'देव देव्हाऱ्यात नाही' अशी एकदा स्थिती झाली, तेव्हा हनुमंताला रामराय कुठे भेटले पहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 08:00 AM2021-03-19T08:00:00+5:302021-03-19T08:00:00+5:30
आपले मन पारमार्थिक विषयात नसून व्यावहारिक विषयात गुंतून राहते. त्यातून मन सोडवण्यासाठी रामरायाला शरण जाऊया.
देवाचा शोध आपण सगळेच घेत असतो, पण तो सगळ्यांनाच सापडतो असे नाही. तो सापडतो ते केवळ भक्तांना. त्यातही तो भक्त हनुमानासारखा असेल, तरच तो लगेच भेटतो आणि भक्तांशी संवाद साधतो. असाच एक गमतीदार पण मार्मिक प्रसंग पहा.
एकदा मारूतीराय आकाशातून जात असता , त्यांचं खाली लक्ष गेलं. त्यांना दिसलं की एका देवळात कीर्तन चालू होतं आणि रामराय मात्र देवळाबाहेर बसले होते. जवळच लोकांच्या चपलांचा ढीग होता. मारूतीराय लगबगीने खाली उतरले. रामरायांना विचारलं, रामराया, आत एवढे सुंदर कीर्तन सुरू असतानाही आपण बाहेर येऊन का बसलात ? तेव्हा रामराया म्हणाले, कीर्तनकार सांगत होते आणि लोक त्यांच्या पाठोपाठ म्हणत होते, 'ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे , त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे.' सगळ्यांचं मन कीर्तन सोडून बाहेर काढलेल्या चपलांवर होतं , म्हणून मी इथे राखण करत बसलोय् !
हा प्रसंग जरी काल्पनिक असला, तरी त्यातून मार्मिक वास्तव दिसून येते. ते वास्तव म्हणजे, आपले मन पारमार्थिक विषयात नसून व्यावहारिक विषयात गुंतून राहते. त्यातून मन सोडवण्यासाठी रामरायाला शरण जाऊन सांगूया...
कल्याण करी रामराया...!