विनायकी चतुर्थीनिमित्त मध्वनाथ स्वामींनी शिकवल्याप्रमाणे करा बाप्पाची पंचारती!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 08:00 AM2022-01-06T08:00:00+5:302022-01-06T08:00:09+5:30
आपल्याला अहंकार नाही, हे सतत म्हणणे सुद्धा अहंकाराचेच लक्षण आहे. तो कसा संपवावा, याबाबत मध्वनाथस्वामी पंचारतीचा खूप छान उपचार सांगत आहेत.
'मी'पणा जिथे संपतो, तिथे अद्वैताचा साक्षात्कार होऊ लागतो. अद्वैत म्हणजे काय? तर जिथे भक्त आणि भगवंत हे वेगळे उरतच नाहीत. ही अवस्था प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम अहंकाराचा त्याग करावा लागतो. आपल्याला अहंकार नाही, हे सतत म्हणणे सुद्धा अहंकाराचेच लक्षण आहे. तो कसा संपवावा, याबाबत मध्वनाथस्वामी पंचारतीचा खूप छान उपचार सांगत आहेत. ही नेहमीची पंचारती नसून या पंचारती वेगळी आहे.
श्रीगजानन हे विद्येचे दैवत आहे. त्यामुळे विद्येचे उपासक, साहित्यिक, लेखक अशा अनेकांनी गजाननाची स्तुतिस्त्रोत्रे मनापासून गायली आहेत. गणपतीच्या आरत्या तर अगणित आहेत. गणपतीचे गुणवर्णन करताना त्याच्या भक्तांना शब्दांची उणीव कधीच भासत नाही. कल्पनांचीही रेलचेल गणेशस्तवनात आढळते. मध्वनाथस्वामींच्या पदातून ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर पंचारतीची उकल करून सांगत आहेत.
आवडी गंगाजळे देवा न्हाणीले,
भक्तीचे भूषण प्रेमसुगंध अर्पीले,
अहं हा धूप जाळू गणपतीपुढे, माझ्या मोरयापुढे।।
जंव जव धूप जळे तंव तंव देवा आवडे,
पंचप्राणसहित धूपदीप जो केला,
नैवेद्याकारणे, उत्तम प्रकार अर्पीला,
मध्वनाथस्वामी पंचोपचारि पूजीला,
मग एकार्तीसी प्रेमे प्रारंभ केला।।
आवड हेच गंगाजळ त्याने देवाला स्नान घातले आहे. आंघोळ घातली आहे. त्याच्या अंगावर भावभक्तीचे अलंकार चढविले आहेत. प्रेमाचा सुगंध त्याला अर्पण केला. माझ्या अहंकाराचा धूप मी गणपतीपुढे जाळला. म्हणजे मी निरंहकारी झालो. मला कशाचाही अहंकार उरला नाही आणि जेव्हा जेव्हा मी अहंकाराचा धूप जाणून निरहंकारी होतो, तेव्हा तेव्हा मी देवाला अतिशय प्रिय असतो. अहंकार हा एकदा दूर सारला की कायमचा दूर होत नाही. तो पुन: पुन्हा एखाद्या चेंगट, लाचारासारखा येऊन चिकटतोच. अगदीच काही नाही तरी मनात निर्माण होतो. तो अहंकारसुद्धा त्याज्यच.
आपणास अहंकार नाही, असे आपले आपल्याला वाटत राहणे हासुद्धा एक प्रकारचा अहंकारच आहे. आपण देवासमोर नतमस्तक झालो, तर त्यामधून येणारी नम्रता ही सर्वगामी, सर्वव्यापी असली पाहिजे. त्या नम्रतेचाही अहंकार मनाला जाणवणे उपयोगाचे नाही. म्हणून हा पुन्हा पुन्हा येऊन चिकटणारा आणि माझ्या मनाला ग्राहणारा अहंकार मी जेव्हा जेव्हा दूर करतो तेव्हा तेव्हा मी देवाच्या अधिक प्रीतीला पात्र होतो. माझे पंचप्राण हीच जणू देवाची पंचारती आहे. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी उत्तमोत्तम पदार्थ आणले आहेत. अशी देवाची पंचोपचाराने पूजा करून नंतर पूजेच्या क्रमाक्रमाने मध्वनाथस्वामींनी बाप्पासमोर पंचारती ओवाळली आहे. आपणही अशी पंचारती देवाला ओवाळली, तर त्याला ती निश्चितच आवडेल.