एक तास समाजाचा...! ‘मनशक्ती’मध्ये ‘ज्ञानाने माणूस बदलण्याचा’ चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 06:20 AM2021-05-16T06:20:56+5:302021-05-16T06:21:09+5:30
कोणत्याही पारंपरिक पद्धतीने नाही, परंतु विशिष्ट पद्धतीने स्वामीजींना समोरच्या माणसाचे भविष्य समजत असे. तथापि, स्वामीजींचा संपर्क थेट देशातील सर्वोच्च पदे असलेल्या मान्यवरांशी होता.
सुहास गुधाटे
‘सुख पाहता जवापाडे आणि दु:ख पर्वताएवढे’, हे मानसशास्त्रीय निरीक्षण तुकोबारायांनी नोंदवले. तसेच ‘मन करा रे प्रसन्न’ असा उपदेशही केला. सुख-दु:खाच्या या मूलभूत प्रश्नांचा चिकित्सक धांडोळा आधुनिक वैज्ञानिक परिभाषेतून मनशक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी घेतला. पूर्वायुष्यात ते स्वातंत्र्य सैनिक होते, पत्रकार-संपादक होते. ‘वंदे मातरम’ हा प्रसिद्ध मराठी चित्रपट त्यांनी निर्माण केला. शास्त्रीय संगीताचा प्रसार व्हावा, यासाठी ख्यातनाम कलाकारांचे चित्रीकरण केले. यू ट्युबवर उपलब्ध असलेला लता मंगेशकर यांच्या आवाजातील मालकंस राग हा त्यांच्याच चित्रफितींचा भाग आहे.
कोणत्याही पारंपरिक पद्धतीने नाही, परंतु विशिष्ट पद्धतीने स्वामीजींना समोरच्या माणसाचे भविष्य समजत असे. तथापि, स्वामीजींचा संपर्क थेट देशातील सर्वोच्च पदे असलेल्या मान्यवरांशी होता. परंतु, त्याचा वापर त्यांनी वैयक्तिक किंवा संस्थेच्या लाभासाठी कधीही केला नाही. भविष्य समजत असले तरी कोणत्या निसर्ग नियमाने ते घडते, हा कार्यकारणभाव त्यांना शोधून सापडत नव्हता. पुढे २२ मार्च १९५७ रोजी आत्मप्रत्ययाचा अनुभव त्यांना आला. तेव्हा या सुख-दु:खाच्या नियमाचा शोध विज्ञानाच्या माध्यमातून घेण्याची प्रेरणा निसर्गाने त्यांना दिली. मानवी जीवन सुखी कसे होईल, हे सांगणारे बुद्धिवादी ‘नव तत्त्वज्ञान’ त्यांनी मांडले आणि ते जगण्यासाठी २१ फेब्रुवारी १९६३ रोजी समाजासाठी जास्तीत जास्त त्याग या हेतूने त्यांनी संन्यास घेतला. तेव्हा त्यांची विज्ञाननिष्ठा पारखलेल्या आचार्य अत्रे यांनी ‘स्वामी
विज्ञानानंद’ हे नाव धारण करण्यास त्यांना सुचवले.
माणसाचं दु:ख निवारण्यासाठी व खरं सुख मिळवण्यासाठी निसर्ग नियम आधारित ‘न्यू वे’ तत्त्वज्ञान त्यांनी मांडलं. कार्यसुलभतेसाठी संपर्काला सोयीची अशी पुणे-मुंबईच्या मध्यावरील लोणावळ्यातील जागा स्वामीजींनी निवडली. नव तत्त्वज्ञानाचा प्रसार करून समाजात ‘सत्कृत्य चक्रा’साठी उपक्रम सुरू केले. त्यातून कार्यकर्ते जोडत गेले आणि १२ मे १९७० या दिवशी ‘न्यू वे आश्रम’ या संस्थेची स्थापना झाली.
गर्भावस्थेपासूनच मुलाचे व्यक्तिमत्त्व कसे घडत जाते, हे त्यांनी ‘पालक विश्वविद्यालय’ या अभिनव प्रकल्पाद्वारे मांडले. मुले-पालकांसाठी निवासी शिबिरे, मानस चाचण्या आणि समुपदेशन सेवा सुरू केली. मनशक्तीमध्ये चमत्कार घडतो तो ‘ज्ञानाने माणूस बदलण्याचा’. ध्येयप्राप्ती आणि दु:खमुक्ती यासाठी बुद्धिनिष्ठ उपायांचं ‘ज्ञान’ मिळालं तर माणूस आत्मनिर्भर बनतो. यासाठी मनशक्ती केंद्रात विविध गरजांसाठी सुमारे ५० अभ्यासवर्ग, कार्यशाळा आहेत. २०० हून अधिक ग्रंथ आहेत. ५० प्रकारच्या मानस चाचण्यांची सेवा उपलब्ध आहे. वर्षभरात विविध माध्यमातून सुमारे एक लाख लोक या सेवांचा लाभ घेतात.
एक तास समाजाचा...
सुख-दु:खाचा अतूट संबंध लक्षात घेऊन स्वेच्छेने थोडा दु:खस्वीकार हे पथ्य समाजसेवेच्या माध्यमातून पाळण्याचे मनशक्ती सुचवते. त्यानुसार ‘रोज एक तास समाजाचा’ हे व्रत अंगीकारलेले हजारो कार्यकर्ते हा संस्थेचा भक्कम आधार आहे, तर पूर्ण जीवनच यासाठी वाहिलेले १०० हून अधिक कार्यकर्ते हा संस्थेचा पाया आहे. कोरोना आपत्तीl १० लाखांहून अधिक निधी संस्थेने देणगी आणि वस्तू रूपात दिला आहे. चालू महिन्यात ५० वर्षांचा सुवर्णमहोत्सवी पहिला टप्पा ओलांडताना हे सिंहावलोकन अधिक अंतर्मुख करते.
(लेखक मनशक्ती प्रयोग केंद्राचे जीवनदानी साधक आहेत)