विपश्यना अभ्यासाचे मूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 04:15 AM2020-07-15T04:15:31+5:302020-07-15T04:16:33+5:30
क्षण-प्रतिक्षण बदलत राहणे, त्या सतत परिवर्तित होणाऱ्या क्रियांना स्वानुभवाने समजू शकलो, तरच या शब्दाचा अर्थ योग्यप्रकारे समजू शकू, जसा भगवान बुद्धांना अपेक्षित आहे.
- फरेदुन भुजवाला
भगवान गौतम बुद्ध यांनी शिकवलेल्या विपश्यना अभ्यासाचे विश्लेषण अनेक प्रवचनांमधून झाले आहे़ विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांचे गुरू विपश्यनाचार्य सयाजी उ बा शिन यांनीही त्यांच्या प्रवचनातून या विद्येच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले आहे़ भगवान बुद्ध यांच्या शिकवणुकीत तीन आवश्यक लक्षणे सांगितली गेली आहेत़ अनित्य, दु:ख व अनात्म़ जर तुम्ही अनित्यतेला योग्यप्रकारे जाणले तर दु:खाला सखोलतेने समजू शकता आणि अनात्मलाही़ अनात्म म्हणजे, जे ‘मी-माझे’ नाही़ त्याला समजण्यास वेळ लागतो़ अनित्यता, एक असे सत्य आहे, ज्याचा अभ्यासाद्वारे अनुभव केला जाऊ शकतो व नियमित अभ्यासाद्वारे योग्यप्रकारे समजले जाऊ शकते़ त्याच्यासाठी शास्त्रीय ज्ञान पर्याप्त नाही़ कारण त्याने आनुभूतिक ज्ञानाची प्राप्ती होणार नाही़ अनित्यतेचा अर्थ व स्वभाव आहे. क्षण-प्रतिक्षण बदलत राहणे, त्या सतत परिवर्तित होणाऱ्या क्रियांना स्वानुभवाने समजू शकलो, तरच या शब्दाचा अर्थ योग्यप्रकारे समजू शकू, जसा भगवान बुद्धांना अपेक्षित आहे़ जसे बुद्धांच्या काळात, तसेच आजही, कोणीही अनित्यतेला अनभुव करून समजू शकतो़ जरी त्याने बुद्ध साहित्याचे एकही पुस्तक वाचले नसले तरी़ अनित्यतेला समजण्यासाठी प्रत्येकाला शिस्तीने व परिश्रमपूर्वक अष्टांगिक मार्गावर चालावे लागेल़ शील, समाधी व प्रज्ञेला जीवनात उतरावे लागेल़ शील, समाधीचा आचार आहे़ शील पालनाद्वारेच मनाला एकाग्र केले जाऊ शकते़ जेव्हा मन सम्यक रूपाने एकाग्र होते, तेव्हाच प्रज्ञा विकसित होते़ त्यामुळे शील हे समाधीला पुष्ट करण्यासाठी व समाधी ही प्रज्ञेला पुष्ट करण्यासाठी आवश्यक आहे़ प्रज्ञेचा अर्थ आहे, अनित्य, दु:ख व अनात्म यांना विपश्यनेच्या अभ्यासाने समजणे़ बुद्ध शिकवणीचे लक्ष हे दु:खातून नितांत मुक्ती प्राप्त करणे, असे विपश्यनाचार्य सयाजी उ बा खिन हे प्रवचातून सांगत असत़