'या' एका उपायाने तुमच्या अर्ध्याहून अधिक आरोग्य समस्या समूळ नष्ट होतील!- सद्गुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 04:24 PM2021-04-02T16:24:58+5:302021-04-02T16:25:18+5:30
अलीकडच्या काळात उपास हा थट्टेचा विषय बनला आहे. परंतु, पाश्चात्य जगात भारतीय आहार पद्धतीला मान्यता मिळाली आहे. तिथले लोक आपली संस्कृती आत्मसात करू पाहत आहेत, निदान आता तरी आपण आपल्या संस्कृतीकडे डोळसपणे पाहिले पाहिजे.
भारतीय संस्कृतीतील एखादी गोष्ट पाश्चात्यांनी दुजोरा दिल्याशिवाय भारतीयांना पटत नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. भारतीय ऋषीमुनींनी केलेल्या संशोधनावर विश्वास न ठेवता अमेरिकन शास्त्रज्ञ हे विशेषण लागले, की लोकांचा चटकन विश्वास बसतो. सांगत आहेत अध्यात्मिक वक्ते सद्गुरू!
अलीकडच्या काळात उपास हा थट्टेचा विषय बनला आहे. परंतु, पाश्चात्य जगात भारतीय आहार पद्धतीला मान्यता मिळाली आहे. तिथले लोक आपली संस्कृती आत्मसात करू पाहत आहेत, निदान आता तरी आपण आपल्या संस्कृतीकडे डोळसपणे पाहिले पाहिजे.
उपास हा थट्टेचा विषय नसून ती शरीरावर नियंत्रण मिळवणारी प्रभावी उपचार पद्धत आहे. लाखो रुपये खर्च करून औषध घेण्यापेक्षा, शस्त्रक्रिया करण्यापेक्षा योग्य आहारपद्धती, सवयी आत्मसात केल्या तर अध्र्याहून अधिक आरोग्यसमस्या दूर होतील.
शरीर हे यंत्र व्यवस्थित चालावे असे वाटत असेल, तर त्याला अधून मधून विश्रांती दिली पाहिजे. सतत खाण्याच्या सवयीमुळे आपण आपल्या शरीराला रोगाचे माहेरघर बनवून ठेवले आहे. ते पुन्हा नियंत्रणात आणायचे असेल, तर तोंडावर नियंत्रण ठेवा. जेव्हा उपाशी राहाल, तेव्हाच आतल्या यंत्रणेला दुरुस्ती करण्यास संधी मिळेल. तुम्ही सतत खाऊन यंत्र सुरूच ठेवले, तर ते न सांगता बंद पडेल.
सकाळी १० वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता जेवणाची शरीराला सवय लावून घ्या. अध्ये मध्ये भूक लागत असेल, तर भूकेवर नियंत्रण मिळवा. संयम ठेवा. रिकामे पोट तुम्हाला कामासाठी अतिरिक्त ऊर्जा देईल. सायंकाळी ७ वाजता जेवून घेतल्यामुळे पोट हलके राहील. झोपेवर ताण पडणार नाही. जडत्त्व येणार नाही. अन्न पचेल. जेवणात आणि झोपण्यात तीन तासांचे अंतर राहील. जेवल्या जेवल्या झोपण्याची सवय अतिशय घातक आहे. ती सवय आधी बदलून टाका. सूर्यास्ताआधी जेवून घ्या. दुसऱ्या दिवशीपर्यंत अजिबात भूक लागत नाही. सवय होईपर्यंत खावेसे वाटत राहील, पण सवय लागली, की भूकेवर आणि रोगांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल.
एवढा वेळ पोट उपाशी ठेवल्याने अजिबात मृत्यू येत नाही. उलट आयुष्य चांगल्या ऊर्जेने, उत्साहाने तुम्ही जगू लागता. दोन घास अतिरिक्त खाण्याऐवजी दोन घास कमी खा. त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. ही आहारशैली तुम्ही वापरात आणली, तर ५० टक्के आरोग्य समस्या दूर होतील. या आहारशैलीला पुरेशा व्यायामाची जोड दिली, तर ९० टक्के अधिक तुम्ही कार्यान्वित व्हाल. उरला प्रश्न १० टक्के दुर्धर आजारांचा, त्यासाठी लागणारे उपाय आपल्याला डॉक्टर देतील, परंतु ते आजार होऊच नयेत, यासाठी खबरदारी आपण आजपासून घेऊ शकतो, नाही का?