ज्ञानेश्वरीचे अपूर्व भाष्यकार असा लौकिक असणारे प. पू. मामासाहेब देशपांडे महाराज यांची आज पुण्यतिथी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 01:01 PM2023-03-16T13:01:03+5:302023-03-16T13:02:08+5:30

श्रीपादनवमी अर्थात प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज यांची पुण्यतिथी; त्यानिमित्ताने त्यांच्या जिवनीबद्दल सविस्तर वाचा. 

P. who has the reputation of being an extraordinary commentator of Dnyaneswari. BC Mamasaheb Deshpande Maharaj's death anniversary today! | ज्ञानेश्वरीचे अपूर्व भाष्यकार असा लौकिक असणारे प. पू. मामासाहेब देशपांडे महाराज यांची आज पुण्यतिथी!

ज्ञानेश्वरीचे अपूर्व भाष्यकार असा लौकिक असणारे प. पू. मामासाहेब देशपांडे महाराज यांची आज पुण्यतिथी!

googlenewsNext

>> रोहन उपळेकर 

‘‘आई, श्री ज्ञानेश्वर माउली ‘पायाळू’ हा शब्द आपल्या वाङ्मयात खूप वेळा योजतात. ‘पायाळू’ चा नेमका अर्थ काय गं ?’’ त्यावर मातु:श्री म्हणतात, ‘‘सख्या, सांग बरे, आपण ‘मायाळू’ कोणाला म्हणतो ? तर ज्याच्या हृदयात सर्वांविषयी अपार माया असते तो मायाळू. तसे ज्याच्या हृदयात श्रीसद्गुरूंचे पाय, श्रीचरण अखंड प्रतिष्ठापित असतात तोच 'पायाळू' !’’ असा सद्गुरु श्री माउलींच्या दिव्य शब्दांचा विलक्षण आणि अपूर्व अर्थ सांगणार्‍या मातु:श्री म्हणजेच राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्ण कृपांकित प.पू.सद्गुरु पार्वतीदेवी देशपांडे होत आणि त्यांचे चिरंजीव म्हणजेच थोर स्वातंत्र्यसेनानी व विश्वविख्यात सत्पुरुष, प.पू.योगिराज सद्गुरु श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे होत. आज फाल्गुन कृष्ण नवमी, दि.१६ मार्च २०२३ रोजी प.पू.श्री.मामांची ३३ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त या अलौकिक प्रतिभासंपन्न ज्ञानेश्वरी अभ्यासक अवतारी महात्म्यांच्या कार्याचा हा अल्प परिचय.

प.पू.श्री.मामासाहेब हे भगवान श्री ज्ञानेश्‍वर माउलींचे निष्ठावंत भक्त व संतवाङ्मयाचे साक्षेपी, रसज्ञ अभ्यासक होते. ‘माउली’ हे त्यांचे हृदय अधिष्ठाते होते. श्री माउलींच्या वाङ्मयाचा अखंड अभ्यास हा त्यांचा एकमात्र ध्यास होता. सद्गुरु श्री माउलींच्या वाङ्मयाच्या शब्दान् शब्दावर त्यांनी सखोल चिंतन केलेले होते. झोपेतून उठल्याक्षणीसुद्धा ते श्री माउलींच्या ओव्यांचे चिंतन मांडू शकत असत, इतकी ज्ञानेश्वरी त्यांच्या आत मुरलेली होती. एवढा प्रचंड अधिकार असूनही हा थोर उपासक आजन्म स्वत:ला सद्गुरु श्री माउलींचा दासानुदास मानीत होता. स्वत:ची अभ्यासू वृत्ती त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ताजी, टवटवीत ठेवलेली होती. म्हणूनच श्री माउलींच्या कृपेने त्यांचा हृदयगाभारा अलौकिक ज्ञानतेजाने लखलखीत उजळलेला होता !

