नारद जयंती निमित्त गोष्ट वाचा नारदभक्तीची आणि नारायणभक्तीची!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 08:00 AM2021-05-27T08:00:00+5:302021-05-27T08:00:02+5:30

खर्‍या भक्ताने नेहमी नम्र असावे ही शिकवण देण्यासाठी आणि उन्मत्तांचे गर्वहरण करून प्रत्येकाला योग्य प्रकारे त्याची जागा दाखविण्याचे व्रत नारदांनी अंगिकारले असावे.

On the occasion of Narad Jayanti, read the story of Narad Bhakti and Narayan Bhakti! | नारद जयंती निमित्त गोष्ट वाचा नारदभक्तीची आणि नारायणभक्तीची!

नारद जयंती निमित्त गोष्ट वाचा नारदभक्तीची आणि नारायणभक्तीची!

googlenewsNext

एकदा नारदांना “अहम” नव्हे, परंतु उगाचच वाटून गेले की, 'मीच खरा नारायणाचा भक्त!. कारण मी दिवसरात्र “नारायण नारायण” जप करत असतो.' महर्षी नारद खरेखुरे भक्त होतेच, परंतु त्यांना “अहंकार” होऊ नये म्हणून भगवंतांनी मुद्दामहून अर्जुनाचे नाव घेतले. का? प्रश्न आलाच. शेवटी मुनी स्वतः अर्जुनापाशी गेले, अर्जुन झोपलेला म्हणजे झोपेत स्वप्न बघणारा माणूस,  कुठले देवाचे नाव घेणार!! पण नाही त्यांना “कृष्ण कृष्ण” नाव ऐकू येऊ लागले. जवळ जाऊन बघतो तो अर्जुनाच्या जटांमधून ते नाव येत होते. परंतु नारदांच्या ठायी देखील तेवढीच निस्सीम भक्ती होती. 

भगवंतांनी सांगितले की “तुम्ही नाव घ्यायला सुरुवात करा, तुमच्या आत मी बसलो आहे, हळू हळू मीच नाव घ्यायला लागतो, आणि तुम्हाला माझा करून घेतो. माझ्यात आणि तुमच्या काय फरक आहे?”. “अहं वैश्वा नरोभूत्वा प्राणिनाम देहमाश्रित:” “ममैवांशो जीवलोके जीवभूत: सनातन:” 

आपण जेंव्हा जेंव्हा पोथीवाचन, जप, अभिषेक, पाठ, ध्यान धारणा, करायला बसतो, की नेहमी तीसरेच नको ते विचार मनात येतात, मन अस्थिर होते. "मन माझे केशवा का बा ने घे " झोप, जांभया, अडचणी, आळस, कंटाळा येतो, खरी मनापासून भक्ती होत नाही, जीव तळमळत राहतो. "कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषयसुख" अशी मनाची आणि देहाची अवस्था होते. पण ती टाळण्यासाठी सुद्धा पर्याय हाच, ते म्हणजे ईश्वर चिंतन!

पुन्हा एकदा असेच महर्षी नारद सक्काळी सक्काळी विष्णूंच्या घरी गेले. बेल वाजवली. लक्षुंबाईंनी दार उघडले,  आज भगवंतांनी दार नाही उघडले, काय आमच्यावर खफा झाले की काय? “नाही नाही, आज जरा अमळसे उशीराच उठले, आता पूजेला बसले आहेत, तुम्ही बसा, काय घेणार?  लक्षुंबाईंनी खुलासा केला. ते कसले,  लगेच कुतुहुलाने घरात घुसले, आणि जाऊन पूजेसमोर बसले. 

समोर बघतात तो काय त्यांचीच तसवीर आणि विष्णुबुवा त्यांचीच पूजा, नारदांचे भक्तीसूक्त मोठमोठ्याने म्हणत होते. त्यांनी विचारले, 'देवा, हे काय आता नवीन गौडबंगाल? गौड बंगाल नाही रे, ही भक्तांविषयी “ममता”. त्या चिखलात माझे कमळ उमलत नाही रे!! हीच जिंकते नेहमी. खेला होबे. भक्तांविषयी कळवळा. माझे भक्त माझी पूजा करतात आणि मी त्यांची! त्यांच्यामुळेच माझे अस्तित्व टिकून आहे.'

भगवान उत्तरले  “नाहम वसामी  वैकुंठे,  योगिनाम हृदये न च, मद्भक्ता यत्र गायन्ति, तत्र तिष्ठामी नारद”

“मी वैकुंठि वसत नाही, योगिया हृदयी नाही, 
माझे भक्त जिथे मज गाती, तेथे मी नीज, वसतो पाही” 

सामूहिक भजनात, कीर्तनात, प्रवचनात मी सदा असतो आणि त्या भक्तांच्या हृदयातही असतो. वैकुंठ हे माझे लोणावळा, खंडाळा, उटी, महाबळेश्वर सारखे   सेकंड होलि डे (पवित्र) होम आहे, क्वचित हॉलिडे एंजॉय करायला जातो लक्ष्मीसहित, ती जेंव्हा क्रोधागारात जाते, तेंव्हा तिचा राग शांत करण्यासाठी. अन्यथा मी भक्तांच्या हृदयातच असतो.' अशी ही नारदभक्ती आणि नारायण भक्ती!

देवर्षि नारद भक्तिमार्गातील अधिकारी पुरुष म्हणून सर्वज्ञात होते. त्यांनी लिहिलेली भक्तीसूत्रे ‘नारद भक्तीस्तोत्रे’  म्हणून ओळखली जातात. भक्तिमार्गाचे महत्व, स्वरूप, आणि भक्तिमार्गाची आवश्यकता या सूत्रातून नारदांनी अतिशय थोडक्यात व्यवस्थित रीतीने “नवविधा भक्तीची रहस्ये" सांगितली आहेत. 

महाभारतात, पुराणात इतकेच काय पण रामायणातही आपल्याला नारद महत्वाच्या क्षणी भेटतात. प्रत्येक ठिकाणी नारदांची भूमिका ठराविक असते. सुरळीत चाललेल्या एखाद्या व्यवहारामध्ये काहीतरी कलागती लावून द्यायची आणि आपण नामानिराळे रहावयाचे, हा नारदांचा नेहमीचा स्वभाव.

खर्‍या भक्ताने नेहमी नम्र असावे ही शिकवण देण्यासाठी आणि उन्मत्तांचे गर्वहरण करून प्रत्येकाला योग्य प्रकारे त्याची जागा दाखविण्याचे व्रत नारदांनी अंगिकारले असावे. अशा महर्षी नारदांना आजच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

२७ मे रोजी आहे नारद जयंती, करून घेऊया ओळख महर्षी नारद यांच्या व्यक्तिमत्त्वाची!

Web Title: On the occasion of Narad Jayanti, read the story of Narad Bhakti and Narayan Bhakti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.