"नुसते नको उच्चशिक्षण, आता व्हावा कष्टिक बलवान, सुपुत्र भारताचा"- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 11, 2020 07:30 AM2020-11-11T07:30:00+5:302020-11-11T07:30:00+5:30

शिक्षण हा संस्काराचा एक भाग आहे. म्हणून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये. आजचे विद्यार्थी उद्याचा समाज घडवणार आहेत. समाज सुसंस्कृत बनावा असे वाटत असेल, तर बालपणीच चांगल्या मुल्यांची पेरणी व्हायला हवी.

"Not just higher education, now let's be hard strong, son of India" - Rashtrasant Tukadoji Maharaj | "नुसते नको उच्चशिक्षण, आता व्हावा कष्टिक बलवान, सुपुत्र भारताचा"- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

"नुसते नको उच्चशिक्षण, आता व्हावा कष्टिक बलवान, सुपुत्र भारताचा"- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ 

मनुष्य केवळ सुशिक्षित असून उपयोगी नाही, तर तो सुसंस्कृतदेखील असायला हवा. शिक्षणामुळे या दोन्ही गोष्टी साध्य होतात, मात्र ते शिक्षण केवळ पुस्तकी असून चालणार नाही, तर ते सर्वांगीण शिक्षण असायला हवे. आज राष्ट्रीय शिक्षण दिन आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत शिक्षणाबद्दल काय मार्गदर्शन केले आहे, ते थोडक्यात पाहू.

पाठशाळा असावी सुंदर, जेथे मुले मुली होती साक्षर,
काम करावयासि तत्पर, शिकती जेथे प्रत्यक्ष,

हे वर्णन त्यांनी ग्रामशिक्षणाला उद्देशून केले आहे. कारण, शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार प्रसार कमी प्रमाणात झाला आहे. गावांचा विकास झाला, तर शहराचा विकास होईल आणि शहरांचा विकास झाला, तरच देशाचा विकास होईल. या उद्देशाने त्यांनी ग्रामीण शाळा अद्यावत शिक्षण साधनांनी युक्त असाव्या, असे सुचवले आहे. तिथे मुले-मुली असा भेद न होता, दोहोंना शिक्षणाची समान संधी मिळू शकेल.

हेही वाचा : भगवान गौतम बुद्ध सांगतात, 'उक्तीला कृतीची जोड हवी!'

जो पुढे ज्यात असे निष्णात, त्या विद्येचा घेऊ द्यावा अंत,
होऊ द्यावे अभ्यासे संशोधनात, गर्क त्याला,

सर्व मुलांना एका पठडीतले शिक्षण न देता, मुलांचा अभ्यासातील, कलेतील, कामातील कल लक्षात घेऊन त्यांना विशेष शिक्षण दिले पाहिजे. असे शिक्षण, जे भविष्यात त्यांच्या रोजगाराचे आणि उत्कर्षाचे साधन बनू शकेल. केवळ परीक्षेतील गुणांवर मुलांची गुणवत्ता ठरवणे चुकीचे ठरेल. कोणी शिक्षणात तरबेज असेल, तर कोणी चित्रकलेत, कोणाला कलाकौशल्याची आवड असेल, तर कोणाला शिवणकामाची. ही आवड लक्षात घेऊन मुलांना शिक्षण दिले, तर त्यांचे आयुष्य मार्गी लागेल.

ऐसे जीवन आणि शिक्षण, यांचे साधावे गठबंधन,
प्रथमपासुनि सर्वांगीण, शिक्षण द्यावे तारतम्ये,

या पद्धतीचे शिक्षण दहावी-बारावीनंतर न देता, प्राथमिक इयत्तेपासून दिले जावे. जेणेकरून माध्यमिक इयत्तेत प्रवेश करेपर्यंत मुलांची आवड लक्षात येईल आणि त्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करता येईल. 

जीवनाचे प्रत्येक अंग, शिकवावा महत्त्वपूर्ण उद्योग,
काम करावयाची चांग, लाज नसावी विद्यार्थ्या

कोणतेही काम त्याज्य नाही. कोणतेही काम कमी नाही. हे मुलांवर बालपणापासून बिंबवले गेले पाहिजे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्राप्रमाणे अन्य क्षेत्रांनाही उठाव दिला पाहिजे. अन्यथा बेरोजगार पदवीधारकांच्या संख्येत भर पडत राहिल. याकरीता मुलांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र पालकांनी निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे आणि त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात उच्च स्थान मिळवण्यासाठी प्रोत्साहित करावे.

मुलगा वरोनि दिसे शिक्षित, काम करतांदि दिसे निष्णात,
कामाची लाजचि नाही ज्यांत, जन्मास आली

आपण निवडलेल्या कामाचा आपणास सार्थ अभिमान वाटायला हवा. शिवाय, तो अभिमान सार्थही ठरवता यायला हवा. 

जीवनाचे उज्ज्वल अंग, मुले शिकतील होवोनि दंग,
वाढेल गावाचा रागरंग, म्हणाल तैसा।

शिक्षण ही काळाची गरज आहे. मुलांनी विद्यार्थी दशेत खूप अभ्यास करावा, नानाविध कला आत्मसात कराव्या, भाषा शिकाव्या आणि स्वत:बरोबर सकळांचा विकास करावा. तरच प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर बनेल आणि तिच्याबरोबर देशही आत्मनिर्भर होईल.

आजचे सान सान बाळ, उद्या तरुण कार्यकर्ते होतील,
गावाचा पांग फेडतील, उत्तमोत्तम गुणांनी।

शिक्षण हा संस्काराचा एक भाग आहे. म्हणून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये. आजचे विद्यार्थी उद्याचा समाज घडवणार आहेत. समाज सुसंस्कृत बनावा असे वाटत असेल, तर बालपणीच चांगल्या मुल्यांची पेरणी व्हायला हवी. या सर्वाबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुलांना उच्च शिक्षण घेतल्यानंतरही देशाप्रती प्रेम वाटले पाहिजे. यासाठी राष्ट्रीय शिक्षणही दिले पाहिजे. तरच, भारतभूमीच्या अंगाखांद्यावर मोठी झालेली चिमणीपाखरे प्रदेशात उडून न जाता, मायभूमीच्या विकासासाठी झटतील. 

पढेगा इंडिया, तभी तो बढेगा इंडिया! जय हिंद!

हेही वाचा : खरा यज्ञ कोणता विचाराल, तर तो आहे निष्काम कर्माचा!

Web Title: "Not just higher education, now let's be hard strong, son of India" - Rashtrasant Tukadoji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.