'त्या' मृत्युच्या गुफेत गेलेले कोणीच आजवर परतले नाही; का? वाचा ही गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: March 18, 2021 07:46 PM2021-03-18T19:46:08+5:302021-03-18T19:47:01+5:30

दुसरे सांगतात त्या गोष्टी ऐका, त्याचा विचार करा आणि तुमच्या मनाला पटेल, तीच कृती करा. 'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे...!'

No one who went to the cave of death has returned to this day; Why? Read this story! | 'त्या' मृत्युच्या गुफेत गेलेले कोणीच आजवर परतले नाही; का? वाचा ही गोष्ट!

'त्या' मृत्युच्या गुफेत गेलेले कोणीच आजवर परतले नाही; का? वाचा ही गोष्ट!

Next

'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा' अशी आपल्याकडे एक म्हण आहे. याचा अर्थ असा, की दुसऱ्याच्या अनुभवातून आपण शहाणे व्हायचे असते. परंतु, दरवेळी दुसरे सांगतात म्हणून आपण आपले मत बनवायचे नसते, कधी कधी काही गोष्टी स्वानुभवातूनही शिकायच्या असतात. आयुष्यात थोडाफार धोका प्रत्येकाला पत्करावाच लागतो. जिंकलो तर यश मिळते आणि हरलो तर अनुभव! हेच शिकवणारी एक बोधकथा...

एका गावात एक गुफा होती. अतिशय भयाण असा तिचा परिसर होता. तिथे जायला गावकरी घाबरत असत. ज्याने तिथला रस्ता धरला तो तिथून कधीच परतला नाही, असा आजवरचा इतिहास होता. 

त्या गावात एक सरकारी कर्मचारी बाहेर गावातून आला होता. गावाचा फेरफटका मारत एक दिवस त्याने गुफेकडे जाणारी पायवाट पाहिली. त्याने गावकऱ्यांकडे चौकशीदेखील केली. कोणी त्याला उत्तर दिले नाही. कर्मचाऱ्याने सरपंचांना गाठले. तो त्यांना म्हणाला, 'सरपंच, गावकरी मला त्या गुफेबद्दल काहीच सांगत नाहीत. तुम्ही तरी सांगा, असे काय विशेष आहे त्या गुफेत?'

सरपंच भीतभीत म्हणाले, 'आम्ही सगळे तिला मृत्यूची गुफा म्हणतो. तिथे गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाही.'
कर्मचारी म्हणाला, `ही सगळी अंधश्रद्धा आहे. तुम्ही स्वत: कधी अनुभव घेतला आहे का?'
सरपंच म्हणाले, `मृत्यूच्या वाटेवर आपणहून कोण चालत जाईल? आम्ही कोणीच तिथे जात नाही, तुम्हीसुद्धा जाऊ नका!'
कर्मचारी म्हणाला, `मी तुम्हा सगळ्यांचा भ्रम दूर करतो. उद्या सकाळी सगळ्या गावकऱ्यांसमोर मी त्या गुफेत जातो.'

गावभर चर्चा झाली. सगळे गावकरी उत्सुकतेने त्या वाटेवर जमले. सरकारी कर्मचारी अगदी उत्साहाने गावकऱ्यांचा निरोप घेऊन त्या वाटेने निघाला. 
बिंदूचा ठिपका होईपर्यंत गावकरी त्याची पाठमोरी आकृती पाहत राहिले. पुढे तो दिसेनासा झाला.

इकडे कर्मचारी गुफेत पोहोचला. तिथे त्याला काळाकुट्ट अंधार दिसला. तो आत चालत राहिला. तेवढ्यात त्याला मागून कोणीतरी जोरात धक्का दिल्याचा भास झाला. तो घाबरला. अडखळत पुढे जाऊन पडला. तर पुढे त्याला लख्ख प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशात त्याला अनेक लोकही दिसले. तो त्या दिशेने चालू लागला. तिथल्या लोकांना भेटला. त्यांना विचारले, तुम्ही कोण?

यावर लोक म्हणाले, 'आम्ही या मृत्यूच्या गुफेचे रहस्य जाणून घेण्यासाठी आलो होतो. परंतु इथे आल्यावर आम्हाला कळले, की गावात ज्या सुख सुविधा नाहीत, त्या सर्व इथे आहेत. मग आम्ही परत गेलोच नाही, इथेच रमलो.'

कर्मचाऱ्याला त्यांचे म्हणणे पटले. त्यालाही ती नवी दुनिया आवडली. तोही तिथेच रमला. गावकरी मात्र त्यालाही मृत्यूच्या गुपेâने गिळला, या विचाराने परतले आणि एका स्वर्गासमान असणाऱ्या नव्या दुनियेला मुकले.
म्हणून दुसरे सांगतात त्या गोष्टी ऐका, त्याचा विचार करा आणि तुमच्या मनाला पटेल, तीच कृती करा. 'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे...!'
 

Web Title: No one who went to the cave of death has returned to this day; Why? Read this story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.