आपल्या माणसांशी संवाद वाढवा तेंव्हाच शमेल भावनांचा कल्लोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 02:26 PM2021-03-23T14:26:48+5:302021-03-23T14:27:11+5:30
प्रेम, माया, ममता, दया आपुलकी यांसारख्या भावना व्यक्त करायला तर इथे कुणालाच वेळ नाही. शेवटी हे स्पर्धेचे युग ना. इथे आज कुणालाच कुणाच्या भावना समजून घ्यायला वेळ नाही. मग हा भावनांचा कल्लोळ कसा थांबेल ?
- सचिन व्ही. काळे
“ व्यक्तीच्या मनाची व शरीराची प्रक्षुब्ध अवस्था म्हणजे भावना होय. ” इंग्रजी मध्ये आपण यालाच Emotion म्हणतो. Emover या लॅटीन शब्दापासून या शब्दाची उत्पत्ती झाली. Emover म्हणजे ‘ उत्तेजित होणे / प्रक्षुब्ध होणे.’ आनंद, सुख, समाधान या सकारात्मक’ भावना आहेत. तर राग, द्वेष, भीती यासारख्या भावना नकारात्मक. याच भावनांमुळे व्यक्तीचे जीवन सुंदर आणि अर्थपूर्ण बनले आहे. एक विचार केला की, लक्षात येते या भावनाच जर व्यक्तीच्या मनात उत्पन्न झाल्या नसत्या तर व्यक्तीचे जीवन निरर्थक बनले असते. व्यक्ती जणू काही जीव असून निर्जीव बनला असता. जणू काही सजीव धोंडाच. या भावना फक्त मानवा मध्येच उत्पन्न होतात का ? या प्रश्नांचे उत्तर आपणच देऊ की, नाही. प्रेम, माया, करुणा, दया, राग, लोभ, द्वेष या सारख्या भावना इतर प्राण्यांमध्ये ही तितक्याच ओतप्रोत भरलेल्या आहेत. इतक्या या भावना सर्व प्राणीमात्रांमध्ये महत्त्वाच्या आहेत.
या भावनाच व्यक्तीच्या मनात निर्माण झाल्या नसत्या तर या जगाचा व्यवहारच शून्य झाला असता. पण आज याच भावनांचा व्यक्तीच्या मनात एक कल्लोळ माजला आहे. पूर्वी पेक्षा आज व्यक्ती जास्त स्वतंत्र आहे. मौज-मजेची अनेक साधने आज त्यासाठी उपलब्ध आहेत. तरी ही त्याच्या जीवनात भावनांचा हा कल्लोळ दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. आज इथे प्रत्येक व्यक्तीला वाटते की, माझ्या भावना कधीच कुणाला का समजत नाही ? मी एकाकी पडत चाललोय. मला समजून घ्यायला, इथे कुणालाच वेळ नाही. माझ्या भावना या काय चुकीच्या आहेत का ? असे किती तरी प्रश्न आज अनेकांच्या मनात घोंगावत आहे.
भावनांची जणू काही गर्दीच प्रत्येकाच्या मनात झाली आहे. आज जो-तो आपल्या भावना जपण्याचा प्रयत्न करत आहे. मग प्रेम, राग, द्वेष, मत्सर अशा किती तरी उत्पन्न होणाऱ्या भावना आज प्रत्येकजण 21 साव्या शतकातील विविध माध्यमातून व्यक्त होतो आहे. जसे की, फेसबुक, व्हाटस अप यासारख्या गोष्टीवारे तो आपल्या भावना प्रगट करत आहे. तासंतास स्टेटस्, कमेंट, चाटिंग करून आपल्या भावना व्यक्त करत आहे. एवढे करून ही भावनांचा हा कळलो काही कमी होत नाही. या द्वारे व्यक्तीच्या असंख्य भावना व्यक्त होत असल्या तरी त्याच्या मनात एक खंत आहे. भावनांचा कल्लोळ त्याच्या मनात आहे. माझ्या भावना वाचायला , त्या समजून घ्यायला कुणा कडेच वेळ नाही. जो तो स्वतःच्या विश्वात आहे. म्हणून राग, द्वेष या सारख्या नकारात्मक भावना आज व्यक्ती कडून पटकन व्यक्त होत आहे.
प्रेम, माया, ममता, दया आपुलकी यांसारख्या भावना व्यक्त करायला तर इथे कुणालाच वेळ नाही. शेवटी हे स्पर्धेचे युग ना. इथे आज कुणालाच कुणाच्या भावना समजून घ्यायला वेळ नाही. मग हा भावनांचा कल्लोळ कसा थांबेल ? आपण जेवढ्या जोराने या स्पर्धेच्या युगात धावत आहोत. तेवढ्याच जोराने आपण आपल्याच माणसांपासून पुढे जात आहोत. हे इथे प्रत्येक जण विसरत चाललायं. परंतू आपली म्हणवणारी माणसे मागे पडल्यावर आपण पुढे एकटेच असणार ना ! मग ही अशी अंतराची खोल दरी निर्माण झाल्यावर आपल्या भावना आपल्या माणसांना कशा समजतील ? जर वाटतं असेल की, आपल्या माणसांनी आपल्या भावना समजून घ्याव्या. तर आपल्या माणसांना आपल्या सोबत घेऊन जावे लागेल ना ! ज्याप्रमाणे आपल्या भावना त्याप्रमाणे तशाच त्यांच्या ही भावना असतील ना ! आपल्याच माणसांनी आपल्या भावना समजून घ्याव्या असे आपल्याला वाटते. तसे त्यांच्या ही भावना आपण समजून घ्यायला नको का ? हा प्रश्न स्वतःला विचारायला. इथे प्रत्येक जण विसरतो. त्यांना ही हेच वाटते. हेच प्रत्येकजण विसरून जातो. कारण व्यक्तीचे स्वतःवर जास्त प्रेम असते.
आपल्या मानत झालेली भावनांची गर्दी त्यांच्या ही मनात असू शकते. या भावनांच्या गर्दीतून जेव्हा आपल्या माणसांचा हात धरून चालू तेव्हा हा जीवन प्रवास सुखकर होईल. शिवाय नेहमी मनात होणारा हा भावनांचा कल्लोळ कुठे तरी थांबेल. जरी भावनांचा हा कल्लोळ जास्त वाढलाच. तर आपण धरलेला आपल्या माणसांचा हात आपल्याला या गर्दीतून सही सलामत बाहेर काढेल. यासाठी या भौतिक जगाचा मोह न ठेवता. सर्व सोशल साधनांना भावना व्यक्त करण्याचे माध्यम न समजता. आपल्या माणसांशी संवाद वाढवावा लागेल. त्यांना वेळ द्यावा लागेल. त्यांच्या भावना समजून घ्याव्या लागतील. तरच तुमच्या स्वतःच्या मनातील भावनांचा कल्लोळ थांबेल आणि हे जगणे सुखकर आणि सुंदर होईल. तसेच नकारात्मक भावना कमी होऊन. सकारात्मक भावना वाढीस लागतील आणि भावनांची ही गुंतागुंत, हा कल्लोळ कमी होईल. फेस बुक, व्हाटस अप हे मुख्य भावना व्यक्त करण्याचे तासंतास वेळ घालवण्याचे माध्यम नसून. आपल्या व्यक्तीचा सहवास, त्याच्याशी असणारा संवाद जेवढा जास्त वाढेल. तितका कल्लोळ भावनांचा कमी होईल.
( लेखक हे अध्यात्मिक विषयाचे अभ्यासक आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी 9881849666 )