थोरले माधवराव पेशवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊ चिंतामणीशी त्यांचे भावनिक नाते!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 07:00 AM2023-12-05T07:00:00+5:302023-12-05T07:00:02+5:30
आज मंगळवार आणि थोरले माधवराव पेशवे यांची तारखेने पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त थेऊरच्या चिंतामणीशी त्यांचे नाते जाणून घेऊया.
पेशव्यांचं पुण्यावर विशेष प्रेम होते. शहराचे सुशोभीकरण, लोकांना सोयी- सुविधा पुरवणे, धार्मिक वृद्धीसाठी देवालये बांधणे अशी अनेक कामं पहिले बाजीराव ते दुसरे बाजीराव ह्या पेशव्यांनी केली. ह्यात मुख्यतः नाव घ्यावं लागेल ते नानासाहेब पेशव्यांचं. त्यांच्या कारकिर्दीत पुण्यात अनेक बदल घडत गेले. पुणे शहर “हिंदुस्थानचं नाक” म्हणून प्रसिद्ध होऊ लागलं. ह्याच काळात पुण्यात अनेक गणेश मंदीर बांधली गेली. त्यांतील थेऊरच्या चिंतामणी मंदिरात थोरले माधवराव पेशवे यांनी जिथे अखेरचा श्वास घेतला त्याबद्दल प्रांजल वाघ यांच्या पेशवेकालीन गणेश मंदिर या लेखातील एक भाग जाणून घेऊ.
पुण्यातील गणपती मंदिर आणि पेशवे ह्यांच्यात एक गाढ अध्यात्मिक नातं होतं. तसच थोरल्या माधवरावांच विशेष प्रेम असलेले मंदिर म्हणजे थेऊरचे चिंतामणी गणेश मंदिर! पुण्यापासून २५ कि मी वर असलेलं थेऊरच चिंतामणी मंदिर हे अष्टविनायक मंदिरांपैकी एक. चिंचवड देवस्थान ट्रस्ट ह्या देवळाची देखभाल करते. थेऊरचा चिंतामणी ह्यावर पेशव्यांची गाढ श्रद्धा. माधवराव पेशव्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व त्यांची चिंतामणीवर असलेली श्रद्धा इतकी गाढ होती की प्रत्येक लढाई अगोदर थेऊरला भेट देऊन चिंतामणीचा आशीर्वाद घेत असत. सध्याचं असलेलं देवळाच कार्यालय म्हजे माधवरावांचे थेऊर मधील निवासस्थान! क्षयरोगाने ग्रासलेले माधवराव त्यांच्या शेवटच्या दिवसात थेऊरच्या मंदिरात तळ ठोकून होते. त्यांनी शेवटचा श्वास घेतला तो देखील ह्याच चिंतामणी मंदिरामध्ये!
अष्टविनायकांपैकी ५ वे मंदिर होण्याचा मान ह्या मंदिरास लाभलेला आहे. मंदिर बरेच भव्य आहे आणि मंदिरात माधवराव पेशव्यांनी बांधलेला लाकडी सभामंडप आजही उभा आहे. थेऊरचा चिंतामणी हा स्वयंभू आहे. गणपतीची सोंड डावीकडे वळली असून, त्याचे दोन तेजस्वी नेत्र मूर्तीवर उठून दिसतात. मूर्तीला फसलेला भगवा शेंदूर ह्यातून ते दोन नेत्र सार्या विश्वाच्या हालचालींवर नजर ठेवून आहे असं काही क्षण भास होतो!
चिंतामणीचे स्थानमहात्म्य :
अष्टविनायकातला गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी. या मंदिराची अशी आख्यायिका सांगितली जाते की, ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.
गणेश भक्त मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते. श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.