पंचाग्नी साधनाचा तपोमार्ग आणि तीन रूपे स्थुल, सुक्ष्म, कारण ह्याच निरास करून, त्याच्या पलीकडे असलेल्या परमतत्वाशी समरसता आणि दशकांचा मेळा म्हणजे पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेद्रीये मिळून दमनाचा मार्ग निर्माण करणे हे सर्व मार्ग व्यवस्थितपणे घडले तर श्रीहरीची एकतत्वी कळा प्रत्यक्षास येवू शकते. परंतु माऊली म्हणतात हे सर्व मार्ग अतिशय कष्टमय आहेत. नाममार्ग मात्र तसा नाही. येथे उपासना करणाऱ्याला कोणतेच कष्ट नाही. नाम मार्ग हा श्रेष्ठ असा पंथराज असल्याचे माऊली स्पष्ट करतात. संत निवृत्तीनाथ वर्णन करतात. नित्य नामवाचे तोचि एक धन्य । त्याचे शुध्द पुण्य इथे माऊली म्हणतात रामकृष्ण नाम जपाचे महत्व आपल्या चिंतनातून मांडले आहे.
नामा म्हणे नाम ओंकाराचे मुळ। परब्रम्ह केवळ रामनाम।।
नाथ महाराज - नाम जयापाशी असे। नारायण तेथे वसे।।
संत जनाबाई - रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप। पापाचे कळप पळती पुढे।।
संत तुकोबा - हेचि सर्व सुख जपावा विठ्ठल। न दवडावा पळ क्षण वाया।।
संत रामदास - हरे राम मंत्र सोपा, जपारे।
संत विठोबाराय - संत एकाती बैसले । सर्व सिध्दांत शोधीले
सार काढीले निवडोनी । ते हे श्री हरीचे नाम।।
संत सेना महाराज - अवघे काळी वाचे म्हणा नारायण। सेना म्हणे क्षण जावू न द्या।।
नामस्मरणाच्या बळावरच संतांना संतपण प्राप्त झाले. दुर्लभ जीवनाचे कल्याण हे नामाचे स्मरणात असल्याने नाम हेच देवाचे रूप समजून त्याचा अंगीकार करायला हवा, संत तुकोबाराय म्हणतात नाशीवंत देह नासेल हा जाण। कारे उच्चाराना वाचे नाम। तुका म्हणे नाम वेदासी आगळे। ते दिले गोपाळे फुकासाठी.
: हभप डाॅ.ज्ञानेश्वर मिरगे
शेगाव