बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण करा त्याच्या आवडत्या 'या' पाच गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 08:00 AM2021-04-06T08:00:00+5:302021-04-06T08:00:02+5:30
त्याच्याकडून आपल्याला काही मिळावे म्हणून नाही, तर त्याने आपल्याला बरेच काही देऊन ठेवले आहे, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बाप्पाच्या आवडीच्या पाच गोष्टी त्याला अर्पण करूया.
गणपती बाप्पा आबालवृद्धांचे लाडके दैवत. त्याला पाहिले, तरी सर्व दुःख दूर गेल्यासारखे वाटते म्हणून तर त्याच्या प्रसन्न वदनाला मंगलमूर्ती म्हटले आहे. अशा आपल्या बाप्पाला त्याच्या आवडता खाऊ दिला, तर त्याला किती आनंद होईल. त्याच्याकडून आपल्याला काही मिळावे म्हणून नाही, तर त्याने आपल्याला बरेच काही देऊन ठेवले आहे, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बाप्पाच्या आवडीच्या पाच गोष्टी त्याला अर्पण करूया. जेणेकरून तो आपोआप प्रसन्न होईल.
मोदक किंवा लाडू : या दोन्ही गोष्टी जशा आपल्याला प्रिय आहेत, तशाच बाप्पालाही प्रिय आहेत. मोदक या शब्दातच आनंद दडलेला आहे. मोद म्हणजे आनंद. मोद देणारा तो मोदक. गूळ,खोबरं, तूप यांचे तांदुळाच्या उकडीच्या पारीत भरलेले मिश्रण आणि त्याचा सुबक सुंदर ठेंगणा आकार जणू काही बाप्पाची साजिरी गोजिरी मूर्तीच! अशा मोदकांचा बाप्पाला नैवेद्य दाखवला असता, तो आनंदून जातो. तीच बाब लाडवांची! गोड बातमी मिळाली, की लाडू मागतात. लाडू हे आनंदाचे समीकरणच झाले आहे. अशा दोन्ही गोष्टी बाप्पाच्या आवडीच्या आहेत.
दुर्वा : सर्व रोगांना दूर व्हा असा संदेश देणाऱ्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या दुर्वा आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय गुणकारी आहेत. अनलसुर नावाच्या असुराला गिळंकृत केल्यानंतर बाप्पाच्या अंगाचा झालेला दाह दुर्वांच्या काढ्यामुळे शांत झाला, तेव्हापासून बाप्पाला दुर्वा आवडू लागल्या.
फुल : तुळशी वगळता अन्य कोणतेही फुल बाप्पाला आवडते, असे पद्मपुराणात म्हटले आहे. बाप्पाचा रक्तवर्ण पाहता त्याला जास्वंदाचे फुल अधिक प्रिय असावे असे म्हटले जाते व त्याच फुलांची माळा अर्पण केली जाते.
शेंदूर : हनुमंताप्रमाणे बाप्पालाही शेंदूर प्रिय आहे असे शिवपुराणात म्हटले आहे. असे म्हणतात, की भगवान शंकरांनी बाप्पाचे शीर धडापासून वेगळे केले आणि त्यावर गजाचे शीर जोडले त्यावेळेस शेंदूर लेपन केले होते. या उदाहरणाचा दाखला आजही देत बाप्पाला शेंदूर लेपन केले जाते.