कितीही चोरून काम करा, पण 'या' १३ गोष्टी तुम्हाला बघत असतात हे कायम लक्षात ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 11:31 AM2023-12-02T11:31:16+5:302023-12-02T11:31:28+5:30

दुकानात जशी सीसीटीव्हीची आपल्यावर पाळत असते, तशीच निसर्गाने आपल्या कर्मावर लक्ष ठेवण्यासाठी १३ सिसिटीव्ही लावले आहेत हे ध्यानात ठेवा. 

No matter how stealthy you work, always remember that 'these' 13 things are watching you! | कितीही चोरून काम करा, पण 'या' १३ गोष्टी तुम्हाला बघत असतात हे कायम लक्षात ठेवा!

कितीही चोरून काम करा, पण 'या' १३ गोष्टी तुम्हाला बघत असतात हे कायम लक्षात ठेवा!

मांजर डोळे मिटून दूध पिते तेव्हा तिला वाटते की आपल्याला कोणीच बघत नाहीये, त्याप्रमाणेच मनुष्य दुष्कर्म करताना त्यालाही वाटते की आपल्याला कोणीच बघत नाहीये. मात्र भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत सांगितल्यानुसार आपल्या कर्माचे भोग हे आपल्यालाच भोगून संपवावे लागतात. तुम्ही कोणाला दुखवत असाल, फसवत असाल, कोणाशी खोटे बोलले असाल तर त्याक्षणी समोरच्यावर मात केल्याचा तात्पुरता आनंद तुम्हाला मिळेलही, मात्र तुम्ही केलेल्या कर्मातून तुमची सुटका नाही. तुम्ही कुठेही जा, तुमचे कर्म तुम्हाला शोधून काढते आणि चिकटते. त्यामुळे कर्म नेहमी चांगलेच करा असे आपली ज्येष्ठ मंडळी आपल्याला सांगत असत. 

चांगले कर्म करताना आपल्याला कोणाची भीती नसते, उलट चार चौघांनी ते करताना पाहावे आणि आपली दखल घ्यावी, कौतुक करावे अशी आपली माफक अपेक्षा असते. याउलट दुष्कर्म करताना आपल्याला दुसऱ्यांची भीती असते. अगदी गूळ-खोबरं सुद्धा चोरून खाण्याचा मोह झाला तरी ते विनापरवानगीने केलेले दुष्कर्मच! म्हणूनच आपण आपल्या कर्माच्या बाबतीत कायम सावध राहायला हवे. कारण आपण चुकीचे वागत असताना आपले परिचित लोक जरी आपल्याला पाहत नसले तरी पुढील १३ गोष्टी आपल्याला कायम बघत असतात हे ध्यानात ठेवा. 

आपल्यावर पाळत ठेवणाऱ्या १३ गोष्टी जाणून घेऊ!

पंचमहाभूते : जगाच्या पाठीवर कुठेही जा, तिथे पंचमहाभूतांपैकी एकही तत्व नाही अशी जागाच सापडणार नाही. त्यांच्या साक्षीने आपण प्रत्येक कर्म करत असतो. आपल्या कर्माची नोंद ते घेत असतात. ती पंचमहाभूते म्हणजे -

पृथ्वी, जल, अग्नी,  वायू , आकाश 

आपल्या शरीराला चिकटलेले तीन विकार - 

मन, बुद्धी, अहंकार

मन हा विकार नाही, पण आपण एखादी गोष्ट जाणते अजाणतेपणी वाईट केली असेल तर आपले मन आपल्याला दोष देत राहते. म्हणून वाईट वागणाऱ्याला लोक म्हणतात, 'जनाची नाही तर निदान मनाची तरी (लाज) ठेव! त्यामुळे मन स्वच्छ असायला हवे. बुद्धी आपल्या शरीराला निर्णय घेण्याचे आदेश करते, आपण त्यांचे पालन करतो. त्यामुळे बुद्धीला चांगले कर्म करण्याची सवय लावावी लागते. अहंकार हा विनम्र मनुष्यालाही ताठर बनवतो. त्याची बाधा झालेल्या मनुषयाला चांगल्या वाईट गोष्टीतला फरक कळत नाही. अशी व्यक्ती अहंकारापोटी आपलेच खरे करण्याचा आणि दुसऱ्याला खोटे पाडून अहंकार पोसण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे कुकर्मात भर पडत जाते आणि हाच विकार आपल्या दुष्कृत्याचा साक्षीदार होतो. 

चंद्र, सूर्य, तारे, दहा दिशा

पृथ्वीवरून दिसणारे देव असे संबोधन पुढील घटकांना दिले जाते. जोवर आपण पृथ्वीवर आहोत तोवर आपण त्यांची नजर चुकवू शकत नाही. ते आपल्या चांगल्या वाईट कर्माचे साक्षीदार असतात व काय राहतील. 
 
आणि सरतेशेवटी मुख्य साक्षीदार म्हणजे हृदयात असलेला परमात्मा! तो आपल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवून असतो. आपण चांगले वागलो तर चांगले फळ देतो आणि वाईट वागलो तर वाईट फळ मिळते. त्याच्यापासून आपली सुटका नाही. 

त्यामुळे पुढच्या वेळी वाईट कृत्य करताना सीसीटीव्ही प्रमाणे हे १३ घटक आपल्या कार्याची, कर्माची नोंद घेत आहेत हे लक्षात ठेवा!

Web Title: No matter how stealthy you work, always remember that 'these' 13 things are watching you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.