गीता जयंतीनिमित्त जाणून घेऊया, साडे पाच हजार वर्षांपूर्वीच्या कुरुक्षेत्राची सद्यस्थिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 01:19 PM2020-12-24T13:19:46+5:302020-12-24T13:20:04+5:30

महाभारताचे वर्णन वाचून आपल्याही डोळ्यासमोर युद्धभूमीचा प्रसंग उभा राहतो. ते वर्णन वाचून आपल्याला ती भूमी प्रत्यक्ष पहावी,असे वाटत असेल किंवा तिथे आता काय परिस्थिती असेल, याबद्दल कुतुहलही निर्माण होत असेल. हे जाणून घेण्यासाठी आपणही साडे पाच हजार वर्षांपूर्वीच्या युद्धभूमीवर सद्यस्थिती काय आहे, याचा आढावा घेऊया.

On the occasion of Gita Jayanti, let us know what is happening in Kurukshetra today, five and a half thousand years ago. | गीता जयंतीनिमित्त जाणून घेऊया, साडे पाच हजार वर्षांपूर्वीच्या कुरुक्षेत्राची सद्यस्थिती!

गीता जयंतीनिमित्त जाणून घेऊया, साडे पाच हजार वर्षांपूर्वीच्या कुरुक्षेत्राची सद्यस्थिती!

googlenewsNext

२५ डिसेंबर रोजी गीता जयंती आहे. गीता जयंती म्हणजे तोच दिवस, जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवद्गीता सांगितली होती. त्या अर्थाने गीतेचा जन्म या दिवशी झाला, म्हणून त्या दिवसाला गीता जयंती म्हटले जाते. 

महाभारताच्या वेळी ऐन युद्धभूमीवर आपल्याच नातलगांविरूध्द शस्त्र उगारताना अर्जुन वैफल्याने ग्रासून गेला होता. या महायुद्धात होणारी प्रचंड जिवीतहानी आणि त्याचे दूरगामी परिणाम त्याला दिसत होते. एका क्षणाला त्याने युद्ध करणार नाही म्हणत हातातील शस्त्रे टाकून दिली. अर्जुनासाठी तो आयुष्यातला सर्वात मोठा नैराश्याचा क्षण होता. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी त्याला आयुष्याचे तत्वज्ञान गीतामृत स्वरूपात पाजले. त्याचे शंका निरसन केले आणि अर्जुनाच्या विनंतीवरून आपल्या विराट रूपात दर्शन दिले. युद्ध पार पडले. प्रेतांचा खच पडला, रक्ताचे चिखल झाले, मात्र सत्याने असत्यावर विजय मिळवला. अर्थात पांडवांचा विजय झाला. हे सर्व वाचून आपल्याही डोळ्यासमोर तो युद्धभूमीचा प्रसंग उभा राहिला असेल. ती भूमी प्रत्यक्ष पहावी, असेही वाटत असेल किंवा तिथे आता काय परिस्थिती असेल, याबद्दल कुतुहलही निर्माण होत असेल. हे जाणून घेण्यासाठी आपणही साडे पाच हजार वर्षांपूर्वीच्या युद्धभूमीवर सद्यस्थिती काय आहे, याचा आढावा घेऊया.

हेही वाचा : मोक्षदा एकादशी वेगळी अन् विशेष का?; 'ही' आहेत दोन खास कारणं!

साडेपाच हजार वर्षांपूर्वीचे कुरुक्षेत्र आजच्या हरियाणाचा काही भाग आणि पश्चिमी उत्तर प्रदेशाचा काही भागात व्यापला आहे. पूर्वीच्या भाषेत सांगायचे तर कुरुक्षेत्र ४८ कोस दूर पसरले होते. आजतागायत त्या परिसरात इतिहास संशोधक उत्खनन करत आहेत. त्यात अनेक प्राचीन संदर्भ, पुरावे, अवशेष सापडत आहेत. असे म्हणतात, की आजही तिथल्या मातीचा रंग रक्तासारखा लाल आहे.

ज्याठिकाणी अर्जुनाच्या रथावर स्वार होऊन भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली होती, त्या ठिकाणी एक प्राचीन वटवृक्ष आहे. तज्ज्ञांच्या मते, हा वृक्ष साडे पाच हजार वर्षे जुना वटवृक्ष आहे. त्याचठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आपल्या विराट रूपात दर्शन दिले होते. त्यामुळे ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या त्या वटवृक्षाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. तो वृक्ष ज्योतीसार नावाने ओळखला जातो. 

कुरुक्षेत्राच्या दर्शनाइतकेच दर्शनीय आहे, तिथले ब्रह्मसरोवर. या सरोवराचा उल्लेख वामन पुराणातही पाहायला मिळतो. हे सरोवर महाभारत काळापासून स्थित असल्याचे म्हटले जाते. शिवाय असेही म्हणतात, की मृत्यूच्या भीतीने दूर्योधन याच सरोवरात जाऊन लपला होता. तसेच ब्रह्मदेवांचाही या सरोवराशी पौराणिक संदर्भ जोडला जातो. सूर्यग्रहण काळात तिथे मोठी जत्रा भरते. तसेच डिसेंबर महिन्यात गीता जयंतीला तिथे मोठा उत्सवही साजरा केला जातो. 

कुरुक्षेत्राच्या भूमीवर देवीच्या ५२ शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणजे भद्रकाली देवीचे मंदिर स्थित आहे. महाभारताचे युद्ध सुरू होण्यापूर्वी पांडवांनी या मंदिरात जाऊन देवीचा आशीर्वाद घेतला होता, असे म्हणतात. तसेच युद्धात विजयी झाल्यानंतर पांडवांनी आपले घोडे इथे दान दिले होते, असेही सांगितले जाते. या मान्यतेनुसार इच्छापूर्ती, नवसपूर्ती झाल्यावर घोडा दान करण्याची प्रथा तिथे रूढ झाली. 

याशिवाय तिथे श्रीकृष्ण संग्रहालय आहे. जिथे महाभारतातील कथांवर आधारित, तसेच संशोधनात सापडलेल्या अवशेषांवर आधारित गोष्टींचे संग्रहीकरण केले आहे. तिथे पुराण आणि विज्ञान यांचा सुरेख संगम पहायला मिळतो. पर्यटक तिथे मोठ्या प्रमाणावर भेट देतात. म्हणून, आपणही कधी संधी मिळाली, तर कुरुक्षेत्राचे दर्शन अवश्य घ्या.

हेही वाचा : सुखाची तहान भागवायची, तर आधी गळका पेला बदला; वाचा ही बोधकथा!

Web Title: On the occasion of Gita Jayanti, let us know what is happening in Kurukshetra today, five and a half thousand years ago.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.