जगात वैदिक संस्कृतीच टिकून आहे कारण ती ईश्वरनिर्मित आहे व अन्य संस्कृती मानवनिर्मित; त्याचे हे दाखले!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 09:30 AM2021-05-18T09:30:13+5:302021-05-18T09:30:30+5:30
वैदिकांची संस्कृती अनादि, अनंत, अविच्छिन्न, अखंड परंपरेने जशीच्या तशी विद्यमान आहे. याचे कारण, ही संस्कृती ईश्वरनिर्मित आहे. ईश्वरस्वरूप वेदांतून उपलब्ध झाली आहे.
जगाच्या पाठीवर आजपर्यंत शेकडो संस्कृती जन्माला आल्या आणि अस्ताला गेल्या. धर्मभास्कार गं.ना.कोपरकर बुवा लिहितात, त्या सर्व संस्कृतींचे बारसे आणि चौदाव्याचे पिंडदानही वैदिकांनी पाहिले. त्या संस्कृती हवेत कापूर उडून जावा अशा रितीने विरून गेल्या. आज मात्र उगाळायला म्हणून त्यांचा बारीक अवशेषही शिल्लक नाही. काही संस्कृतींचे समाज तर हजार वर्षे वैभवाच्या शिखरावरही दिमाखात मिरवत राहिले, परंतु आज ते नाममात्रही शिल्लक राहिले नाही. असीरियन, सुमेरियन, शक, हूण, तार्तर, बार्बर, मंगोलियन, ग्रीक, रोमन, इ नावे केवळ इतिहासाच्या पुस्तकात वाचण्यापुरती शिल्लक आहेत. मात्र वैदिक संस्कृती प्राचीन काळापासून आजतागायत टिकून आहे व पुढेही राहील.
वैदिकांची संस्कृती अनादि, अनंत, अविच्छिन्न, अखंड परंपरेने जशीच्या तशी विद्यमान आहे. याचे कारण, ही संस्कृती ईश्वरनिर्मित आहे. ईश्वरस्वरूप वेदांतून उपलब्ध झाली आहे. मनूने वेदवाणीबाबत लिहिले आहे, की-
अनादि निधना नित्या वागुत्सृष्टा स्वयंभुवा।
अर्थ - वेदाद्वारा प्रगट झालेली वेदवाणी अनादी, अनंत अशी आहे. जगात वैदिक संस्कृतीच फक्त ईश्वरनिर्मित आहे. अन्य संस्कृती मानवनिर्मित आहे. श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे-
सहयज्ञा: प्रजा: सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति:।
अनेन प्रसविष्यध्वं एव वोऽस्त्विष्टकामधुक।।
अर्थ - प्रजापति ब्रह्मदेवाने सर्व प्रजा धर्मासह निर्माण केल्या आणि त्यांना तो म्हणाला, या धर्माचे आचरण करा, म्हणजे तुमचे मनोरथ पूर्ण होईल.
वरील गीतावचनांत यज्ञ या शब्दाचा अर्थ आहे धर्म! कारण `यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्' या वेदवचनात यज्ञ म्हणजेच धर्म असा अर्थ दिला आहे. तर्कानेही सिद्ध होते की ८४ लक्ष प्राण्यांतील प्रत्येक प्राण्याचा धर्म, त्याचा आहार, विहार, संरक्षण, रोगनिवारण, भोग, अपत्य, संगोपन इ. प्राण्याच्या उत्पत्तिबरोबर लावून दिलेला असतो. त्याप्रमाणे मानव प्राण्यालाही धर्म उत्पत्तीबरोबर लावून दिला आहे.
माऊली लिहितात-
ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा,
देवा येथ आश्रयो काय आम्हा,
तव तो म्हणे कमळजन्मा, भूताप्रति,
तुम्हा वर्णाश्रमवशे, स्वधर्मू हा विहिला अस,
यात उपासा मग आपैसे, पुरती काम।
अर्थ- वर्णाश्रमाची व्यवस्था ब्रह्मदेवाने मानवाच्या उत्पत्तीबरोबर प्रगट केली. धर्म, धर्माचार, सदाचार, संस्कृती परमेश्वराने सृष्टीबरोबरच निर्माण केली आणि वेदद्वारा प्रगट केली. यावरून वैदिक धर्म, संस्कृती सृष्ट्युप्तत्ती किती प्राचीन आहे हे कळते.