Palmistry: तळहातावरील 'ही' अखंड रेषा लग्नानंतर घडवते भाग्योदय; तुमच्याही नशिबात आहे का बघा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 02:15 PM2023-08-03T14:15:00+5:302023-08-03T14:15:30+5:30
Palmistry: हस्तरेषा शास्त्रानुसार अनेकांचा भाग्योदय लग्नानंतर होतो, अर्थात त्यासाठी पूरक असणारी भाग्यरेषा हातावर असावी लागते; कोणती ते जाणून घ्या!
हातावरील रेषा माणसाच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगतात. ज्योतिष शास्त्रातील हस्तरेषा हा प्रचलित प्रकार आहे. एखाद्या व्यक्तीचे भाग्य जाणून घ्यायचे असेल तर कुंडली इतकीच त्याची भाग्यरेषा खूप महत्त्वाची मानली जाते. काही जणांचे भाग्य लग्नाआधी चमकते तर काही जणांचे लग्नानंतर! असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या हातात भाग्यरेषा शुभ स्थितीत असेल तर अशा व्यक्तीचे लग्न झाल्यानंतर नशीब चमकते आणि त्याला भरपूर संपत्ती मिळते. चला तर मग जाणून घेऊया भाग्य रेषेशी संबंधित काही खास गोष्टी.
हातात भाग्यरेषा कुठे असते
हस्तरेषा शास्त्रानुसार, तळहाता जिथून एक सरळ रेषा निघते आणि मधल्या बोटापर्यंत पोहोचते, तर तिला भाग्यरेषा म्हणतात. भाग्यरेषा मनगटाच्या रेषेपासून सुरू होते आणि थेट मधल्या बोटाच्या उंचावलेल्या जागी जाते. मधल्या बोटाच्या खाली असलेल्या उंचवट्याला शनि पर्वत म्हणतात.
अशी भाग्यरेषा खूप शुभ मानली जाते
हस्तरेषा शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या हातातील भाग्यरेषा मनगटाच्या वर म्हणजेच तळव्यापासून उगम पावून थेट शनि पर्वतावर गेली असेल तर ती खूप शुभ असते. अशी रेषा असलेली व्यक्ती लग्नानंतर भाग्यवान ठरते. असे लोक लग्नानंतर खूप पैसे कमावतात. हस्तरेषा शास्त्रानुसार अशा लोकांचे नशीब लग्नानंतर पालटते, चमकते. त्यांच्या भाग्यालाच कलाटणी मिळते.
हीच रेषा भंग पावत असेल तर-
हस्तरेषा शास्त्रानुसार, शनि पर्वतावर गेलेली रेषा दुभंगून गुरु पर्वताच्या खाली म्हणजेच तर्जनीपर्यंत पोहोचली तर अशी व्यक्ती अत्यंत दानशूर आणि परोपकारी स्वभावाची असते. मात्र ज्यांची भाग्यरेषा तळहातावर छेद गेलेली असेल, त्या व्यक्तीला आयुष्यात अनेक प्रकारचे संघर्ष आणि संकटांना सामोरे जावे लागू शकते.
हस्तरेषा शास्त्रात सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या भाग्य रेषेचा शेवटचा भाग वरच्या दिशेने झुकलेला असेल तर अशा व्यक्तीचे जीवन आनंदी राहते आणि त्यांच्या प्रगतीत सहसा बाधा न येता त्यांच्या आयुष्याचा आलेख उंचावत जातो. हे सर्व वर्णन वाचल्यावर साहजिकच तुम्हीसुद्धा तुमची भाग्यरेषा तपासून पाहिली असेल. ती जर या वर्णनाशी मिळती जुळती असेल तर आनंदच आहे आणि नसेल तर कष्टाला पर्याय नाही हे लक्षात घ्या आणि कामाला लागा!