वारी नाही....पण श्रद्धाभाव कायमच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 12:46 PM2020-06-27T12:46:14+5:302020-06-27T12:46:25+5:30
वारकरी सांप्रदायातील वारकरी घरीच बसून आषाढी वारीचा आनंद सोहळा घेण्यात मानतो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पंढरपूरची वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील सर्वात मोठा वारकरी सोहळा आहे. लाखो वारकरी कोणत्याही नियोजनाशिवाय स्वयंप्रेरणेने पंढरपूरला येतात. प्रत्येक वारीत पांडुरंगाकडे एकच मागणे मागत असतो की, ‘पंढरीचा वारकरी... वारी चुकू न द्यावी हरी...!’ मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी आणि पायी पालखी सोहळा होणार नसल्याने वारकरी सांप्रदायातील वारकरी घरीच बसून आषाढी वारीचा आनंद सोहळा घेण्यात मानतो आहे.
ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता समतेची पताका खांद्यावर, कोणी उच्च नाही, स्त्री-पुरुष समानता, एकमेकांच्या पाया पडणारे, आपली शेकडो वर्षांची परंपरा जोपासणारे वारकरी. एकीकडे पावसाची चाहूल लागत असताना दुसरीकडे विठुरायाच्यादर्शनाची आस भाविकांना लागत असते. शेकडो मैल चालत येऊन सावळ््या विठुरायाचे दर्शक घेण्याची शेकडो वर्षांपासून सुरु असलेली वारकरी संप्रदायाची परंपरा कोरोनामुळे खंडित झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासूनचा हा पहिला आषाढी साहळा असेल की, सर्वसामान्य भाविक पंढरपुरला जाऊन सावळ््या विठुरायाचे पदस्पर्श व मुखदर्शन घेऊ शकत नाहीत. असे असले तरी मनातला भाव आणि विठ्ठलाप्रती असलेली ओढ कमी होणार नसल्याचे वारकरी सांप्रदायातून सांगितले जात आहे. कोरोना महामारीचे संकट पांडुरंग लवकरच दूर करेल, असाही विश्वास वारकऱ्यांनी बोलून दाखविला.
दरवर्षी पंढरपूर येथे जात असतो. लग्न झाल्यानंतर जी पंढरपूर वारी सुरू केली ती आता यावर्षी कोरोनामुळे खंड पडली तरी आमचा विठ्ठल आम्हाला शेतमाउली व गावकुसातील मंदिरात दर्शन देईल, अशी श्रद्धा आहे. गावातील मंदिरात पूजाअर्चा करणार असल्याचे सांगितले.
- शंकरराव शेळके
चांगलवाडी
सतत ४० वर्ष वारीची परंपरा जोपासली. कधी खंड पडू दिला नाही; मात्र यावर्षी कोरोनामुळे वारीमध्ये खंड पडला. वारी नाही म्हटल्यावर जिवाला हुरहुर वाटत आहे; परंतु कोरोनाचे संकट असल्याने घरीच राहून विठ्ठलाच्या नामस्मरणात यावर्षी आषाढी साजरी
- हभप सुभाष महाराज इंगळे
पातूर
मी गेल्या १५ वर्षांपासून पायदळ पंढरपूरला अखंडित जात आहे; मात्र यावर्षी आपल्या देशावर आलेल्या कोरोना महामारीमुळे यावर्षी मी जाऊ शकत नाही. त्यामुळे अंत:करण भरून येत आहे. यावेळी घरीच पूजा करून महामारी लवकरच जावो, अशी प्रार्थना करणार आहे.
- लीलाबाई महादेव सापधारे, मुंडगाव
गावातील ३० ते ३५ महिला, पुरुष आमच्या सोबत पंढरपूर येथे दर्शनासाठी जात असतात. या वर्षी कोरोना प्रतिबंधामुळे ते शक्य नाही. विठ्ठल चरचरात वसला आहे. तो आमची दर्शन वारी मनोभावे पूर्ण करेल. तनाने वारीत खंड पडला तरी मनाने वारी पूर्ण होईल.
- हभप विनायक महाराज ठाकरे
करण
दरवर्षी माझी वारी पूर्ण होते.
पिढ्यान्पिढ्या आमचे घरी पंढरीची वारी आहे. ती यार्षी खंडित झाल्याने मन व्यथित झाले आहे. आषाढवारीविना नाही, आवड दुसरी काही. पंढरीचा विठुराया जळी, स्थळी सर्वव्यापी आहे. शुद्ध अंत:करणात तो वसलेला आहे.
- जनार्धन ठाकरे
लोहारी चिंचखेड, ता. अकोट