शरीरावर नव्हे, तर मनावर आघात करणारा, शाहीर अनंत फंदी यांचा 'फटका!'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 12:12 PM2020-12-05T12:12:35+5:302020-12-05T12:13:52+5:30
अनंत फंदींच्या फटक्यात फार मोठा तात्विक उपदेश आहे असे नव्हे, पण पेशवाईच्या अखेरच्या काळात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी उलाढाल झाली होती. शाहीरांच्या लावण्यांमुळे आणि रावबाजीमुळे इष्काची चटक सर्वांना लागली होती. नीतीचे बंधन फारसे उरले नव्हते. या पार्श्वभूमीवर अनंद फंदी यांचा हा फटका महत्त्वाचा मानावा लागेल.
कीर्तन, प्रवचन, शाहिरी, लावण्या, वगनाट्य या लोककलांनी आजवर समाज प्रबोधनाच्या दृष्टीने भरीव कामगिरी केली आहे. आताच्या काळात लोककलांना पूर्वीसारखे सुगीचे दिवस नसले, तरीदेखील त्या आपले अस्तित्व टिकवून आहेत. याचे श्रेय जाते, लोक कलाकारांना! आताचे लोककलाकार आपली इतर व्यावसायिक व्यवधाने सांभाळून लोककला सादर करतात, परंतु पूर्वी लोककला, याच लोककलाकारांच्या चरितार्थाचे साधन होत्या. पूर्णवेळ व्यवसाय म्हणून कलाकार त्यावर अवलंबून राहू शकत होते. कारण, त्याकाळात लोककलांचे कार्यक्रम हेच मनोरंजनाचे माध्यम होते.
मनोरंजनातून प्रबोधन तसेच राष्ट्रकार्याचे काम लोककलाकारांनी केले. त्यातील एक नाव शाहीर अनंत फंदी. त्यांचा काव्यप्रवास विस्मयकारक आहे. त्यांच्या शब्दांना लालित्य होते, तशीच मार्मिक घाव करणारी धारही होती. म्हणून त्यांनी लिहिलेल्या अनेक काव्यरचना `फटका' म्हणूनही प्रसिद्ध आहेत. हा फटका शरीरावर नव्हे, तर ऐकणाऱ्याच्या मनावर बसे. अशा लेखणीची आजही समाजाला गरज आहे.
हेही वाचा : ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा बहुमूल्य विचार!
पेशवाईच्या अखेरीस राम जोशी, प्रभाकर दातार, अनंत फंदी इ. शाहिरांनी लावण्या व पोवाडे लिहून मराठी मनाची करमणूक केली. यातील बहुतेक शाहीर आपल्या अखेरच्या काळात ईशचिंतनाकडे वा परमार्थाकडे वळलेले दिसतात. परंतु हे शाहीर प्रथमत: प्रतिभावान कवी आहेत आणि नंतर त्यांनी डफ, तुणतुणे हातात घेऊन त्या कवीतांना पोवाड्याच्या ढंगात पेश केले.
अनंतफंदीस "फंदी" नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले. वर सांगितलेले चौघे फंदी तमाशा घेऊन होळकरशाहीत गेले. अनंत फंदींनी आठ लावण्या व काही पोवाडे रचले. त्यांची 'रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना ‘फटका‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते[१]. शंकराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. शार्दूलविक्रीडित, शिखरिणी या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत.
अठराव्या शतकातील अनंत फंदी हा एक रसिकतेने शृंगारिक लावण्या लिहिणारा शाहीर होता. पण देवी अहिल्याबाई यांच्या सांगण्यावरून अनंत फंदी परमार्थाकडे वळले. देवधर्माची पदे ते जुळवू लागले. पण त्यांची प्रवृत्ती उपदेशपर फटके लिहिण्याची होती. त्यांनी लिहिलेले अनेक फटके प्रसिद्ध आहे. पैकी एका फटक्यातील ओळी सर्वांच्याच परिचयाच्या आहेत.
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको,
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको।
चल सालसपण धरुनि निखालस खोट्या बोला बोलू नको,
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको,
नास्तिकपणात शिरुनि जगाचा बोल आपणा घेऊ नको,
मी मोठा शहाणा धनाढ्यही गर्वभार हा वाहू नको,
दो दिवसाची जाइल काया अपेश माथा घेऊ नको,
स्नोहासाठी पदरमोड कर परि जामिन कोणा राहू नको।
अनंत फंदींच्या फटक्यात फार मोठा तात्विक उपदेश आहे असे नव्हे, पण पेशवाईच्या अखेरच्या काळात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी उलाढाल झाली होती. शाहीरांच्या लावण्यांमुळे आणि रावबाजीमुळे इष्काची चटक सर्वांना लागली होती. नीतीचे बंधन फारसे उरले नव्हते. या पार्श्वभूमीवर अनंद फंदी यांचा हा फटका महत्त्वाचा मानावा लागेल.
या कवनात कवी म्हणतो, की मनुष्या, उगाच भलत्यासलत्या फंदात पडून आयुष्य वाया घालवू नकोस. सुखाने घरीच आपला संसार कर. खोटे कधी बोलू नकोस. परस्त्री व परधन यांचा लोभ धरू नकोस. तू सदा नम्र वृत्ती धारण कर. नास्तिक बनू नकोस. आईवडिलांवर रागवू नकोस. पोटासाठी भलत्यासलत्या उठाठेवी करू नकोस. कोणास वर्म काढून बोलू नकोस. मी मोठा शहाणा असा गर्व करू नकोस. गरिबावर व्यर्थ गुरकावू नकोस. सत्ता आज असेल, पण उद्या नाही. चुकीच्या व्यक्तींसाठी जामीन राहू नकोस. पैजेचा विडा उचलू नकोस. उगीच भीक मागू नकोस. कष्टाची तयारी ठेव.
असे हे शाहिरांचे मार्मिक बोल स्मरणात ठेवूया आणि धोपट मार्गाचा प्रवास करूया.
हेही वाचा : प्रतिक्रिया टाळा आणि प्रतिसाद द्यायला शिका, आयुष्यात खूप यशस्वी व्हाल! - गौर गोपाल दास