Palmistry: तुमचे वैवाहिक जीवन कसे असेल याचा उलगडा करतील तुमच्या हस्तरेषा; कशा ते पहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 04:18 PM2024-04-24T16:18:12+5:302024-04-24T16:21:00+5:30
Vivah Rekha: हस्तरेषा शास्त्रात आपल्या हातावरील रेषा पाहून भाकीत वर्तवले जाते; तुम्ही विवाहोत्सुक असाल तर दिलेली माहिती अवश्य वाचा!
आयुष्यातील अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न असते लग्नाचे! जोडीदार मनासारखा मिळावा, सांभाळून घेणारा असावा, साथ देणारा असावा, अशा अपेक्षा असतात. मात्र अलीकडे वाढत्या अपेक्षांमुळे लग्न लांबणीवर लागली आहेत. त्यामुळे लग्नाचं स्वप्न हे स्वप्नच राहते की काय अशी अनेकांना भीती वाटते. त्यामुळे विविध ज्योतिष तज्ञांकडे जाऊन ते उपाय विचारतात, लग्न कधी होईल हे विचारतात. असे असले तरी लग्न ठरण, होणं, टिकण या योगाच्या आणि नशिबाच्या गोष्टी आहेत हेच खरं! तरीदेखील स्वत: बद्दल थोडी फार माहिती जाणून घेता आली तर? आनंदच होईल न? यासाठीच हस्त ज्योतिषकारांनी ढोबळ मानाने केलेले मार्गदर्शन जाणून घ्या आणि त्यानुसार स्वत:ला ताडून पहा!
प्रेम आणि वैवाहिक जीवन कसे असेल, हे हस्तरेषेच्या विवाह रेषेच्या स्थितीवरून कळू शकते. एखाद्या व्यक्तीचे लग्न कधी होईल, त्याला जीवनसाथी कसा मिळेल, त्याची आर्थिक स्थिती काय असेल, व्यक्तीचे वैवाहिक जीवन कसे असेल? इ. गोष्टी विवाह रेषेवरून कळू शकतात. ते कसे ओळखायचे ते जाणून घेऊ.
>> हातातील सर्वात लहान बोटाखाली अर्थात करंगळी खाली लहान आडव्या रेषा असतात, या रेषा तळहाताच्या बाहेरून आतील बाजूस येतात. त्यांना विवाह रेषा (Marriage Line in Palm) म्हणतात. या रेषा हृदय रेषेच्या वर असतात.
>> ज्या लोकांच्या हातात स्पष्ट विवाह रेषा असते आणि चंद्र पर्वतावरून येणारी रेषा भेटते, अशा व्यक्ती विवाहाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. त्यांना श्रीमंत जीवनसाथी मिळतो. सासरच्या मंडळींकडून भरपूर संपत्ती आणि ऐश्वर्य मिळते.
>> जर चंद्र पर्वतावरून एखादी रेषा लग्न रेषेसोबत पुढे सरकत असेल तर अशा व्यक्तीला जीवनसाथीकडून खूप प्रेम मिळते. त्यांच्या वैवाहिक जीवनात नेहमीच प्रेम मिळते.
>> ज्या लोकांची विवाह रेषा पुसट आणि पातळ असते, ते आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक नसतात. या लोकांमध्ये एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध असू शकतात. त्यांची ओढ विवाहबाह्य संबंधांमध्ये दिसून येते.
>> जर विवाह रेषा ठळक असेल तर अशा लोकांच्या वैवाहिक जीवनात नेहमी प्रेम आणि उत्साह असतो. पुसट विवाह रेषा (Marriage Line in Palm) असणाऱ्या जोडप्यांमध्ये उदासीनता दिसून येते.
>> ज्या लोकांच्या हातात २ समान विवाह रेषा असतात, त्यांची २ लग्न होण्याची शक्यता असते. तसेच २ रेषा असून जर रेषा तुलनेने पुसट आणि कमी जास्त असेल, तर अशा व्यक्तीचे लग्न एकदाच होते परंतु त्यांचे प्रेमसंबंध असू शकतात.