आपण वयाने, हुद्द्याने कितीही मोठे झालो तरी शिक्षकांसमोर लहानच असतो; वाचा गुरुंचे महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 12:31 PM2023-08-02T12:31:56+5:302023-08-02T12:34:40+5:30

योग्य गुरु लाभले तर आयुष्याचे सोने होते, त्यासाठी शिष्यदेखील तसाच गुणवंत असावा लागतो, फोटोतल्या निवृत्त सरन्यायाधीशांसारखा!

No matter how big we are in age and position, we are still small in front of teachers; Read the importance of Guru! | आपण वयाने, हुद्द्याने कितीही मोठे झालो तरी शिक्षकांसमोर लहानच असतो; वाचा गुरुंचे महत्त्व!

आपण वयाने, हुद्द्याने कितीही मोठे झालो तरी शिक्षकांसमोर लहानच असतो; वाचा गुरुंचे महत्त्व!

googlenewsNext

देशाचे निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत मंगळवारी सोलापुरात ते व्याख्यानासाठी गेले होते. तिथे त्यांना शाळेतील शिक्षिका आगरकर बाई भेटल्या. त्यांना पाहताच लळीत यांनी आपल्या वर्गशिक्षिकेला वाकून नमस्कार केला. त्याक्षणी टिपलेले छायाचित्र हे भारताच्या अभिजात गुरु शिष्य परंपरेची साक्ष पटवून देणारे आहे. लळित यांच्या या कृतीने त्यांच्या ठायी असलेली नम्रता आणि शिक्षकांप्रती असलेला आदर दिसून येत आहे. त्यावरून लक्षात येते, की आपण वयाने, हुद्द्याने मोठे झालो तरी आपल्या शिक्षकांसमोर विद्यार्थीच असतो. अशा शिक्षकांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असायला हवा. याबाबतीत स्वामी विवेकानंद यांचे विचार जाणून घेऊ.   

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन आयुष्यातील उदाहरणे देऊन परमार्थ सोपा करून सांगतात. ते म्हणतात, संतांचा, गुरुंचा शोध घेत तुम्ही फिरू नका. खडीसाखरेचा खडा ठेवला, की मुंग्यांना जाऊन सांगावे लागत नाही. त्या आपणहून खडीसाखरेकडे धाव घेतात. त्याचप्रमाणे, तुम्हीदेखील संतांच्या, गुरुंच्या शोधात वेळ वाया घालवू नका. तो वेळ तुम्ही स्वत:च्या जडणघडणीसाठी वापरा. स्वत:ला सिद्ध करा. चांगली व्यक्ती बना. खडीसाखरेसारखा गोडवा स्वत:च्या आणि इतरांच्या आयुष्यात पेरायला शिका. अशा खडीसाखरेची गोडी चाखण्यासाठी चांगले लोक तुमच्याशी आपोआप जोडले जातील. 

ज्याप्रमाणे शिष्य आपल्या गुरुंच्या भेटीसाठी तळमळत असतो, तसा गुरुदेखील सच्चा शिष्यासाठी तळमळत असतो. याबाबीत रामकृष्ण परमहंस यांचा किस्सा आठवतो. त्यांच्या भेटीला आलेल्यांमध्ये नरेंद्र नावाचा बालक आपला भावी शिष्य होईल याची त्यांना आणि नरेंद्रलादेखील कल्पना नव्हती. मित्राच्या सांगण्यावरून नरेंद्रने रामकृष्ण परमहंस यांच्यासमोर एक भजन सादर केले आणि त्याचे सूर रामकृष्णांच्या काळजाला भिडले. त्यांना नरेंद्रमध्ये आपला शिष्य गवसला. परंतु, नरेंद्र स्वत: त्यांची परीक्षा घेईपर्यंत त्यांच्यापासून दूर दूर पळत होता. मात्र, असे केल्याने त्याचेच चित्त विचलित होत राहिले. शेवटी त्याने रामकृष्णांची भेट घेतली. त्या भेटीत रामकृष्णांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि नरेंद्राची क्षणभर समाधी लागली. सगळी चिंता, क्लेष लयाला जाऊन नरेंद्राने परमानंदाची अनुभूती घेतली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रामकृष्णांनी डोक्यावरून हात काढताच नरेंद्राची समाधी भंग झाली. त्या एका क्षणात नरेंद्रची गुरुंवर श्रद्धा जडली आणि त्याने रामकृष्णांचे कायमस्वरूपी शिष्यत्व पत्करले. एवढेच नव्हे, तर भविष्यात स्वामी विवेकानंद म्हणून नावलौकिक मिळाल्यानंतरही गुरुंच्या नावे `रामकृष्ण मिशन' अंतर्गत धर्मकार्य पार पाडले.

गोंदवलेकर महाराजदेखील आपल्याला हेच सांगतात, गुरुंच्या मार्गदर्शनाने तुमचे कार्य सोेपे होईल. त्यांच्याशिवाय तुम्ही कार्य करू पहाल, तर त्या कार्याला मी पणा चिकटेल आणि अहंकार डोकावला, की कार्य पूर्ण होणार नाही. याउलट गुरुंचे मार्गदर्शन लाभल्यामुळे आपण योग्य रितीने कार्य करत आहोत, ही श्रद्धा कायम राहिल आणि मनात कोणतेही द्वैत राहणार नाही. 

भगवंताचे नाम घेतानाही गुुरुंना साक्ष ठेवा. नाम घेण्याला अहंकार चिकटणार नाही. योग्य रितीने नाम घेतले जाईल आणि परमार्थाची वाट सोपी होईल. भगवंताचे नाम औषध आहे. ते घेत राहा. नामामुळे तुमचे मन स्वच्छ झाले, की सद्भावना जागी होईल, सत्कार्य घडेल आणि तुम्ही खडीसाखरेसारखे गोड व्यक्तीमत्त्व व्हाल. मग आपोआपच गुरु, संत तुमच्या कार्याला पुष्टी देण्यासाठी तुमच्याकडे धाव घेतील.

Web Title: No matter how big we are in age and position, we are still small in front of teachers; Read the importance of Guru!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.