प्रयत्नांती परमेश्वर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 03:12 AM2020-06-15T03:12:06+5:302020-06-15T03:12:55+5:30

देवासकट सर्व काही मिळवून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नांत आहे

nothing is possible without efforts | प्रयत्नांती परमेश्वर

प्रयत्नांती परमेश्वर

googlenewsNext

- प्रल्हाद वामनराव पै

मुलांनो, थोर समाजसुधारक सद्गुरूवामनराव पै म्हणतात, प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण देवासकट सर्व काही मिळवून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नांत आहे! इतकं प्रयत्नांचं महत्त्व अपरंपार आहे. जीवनात प्रयत्नांना पर्याय नाही. तुम्हाला कोशातून बाहेर पडणाऱ्या फुलपाखरांची गोष्ट कदाचित माहीत असेल. कोशातून बाहेर पडण्यासाठी फुलपाखरांची धडपड सुरू होती. एका मुलाला वाटलं, आपण त्याची मदत करूया म्हणून त्याने कोशातून त्या फुलपाखराला सोडविण्यास मदत केली. फुलपाखरू बाहेर तर पडले, पण उडूच शकले नाही. कारण त्याचे पंख गळून पडले होते. का बरं झालं असं? कारण फुलपाखरू स्वप्रयत्नांनी जेव्हा कोशातून बाहेर पडते तेव्हाच त्याचे पंख बळकट आणि विकसित होतात. म्हणजे प्रयत्न ही एक निसर्गदत्त योजना आहे. मधमाशी, मुंग्या, पक्षी सारेच प्रयत्नरत असलेले दिसतात. निरीक्षण करून पाहा! मग माणूस तरी अपवाद कसा राहील? जांभळं खायची म्हणून पिकलेल्या जांभळाच्या झाडाखाली तोंड उघडून नुसते पडून राहिलो, तर एक तरी जांभूळ पडेल का हो तोंडात? नाही, त्यासाठी प्रयत्न करून जांभळं झाडावरून काढायला हवीत, तरच त्याची गोडी कळेल. आता तुम्ही म्हणाल, प्रयत्न तर आम्ही सगळेच करतो, मग पहिला नंबर सगळ्यांचा का येत नाही? बघूया तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तीन मित्र तुमच्यासारखेच, शाळा सुटल्यावर घरी गेले. तिघांचेही घर बंद. आई घरात नाही, भूक तर खूप लागलेली. तिघेही दार उघडून आत गेले. पहिल्या मित्रानं काय करावं? आई घरात नाही. आता भूक कशी भागवायची? नुसता रडत बसतो! दुसरा मित्र घरातले डबे शोधतो, सुका खाऊ खातो आणि जेवणासाठी आईची वाट पाहात बसतो! तिसरा मित्र मात्र स्वच्छ हात-पाय धुऊन स्वत:ला जेवण वाढून घेतो, छान जेवून घेतो आणि आई येईपर्यंत वाचत बसतो! सांगा बरं, कोणता मित्र योग्य? अर्थात तिसरा! मुलांनो, या गोष्टीवरून तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळाले असेल.

Web Title: nothing is possible without efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.