प.पू.श्री.मामांचा जन्म पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांच्या आशीर्वादाने व त्यांच्याच अंशाने झाला. आषाढ शुद्ध द्वितीया, दि.२५ जून १९१४ रोजी प.पू.दत्तोपंत व प.पू.सौ.पार्वतीदेवी देशपांडे या सत्त्वशील दांपत्याच्या पोटी प.पू.श्री.मामा जन्मले. त्यांना सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवींकडून सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेची शक्तिपातदीक्षा लाभली. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांना भगवान श्रीपंढरीनाथांचा सगुणसाक्षात्कार झाला. पुढे योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांकडून १९५४ साली शक्तिपातपूर्वक मंत्रदीक्षा आणि लेखी पत्राद्वारे दीक्षाधिकारही त्यांना लाभले. त्यांच्यावर भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचीही पूर्णकृपा होती. अशाप्रकारे प.पू.श्री.मामा हे नाथ-दत्त-भागवत या तिन्ही संप्रदायांचे थोर अध्वर्यू ठरले.

प.पू.श्री.मामांनी आजन्म पंढरीची वारी केली. संपूर्ण हयातीत हजारो प्रवचनांच्या माध्यमातून श्री माउलींचा ज्ञानसंदेश जनमानसात वितरित केला. १९७३ साली इंग्लंडमधील त्यांच्या प्रवचनांनी भारावून जाऊन अनेक परदेशी व्यक्तींनी देखील ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू केला, संतविचारांच्या आधारे उपासनेला सुरुवात केली.

प.पू.मामा हे तरुणपणी उत्तम नाट्य दिग्दर्शक व नाट्य क्षेत्रातील जाणते व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी श्री माउलींच्या जीवनावर लिहिलेले ‘चैतन्य चक्रवर्ती’ हे चार अंकी संगीत नाटक अतिशय बहारीचे आहे. त्यांच्या संहितेवरूनच काही वर्षांपूर्वी ‘ज्ञानोबा माझा’ हे संगीत-नाटक मराठी रंगभूमीवर आले व हिंदुस्थानभर गाजले होते.   

श्री माउलींचे वाङ्मय हे बहुआयामी, प्रगल्भ आणि एकाच वेळी अनेक अर्थांनी प्रकटणारे आहे. त्यासाठी त्याचा अभ्यासकही तसाच अष्टावधानी, रसज्ञ, अभिजात सौंदर्यदृष्टी असणारा व भक्तिमानच असावा लागतो. तरच त्याच्या बुद्धीत श्री माउलींच्या साहित्याचे बीज रुजते. प.पू.मामा हे माउलींच्या वाङ्मयाचे असेच आदर्श अभ्यासक होते. त्यांची दृष्टी देखील श्री माउलींसारखीच सूक्ष्म आणि शुद्ध होती. सद्गुरु श्री माउलींना नेमके काय म्हणायचे आहे ? हे त्यांना अचूक समजत असे. ज्ञानेश्वरीच्या अतिशय कठीण समजल्या जाणार्‍या सहाव्या अध्यायातील अभ्यासयोगावर फारच थोड्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. या विषयावरील प.पू.मामांचेच विवरण जगभर प्रमाण मानण्यात येते. त्यांना आजवरच्या सर्वच थोर महात्म्यांनी व विचारवंतांनी ‘ज्ञानेश्वरीचे अपूर्व भाष्यकार’ म्हणून एकमुखाने गौरविले आहे. आचार्य अत्रे देखील प.पू.मामांकडे येऊन आवर्जून ज्ञानेश्वरीचे मार्गदर्शन घेत असत, असा मामांचा अधिकार होता. आजच्या पुण्यतिथी निमित्ताने त्या थोर सत्पुरुषाला त्रिवार वंदन!

Web Title: P. who has the reputation of being an extraordinary commentator of Dnyaneswari. BC Mamasaheb Deshpande Maharaj's death anniversary today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.