Palmistry: जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध आहेत की नाही, याचे गुपित उलगडणार 'ही' हस्तरेषा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 14:48 IST2025-02-17T14:48:17+5:302025-02-17T14:48:43+5:30

Palmistry : हस्तरेषा शास्त्रात आपल्या भूत, वर्तमान, भविष्याशी संबंधित भाकीत वर्तवले जाते, त्यापैकीच एक आहे विवाह बाह्य संबंधाचे योग; कसे बघायचे ते पाहू!

Palmistry: This palm line will reveal the secret of whether your partner is having an extramarital affair or not! | Palmistry: जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध आहेत की नाही, याचे गुपित उलगडणार 'ही' हस्तरेषा!

Palmistry: जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध आहेत की नाही, याचे गुपित उलगडणार 'ही' हस्तरेषा!

अनेक जण ज्योतिषशास्त्राला नावे ठेवतात. परंतु त्याचा सूक्ष्म अभ्यास केलेल्या तज्ञांकडून ज्योतिष जाणून घेतले, तर या शास्त्राच्या अचूक भाष्याची आपल्याला अनुभूती येऊ शकेल. मात्र आजकाल वरवरचा अभ्यास करून स्वतःला ज्योतिष म्हणवणाऱ्या लोकांमुळे या शास्त्राचे गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. ज्योतिष शास्त्र हे ग्रह ताऱ्यांवर अवलंबून असल्याने आपोआपच ते अवकाश विज्ञानाशीसुद्धा जोडलेले आहे. त्यामुळे त्यात मांडलेले ठोकताळे बिनबुडाचे नसून प्रत्येक गोष्टीला शास्त्राधार आहे. फक्त त्याचा सखोल अभ्यास करणारा अभ्यासू हवा.

या शास्त्राच्या अनेक उपशाखा आहेत. हस्त ज्योतिष, समुद्र ज्योतिष, पंचांग ज्योतिष, अंकज्योतिष इ. या सर्वांचा वापर आपण आयुष्यात मार्गदर्शन करून घेण्यापुरता करू शकतो. ज्योतिषशास्त्र आपल्याला दिशा दर्शकाचे काम करू शकते. परंतु त्यावर पूर्णपणे विसंबून राहणे आणि कर्तव्यशून्य होणे चुकीचे ठरेल. कारण मनुष्याच्या कर्तृत्वामध्ये ग्रहदशा पालटण्याचेही सामर्थ्य आहे. त्यामुळे भविष्य ऐकून खचून न जाता त्या अनुषंगाने निर्णय घेणे, हे जास्त उचित ठरू शकते. 

विवाह हा मनुष्याच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. तो यशस्वीपणे पार पडला तर अर्धे युद्ध जिंकल्यासारखे असते. परंतु अनेकांच्या आयुष्यात विवाह ठरण्यापासून टिकण्यापर्यंत अडचणींचा ससेमिरा काही केल्या थांबत नाही. अशा वेळी हस्त ज्योतिष त्या अडचणींमागचे सर्वसामान्य बुद्धीला चटकन कळू शकेल असे कारण सांगते. ते कारण म्हणजे - 

>> आपल्या हाताच्या करंगळीच्या खाली असलेली रेषा आपले वैवाहिक जीवन दर्शवते. ही रेषा तळहाताच्या बाहेरून आत येते. या ओळीच्या मध्यभागी स्पष्टता, लांबी, तुटकपणा यासारख्या गोष्टी विवाहाबद्दल भाकीत करतात. कधीकधी येथे एकापेक्षा जास्त रेषा असतात, परंतु सर्वात लांब आणि स्पष्ट असलेली रेष म्हणजे लग्नाची रेष मानली जाते.

>> लग्नाच्या रेषेच्या आसपासच्या रेषा प्रेम संबंधांबद्दल भाकीत करतात. जितक्या रेषा जास्त, तेवढी जास्त प्रेमप्रकरणं! थांबा! हे वाचून लगेच कोणाच्या व्यक्तिमत्त्वावर शंका घेऊ नका. अनेकदा प्रेम एकतर्फी, अप्रगट, अव्यक्त स्वरूपाचेही असू शकते. वयाच्या त्या त्या टप्प्यावर एकाकी आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत स्वाभाविकपणे तसे घडू शकते. हस्त शास्त्राचा सांगायचा मुद्दा एवढाच, की त्या छोट्या आणि अस्पष्ट रेषा तात्कालिक प्रेमसंबंध दर्शवतात. 

>> त्यातील ठळक रेषा जी हृदय रेषेच्या अगदी जवळ असेल तर व्यक्तीचे लवकरच लग्न होते. याउलट हृदय रेषेपासून ती रेषा दूर असल्यास विवाहाला विलंब दर्शवते. 

>> ज्या लोकांना करंगळीखाली दोन ठळक रेषा असतात, त्यांचे दोन विवाह होतात. पहिल्या विवाहात काडीमोड होऊन दुसरा विवाह होतो. सामंजस्याने घेतले तर विवाह टिकतो अन्यथा त्यातही अडचणी येऊ शकतात. 

>> लग्नाची रेषा सुरू होते त्यावर दुसरी रेषा दुभंगून जात असेल, तर विवाह मोडण्याची शक्यता असते. अशा लोकांनाही पुनर्विवाहाला सामोरे जावे लागते. 

>> लग्न रेषा सूर्य रेषेकडे झुकत असेल तर श्रीमंत घराचे स्थळ सांगून येते. 

>> जर लग्नाची रेषा सरळ जाण्याऐवजी खाली वाकली तर अशा लोकांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतात.

या सर्व सूचनांबरोबरच आणखी एक नियम हस्तशास्त्र किंवा इतरही शास्त्र सांगते, ते म्हणजे तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने विश्वासाने एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला असेल, तर कोणत्याही अडचणीतून वाट शोधता येते. 

Web Title: Palmistry: This palm line will reveal the secret of whether your partner is having an extramarital affair or not!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.