संधी समोर आहे पण त्याचे सोने करण्याची क्षमता तुमच्यात आहे का? वाचा एका पोपटाची गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 08:00 AM2021-12-08T08:00:00+5:302021-12-08T08:00:02+5:30
आपण सगळेच जण आयुष्याला कलाटणी देणाऱ्या संधीच्या प्रतीक्षेत असतो. पण अनेकदा होते असे, की संधी समोर असते पण आपण तिला ओळखू शकत नाही आणि ओळखता आली तरी तिचे सोने करता येत नाही, कारण आपण त्याची पूर्वतयारीच केलेली नसते. मग आपलीही अवस्था पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या पोपटासारखी होते.
एका राजाला एका पोपट विक्रेत्याने पोपट भेट मिळाला. राजाने त्याला सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवले. सकाळ संध्याकाळ त्याला मनपसंत खाऊ घातले. पोपटाचा राजेशाही थाट सुरू झाला. राजा त्याच्यात रमू लागला आणि पोपट राजदरबारात रमू लागला.
राजाचा खास म्हणून पोपटाला खूप छान सेवा मिळत होती. त्या राजेशाही सुख सोयींनी पोपट चांगलाच गुटगुटीत झाला होता. राजाने त्याच्यासाठी मोठा पिंजरा बनवून घेतला. त्या पिंजऱ्यात तो जिथल्या तिथे उडू शकत होता. त्यातल्या त्यात मोठा पिंजरा मिळाल्याने पोपट खुशीत होता.
कालांतराने राजा कामाच्या व्यापात मग्न झाला आणि त्याचे पोपटाकडे दुर्लक्ष होऊ लागले. कोणीतरी राजाला मोर भेट दिला. तेव्हापासून राजा काम संपले की मोराच्या सान्निध्यात वेळ घालवू लागला. पोपटाची सरबराई चालू होती, परंतु त्या एकलकोंडी आयुष्याने त्याची तब्येत ढासळू लागली. त्याला पिंजऱ्यातून बाहेर पडून मोकळ्या आकाशात उडावेसे वाटू लागले. एकदा तशी संधी चालूनही आली.
पोपटाला शाही स्नानासाठी पिंजऱ्याबाहेर काढले गेले आणि साग्रसंगीत स्नान झाल्यावर त्याला पिंजऱ्यात सोडले. परंतु सेवक त्या पिंजऱ्याचे दार बंद करायला विसरला. जो तो आपापल्या कामाला निघून गेला. तेव्हा पिंजऱ्याचे दार खुले होते, आकाश खुणावत होते, स्वातंत्र्य डोळ्यासमोर होते, परंतु राजेशाही जीवन जगण्यात मश्गुल झालेला पोपट स्वतंत्रपणे उडायचे विसरून गेला होता. त्याच्या पंखातली ताकद गमावून बसला होता. तो राजाच्या अन्नाचा मिंधा झाला होता. त्यामुळे त्याला स्वतंत्रपणे जगण्याची संधी समोर येऊनही त्या संधीचे सोने करता आले नाही.
अशाच सोन्याच्या पिंजऱ्यात आपणही कैद झालेलो नाहीये ना? एकदा यादृष्टीने विचार नक्की करून बघा आणि स्वतःलाच सांगा...
आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा!