आपण कल्पना करतो एक आणि घडते काही वेगळेच; वाचा एका गावकऱ्याची गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 03:16 PM2021-08-11T15:16:49+5:302021-08-11T15:17:15+5:30
रूप, रंग, तारुण्य, पैसा, पद, प्रतिष्ठा या गोष्टी कायमस्वरूपी नसतात. गुण आणि स्वभाव चांगला असेल तर मनुष्याचा टिकाव लागू शकतो.
एक गाव होते. तिथे शहरातल्या अद्यावत सुविधा तर दूर साधे वर्तमानपत्रही मिळत नसे. तिथे राहत असलेल्या एका गावकऱ्याने आपल्या देशाच्या सर्वोच्च नागरिकाबद्दल अर्थात राष्ट्रपतींबद्दल बरेच काही ऐकले होते. ती व्यक्ती कशी दिसते, हेदेखील त्याला माहित नव्हते परंतु त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती होती.
एक दिवस कोणी सांगितले, बाजूच्या गावात एका कार्यक्रमासाठी राष्ट्रपती येणार आहेत. हे कळल्यापासून तो गावकरी त्यांना भेटण्यासाठी उत्सुक झाला. राष्ट्रपती येणार कळल्यावर गावात स्वच्छता करण्यात आली होती. बरीच रोषणाई केली होती. मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था केली होती.
गावकरी तिथे पोहोचला. सगळी व्यवस्था पाहून स्तिमित झाला. एवढी व्यवस्था ज्यांच्यासाठी केली ती व्यक्ती किती महान असेल, तिचे व्यक्तिमत्त्व किती प्रभावी असेल, या विचाराने गावकऱ्याचे कुतुहल आणखी वाढले. राष्ट्रपती आले. लोकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. त्यांनी समारंभाचे उद्घाटन केले. परंतु एवढ्या गर्दीत त्या गावकऱ्याला राष्ट्रपतींना पाहताच आले नाही.
कार्यक्रम सुरू होता, परंतु त्याचे कार्यक्रमात लक्ष नव्हते. त्याने आजूबाजूच्या लोकांना विचारले, `कसे दिसतात राष्ट्रपती? खूप सुंदर, रुबाबदार, उंच अशा व्यक्तिमत्त्वाचे असतील ना?' लोक म्हणाले, 'अजिबात नाही. ते तर दिसायला, उंचीला अगदी साधारण आहेत, सावळ्या रंगाचे आहेत, पण मनाने खूप चांगले आहेत.'
हे ऐकून गावकऱ्याचा चेहराच पडला. आपण समजत होतो, की ज्या व्यक्तीची ख्याती एवढी तो दिसायला सुंदर असेल, पण...असा विचार करत करत गावकरी गर्दीतून वाट काढत राष्ट्रपतींसमोर गेला आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याची इच्छा व्यक्त केली. चक्क त्याची इच्छा पूर्ण झाली. देशाच्या राष्ट्रपतींनी आपल्याशी हात मिळवला या प्रसंगाने तो एवढा भारावला की त्याला राष्ट्रपतींपेक्षा सुंदर व्यक्ती जगात दुसरी कोणीच नाही, असे भासू लागले. ते लोकप्रिय राष्ट्रपती होते, डॉ.एपीजे अब्दुल कलाम.
ते नेहमी म्हणत, 'I am not Handsome but I can give Hand To Some!' मी दिसायला सुंदर नाही, पण दुसऱ्याला मदत करू शकेल एवढे माझे मन सुंदर आहे आणि ते सुंदर मन दिल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो.'
आपण लोकांची पारख बाह्य रुपावरुन करतो परंतु अनेकदा सुंदर दिसणारे लोक मनाने सुंदर असतीलच असे नाही. रूप, रंग, तारुण्य, पैसा, पद, प्रतिष्ठा या गोष्टी कायमस्वरूपी नसतात. गुण आणि स्वभाव चांगला असेल तर मनुष्याचा टिकाव लागू शकतो. आपणही सौंदर्याची व्याख्या समजून घेतली आणि आपली जगाकडे बघण्याची दृष्टी बदलली तरच हे जगच सुंदर दिसू शकेल.