देव कोणत्या स्वरूपात मदतीला येईल, हे कोणीही सांगू शकत नाही, आता हीच गोष्ट पहा ना...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 05:39 PM2021-05-31T17:39:40+5:302021-05-31T17:39:57+5:30

प्रसंग कोणताही असो, मनोबल ढासळू देऊ नका, ईश्वराप्रती श्रद्धा कमी होऊ देऊ नका, मदतीचा हात मिळतोच! कधी देवाकडून तर कधी देवदूतांकडून!

No one can say in what form God will come to help, now look at this ... | देव कोणत्या स्वरूपात मदतीला येईल, हे कोणीही सांगू शकत नाही, आता हीच गोष्ट पहा ना...

देव कोणत्या स्वरूपात मदतीला येईल, हे कोणीही सांगू शकत नाही, आता हीच गोष्ट पहा ना...

Next

सुटीच्या काळात फेरफटका मारण्यासाठी एक माणूस समुद्रकिनारी गेला. हवामानाचा अंदाज घेत त्याने एकट्याने समुद्रसफारी करण्याचा निर्णय घेतला. एक नाव घेऊन तो समुद्रसफारीला निघाला. लाटांवरून नौका वर खाली डुचमळत होती. सुरुवातीला थोडी भीती वाटत हळू हळू तो सरावला. परंतु, समुद्रसफारीचा आनंद घेत आपण किनाऱ्यापासून बरेच दूर आलो आहोत, हे त्याच्या लक्षात येताच त्याने नाव परत नेण्यासाठी वळवली. अचानक पाण्यामध्ये भोवरा तयार झाला आणि पाहता पाहता लाटांचे वेटोळे नावेला गोल गोल घुमवू लागले.

नावेत बसलेला माणूस देवाचे नाव घेत जीव मुठीत घेऊन प्राण वाचवण्यासाठी धडपडू लागला. त्या भोवऱ्यात नाव अशीकाही अडकली, की नावेचा चुराडा झाला. सुदैवाने तो वाचला आणि तो भोवरा शांत झाल्यावर लाटेसरशी दूर निर्जन बेटावर फेकला गेला. 

त्याची शुद्ध हरपली होती. तो शुद्धीवर आला तेव्हा सभोवताली कोणीच नाही पाहून खूप घाबरला. त्याला सगळा प्रसंग आठवला. आपण जिवंत आहोत, याचा त्याला आनंद वाटला. त्याने मनोमन देवाचे आभार मानले. देवाला सांगितले, `तू जगवले आहेस तर आता पुढे जाण्याचा मार्गही तूच दाखव!'

भूकेची वेळ झाली. तिथल्या जंगलात वणवण फिरून त्याने फळे गोळा केली आणि एक रात्र तिथल्या भयाण जंगलात वास्तव्य केले. पुढचा मार्ग दिसेपर्यंत तिथे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु जंगली श्वापदांची भीती होतीच. म्हणून त्याने काट्याकुट्या गोळा करून झोपडी बांधली. बऱ्याच मेहनतीने झोपडी बांधल्यावर त्याने स्वत:चीच पाठ थोपटली, तेवढ्यात... वातावरणात एकाएक बदल झाला. निरभ्र आकाशात काळे ढग गोळा झाले आणि कडाड कडकड अशी वीज चमकली आणि क्षणार्धात वीज कोसळून झोपडीचा भूगा झाला. झोपडीला लागलेल्या आगीच्या ज्वाला आकाशाकडे झेपावत होत्या.

तो माणूस देवाला आणि दैवाला दोष देत कपाळाला हात लावून आक्रोश करू लागला. देवाला वाट्टेल ते बोलू लागला. काही वेळात तिथे मोठा आवाज आला आणि वर आर्मीचे हेलिकॉप्टर दिसले. त्यातून दोन माणसं दुर्बिणीने झोपडीच्या दिशेने पाहत होती. तिथे माणूस दिसताच त्यांनी बचाव कार्य सुरू केले आणि अवघ्या काही मिनीटांत त्या माणसाला निर्जन बेटावरून सुखरूप त्याच्या जागी पोहोचवले. झोपडी जळली म्हणून देवाला दोष देणारा तो, जळत्या झोपडीकडे लक्ष वेधून देवदूतांना पाठवल्याबद्दल देवाचे आभार मानू लागला.

म्हणून प्रसंग कोणताही असो, मनोबल ढासळू देऊ नका, ईश्वराप्रती श्रद्धा कमी होऊ देऊ नका, मदतीचा हात मिळतोच! कधी देवाकडून तर कधी देवदूतांकडून!

Web Title: No one can say in what form God will come to help, now look at this ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.