कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही, देवही नाही!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 29, 2020 07:20 AM2020-11-29T07:20:00+5:302020-11-29T07:20:02+5:30
धीर, संयम, सबुरी अंगात बाणून घेतली, तर योग्य वेळी योग्य गोष्टी नक्कीच आपल्या पदरात पडू शकतील.
ज्योत्स्ना गाडगीळ
'पी हळद हो गोरी' असा आपल्याकडे एक वाकप्रचार आहे. म्हणजेच, आपल्याला कोणतीही गोष्ट विनासायास मिळवण्याची घाई लागलेली असते. मात्र, तसे होत नाही. इंन्स्टंट मॅगी बनवायची म्हटली, तरी दोन मिनीटे थांबण्याचा कालावधी अनिवार्य आहेच. हे कळत असूनसुद्धा आपण बऱ्याचदा संयम गमावून बसतो. अधीर होतो. अधीरता बळावली, की त्याचे पर्यवसान क्रोधात होते आणि क्रोधाचे स्वरूप वाढले, तर आपली बुद्धी भ्रष्ट होते. धीर, संयम, सबुरी अंगात बाणून घेतली, तर योग्य वेळी योग्य गोष्टी नक्कीच आपल्या पदरात पडू शकतील. हेच सांगणारी, छोटीशी बोधकथा!
हेही वाचा : अतिहव्यासापायी तुमची त्रिशंकूसारखी अधांतरी अवस्था झाली आहे का?
एक सुशील राजा होता. त्याला एके दिवशी देवाच्या दर्शनाची तीव्र तळमळ लागली. तेव्हा त्याने आपल्या सभेतील पंडितांपैकी प्रत्येकाला, `तुम्ही देव पाहिलात का?' असा प्रश्न विचारला. तेव्हा ज्याअर्थी आपण मोठे पंडित म्हणवून घेतो, त्याअर्थी नाही म्हणणे शोभणार नाही. अशा विचाराने प्रत्येकाने होय असे उत्तर दिले. ते ऐकताच राजा म्हणाला, `तर मग आत्ताच्या आत्ता मला देवाचे दर्शन घडवा.' पंडित म्हणाले, `सहजासहजी देवाचे दर्शन कसे होईल?' त्यासाठी खडतर उपासना करावी लागते. त्यावर राजाने त्यांची निर्भत्सना करून त्यांना हद्दपार केले.
पुढे तो राजा बाबा, वैरागी जो कोणी भेटेल त्याला हाच प्रश्न करू लागला. परंतु, सर्वांकडून वरीलप्रमाणेच उत्तर मिळाल्यामुळे शेवटी राजा उदास झाला.
पुढे एके दिवशी अकस्मात राजसभेत एका साधूचे येणे झाले. राजाने त्यास बसावयास आसन देऊन वरीलप्रमाणे प्रश्न विचारला. तेव्हा साधू म्हणाला, `राजा, तू आधी माझे सांगणे ऐक. त्यावर तुझ्या प्रश्नाचे मी समर्पक उत्तर देईन या गावात जेवढे म्हणून सराफ आहेत, त्या सर्वांना तू सभेत बोलावणे कर.'
ठरल्याप्रमाणे सभा भरली. थोड्यावेळाने साधूने सराफांना आपल्यासमोर रांगेत उभे केले आणि प्रश्न विचारला, `तुम्ही हिऱ्याची परीक्षा जाणता का?' सराफाने होकारार्थी मान डोलावली.
साधू म्हणाला, `मला आत्ताच्या आता ती खुबी शिकवा.'
सराफ म्हणाला, `साधू महाराज, ही खुबी शिकायला मला चौदा वर्षे लागली. तेव्हा कुठे आता मी हिऱ्याची पारख करू लागलो आहे. ही विद्या अशी क्षणार्धात आत्मसात होणारी नाही. त्यासाठी सराफाच्या सहवासात काही वर्षे घालवावी लागतात.'
त्यानंतर साधूने प्रत्येक सराफासमोर तोच प्रश्न ठेवला. कोणी दहा, कोणी पंधरा, कोणी वीस वर्षात ही विद्या हस्तगत केली असे सांगितले. एक जण तर म्हणाला, ही विद्या अशी लगेच येणारी असती, तर माझे वडील सराफ असूनही मला त्यांच्याकडून शिकायला बारा वर्षे लागली नसती.
हे सर्व ऐकल्यानंतर साधू राजाला म्हणाला, `राजेंद्रा हे सर्व सराफ काय म्हणतात, ते ऐकलेस का? यांच्या उत्तरात तुझ्याही प्रश्नाचे उत्तर दडले आहे. हिऱ्याची पारख करायला, एवढी वर्षे घालवावी लागतात, तर परमात्म्याला पाहण्याची विद्या एका क्षणात कशी अवगत होईल? त्यासाठी सत्संग केला पाहिले. कारण संत, सद्गुरु हे सराफाप्रमाणे आपल्याला हिऱ्यासारखे घडवतील आणि परमात्म्याला पाहण्याची दृष्टी देतील.
हेही वाचा :'खाण्यासाठी जगू नये, तर जगण्यासाठी खावे', हे शिकवणारा बालपणीचा श्लोक!