कितीही नावडते काम असू द्या, ते आनंदाने करण्यासाठी मनापासून म्हणा 'एकदम ओक्के'!'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 01:44 PM2022-07-04T13:44:57+5:302022-07-04T13:45:33+5:30
आयुष्य किरकिरत घालवण्यापेक्षा मिळालेल्या गोष्टींचा आनंद कसा घ्यायचा हे सांगताहेत ओशो!
'काय झाडी...काय डोंगार...काय हाटील...एकदम ओक्के' हे वाक्य सध्या फार गाजतंय. या वाक्यावर लोकांनी आपापल्या सोयीने बदल करून आनंद घेतला. पण अशी मनासारखी परिस्थिती कायम असतेच असे नाही. यासाठी परिस्थिती कशीही असली तरी शेवटचा शब्द लक्षात ठेवून म्हणा...सगळंच ओक्के! याबाबतीत ओशोंचे विचार अनुकरणीय आहेत.
जीवनाचे तत्त्वज्ञान साधेसोपे करून सांगायची ओशोंची विशिष्ट हातोेटी आहे. आता हेच बघा ना, गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला उपदेश ओशोंही एका वाक्यात समजवून सांगितला आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात,
कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन,
मा कर्मफलहेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणि।।
हे पार्थ, तुला तुझे कर्म करायचे आहे. ते कर्म, तुला आवडो, न आवडो, त्याचे फळ मिळो न मिळो, त्याचा परिणाम होवो न होवो, तू तुझे कर्म करणे अपेक्षित आहे. त्याचे फळ काय मिळेल, याचा विचार करत बसलास, तर हातून कर्म घडणारच नाही.
आयुष्यात प्रत्येकाला वाटते, आपल्याला 'ड्रीम जॉब' मिळावा. परंतु, उद्योजक रतन टाटा सुद्धा ओशोंप्रमाणेच म्हणतात, 'ड्रीम जॉब' वगैरे संकल्पना अस्तित्त्वात नसते. आवडीचे काम मिळूनही, त्याला अनुकूल स्थिती मिळेल असे नाही, अनुकूल स्थिती मिळाली, परंतु काम आवडीचे मिळेलच असे नाही. अशा परिस्थितीत आपली मनस्थिती तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतली आणि कामात स्वत:ला झोकून दिले, की आवडते, नावडते असे कामाचे स्वरूप राहणारच नाही. हाताला काम मिळाले, तर बुद्धीला चालना मिळत राहील.
काम न करता जो बसतो, त्याला 'रिकामा' म्हणतात. अशा लोकांना समाजातच काय, तरी घरातही किंमत नसते. अनेक ठिकाणी ठळक अक्षरात पाटीदेखील लिहिलेली असते, 'कामाशिवाय बसू नये.' रिकामे, आळशी, कर्तव्यशून्य लोकांची घरात, कार्यालयात अडगळ होते. याउलट कामसू व्यक्ती प्रत्येकाला आवडते. ज्येष्ठ मंडळीदेखील निवृत्तीनंतर स्वत:मागे रोजची कामे लावून घेतात. बागकाम, भाजीकाम, वाचन, लेखन,मनन, नातवंडांना खेळवणे, शाळेतून ने-आण करणे, इ. यामुळे त्यांचे मन गुंतून राहते आणि वेळ चांगला जातो.
काही जण रतीब टाकल्यासारखे काम करतात. अशा लोकांना आपल्या कामात कधीच रस वाटत नाही. उलट लोकांचे काम किती श्रेष्ठ, आपले कनिष्ठ अशी तुलना करण्यात ते वेळ वाया घालवतात. त्यापेक्षा, कामाची शैली बदलली, तर रोजचेच रटाळ काम आनंददायी वाटू लागते.
गृहिणींनाही कामाचा कंटाळा येतो, परंतु त्या आपल्या स्वयंपाकगृहाला प्रयोगशाळा बनवतात आणि साधी फोडणीची पोळी आणि शिळा भातसुद्धा 'माणिकमोती' म्हणत पेश करतात. रोज तेच धान्य, तेच मसाले, त्याच भाज्या, तरी त्याला वेगवेगळे वळण देऊन जेवणाची लज्जत वाढवण्याचे कसब त्यांनी अंगिकारले असते. आपणही आपल्या कार्यशैलीत बदल करून रोजच्या कामाची लज्जत पाहिजे.
आपल्या कामाकडे तुम्ही कसे पाहता, कसे लेखता, कसे करता, यावर कामाची प्रत ठरते. कोणतेही काम कमी नाही, फक्त तुमच्या कार्यपद्धतीवर त्या कामाची गुणवत्ता ठरत असते.
गानसरस्वती किशोरीताई आमोणकर एकदा म्हणाल्या होत्या, `सूरात मी पक्की झाले, ते माझ्या आईमुळे. प्रत्येक गोष्ट अचूक झाली पाहिजे, असा तिचा नेहमीच आग्रह असे. साधा केर काढायचा असेल, तरीदेखील तो इतका स्वच्छ काढावा, की कोणालाही त्या कामाचेदेखील कौतुक वाटले पाहिजे.'
आपण अनेकदा आपली कामे दुसऱ्यांवर सोपवून निर्धास्त होतो. का? तर, आपल्याला खात्री असते, संबंधित व्यक्ती कामात चुकणार नाही, आपले नुकसान होणार नाही. मग, संबंधित व्यक्ती जर ते काम अचूक करत असेल, तर आपण का नाही? हा प्रश्न सतत, स्वत:ला विचारत राहा. आपले काम आनंदाने करा. नाचत-गात राहा.. मग बघा, आयुष्य कधीच कंटाळवाणे वाटणार नाही... कधीच नाही!