महावीरांच्या केवळ अर्ध्या वाक्याने चोराचे भले झाले, जर त्याने पूर्ण उपदेश ऐकला असता तर???
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 05:57 PM2021-12-18T17:57:55+5:302021-12-18T17:58:14+5:30
संत महात्मे यांचा एकेक शब्द लाखमोलाचा असतो. त्याकडे कधीच दुर्लक्ष करू नये....
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भगवान महावीर एका गावात आपल्या शिष्यांसह आले. लोकांना ते भक्तीमार्ग समजावून सांगत. त्यांच्या अनमोल वचनांमुळे कित्येकांनी चांगला मार्ग स्वीकारला. त्या गावात एक चोर होता. त्याला महावीरांचा उपदेश आवडत नसे. त्याच्या बरोबरीने चोरी करणारे अनेक चोर आपला पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय सोडून महावीराच्या उपदेशाप्रमाणे आचरण करू लागले होते. त्यामुळे तो जिथे महावीर असतील तिथे थांबत नसे.
एके दिवशी तो चोर भयंकर आजारी पडला. त्यावेळी त्याने आपल्या मुलाला बोलवून सांगितले, `हे बघ बाळ, मी आता जास्त दिवस जगेन असे वाटत नाही. माझ्यामागे तू आपला पिढ्यानपिढ्या चालत आलेला चोरीचा धंदा पुढे असाच चालू ठेव. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावात जोपर्यंत महावीर आहेत, तोपर्यंत त्यांच्याजवळ फिरकू पण नकोस. ते जिथे असतील तिथून दूर निघून जा.
थोड्याच दिवसाने चोराने शरीर सोडले. त्याचा मुलगा पुढे वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चोरीचा व्यवसाय करून निष्णात चोर बनला. बरीच संपत्ती त्याने जमवली.
एके दिवशी मात्र महावीरांच्या मठाजवळून जाताना त्याला महावीरांचे दर्शन झाले. महावीर जमलेल्या भाविकांना उपदेश करत होते. चोराच्या मुलाने वडिलांनी सांगितल्याप्रमाणे महावीरांच्या मठाजवळ न थांबता तिथून तो पळत सुटला. त्यांचा उपदेश कानावर पडू नये म्हणून कान बंद करून घेतले. तरीही अर्धे वाक्य त्याच्या कानावर पडलेच. महावीर मृत्यूनंतरच्या अवस्थेचे वर्णन करत असताना म्हणत होते की, 'शरीरातील प्राण घेऊन जाणारे यमाचे सेवक उलट्या पायाचे असतात', एवढे वाक्य मात्र ऐकले, पुढचे वाक्य ऐकू येऊ नये म्हणून त्याने कान बंद केले नि तो तिथून पळत सुटला.
एके दिवशी सावकाराच्या वाड्यावर मोठा दरोडा पडला. राजाच्या सैनिकांनी संशयीत म्हणून चोराच्या मुलाला पकडून नेले. चोरी त्यानेच केली होती. परंतु तो कबुल होईना. नाना प्रकारे त्याला कबुल करायवयास लावले, पण व्यर्थ! शेवटचा उपाय म्हणून त्याला गुंगीचे औषध देण्यात आले. सात आठ दिवस बेशुद्ध ठेवल्यावर तो अर्धवट शुद्धीवर आला. तो मरण पावला आहे, असे भासवण्यासाठी त्याच्या भोवती पाच सहा सुंदर स्त्रिया जमवल्या, त्या म्हणाल्या, `आम्ही यमराजाच्या सेविका आहोत. तुझा प्राण आम्ही घेऊन जात आहोत. तू तुझ्या जीवनात जे काही दुष्कर्म केले असेल ते खरंखरं सांगितलं तर तुला आम्ही स्वर्गात नेऊ आणि खोटं सांगितलं तर तुझी नरकात रवानगी करू.'
आपल्याकडून चोरीची कबुली करून घेण्यासाठी तर हे षडयंत्र नसेल! अशी त्याला शंका आली. तेवढ्यात त्याला महावीरांचे वाक्य आठवले. महावीर म्हणाले होते, की 'यमराजांच्या सेवकांचे पाय उलटे असतात.' परंतु यांचे पाय तर आपल्यासारखेच आहेत. म्हणजे नक्कीच आपल्याला शिक्षा करण्यासाठी हे कारस्थान आहे. हे त्याने जानले. परंतु वरकरणी काहीही न दर्शवता तो म्हणाला, `तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मलाही स्वर्गात जायची खूप इच्छा आहे. पण मी एकही दुष्कर्म केलेले नाही.'
राजाचा हा प्रयत्नही व्यर्थ ठरला. काहीही पुरावा नसल्याने राजाला त्याला सोडून द्यावे लागले. केवळ महावीरांच्या अर्ध्या वाक्यामुळे त्याची शिक्षा टळली.
त्याने विचार केला, की महावीरांचे अर्धे वाक्य जर आपल्याला कारावासाच्या बंधनातून मुक्त करू शकले, तर त्यांचा पूर्ण उपदेश जर ऐकला, तर जीवन खऱ्या अर्थाने मुक्त होईल. नंतर तो त्वरित महावीरांना शरण गेला. त्याने सारी हकीगत त्यांना सांगितली आणि त्यांचा अनुग्रह घेतला व आपले जीवन सुखी केले.