पंचग्रही योग, रामलला प्राणप्रतिष्ठाप्रमाणे शुभ मुहूर्त; ज्ञानवापीत १ लाख भाविकांचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 11:22 AM2024-02-03T11:22:31+5:302024-02-03T11:22:58+5:30
Gyanvapi: ज्ञानवापीत जाऊन आतापर्यंत एक लाख भाविकांनी दर्शन घेतले असून, पुराणांतील उल्लेखांनुसार याचे नामकरण आता ज्ञान तळगृह करण्यात आले आहे.
Gyanvapi: ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघरात हिंदूना पूजा करण्याचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला. ज्ञानवापीत पूजा करण्याची जबाबदारी काशी विश्वनाथ ट्रस्टकडे दिली आहे. व्यास तळघराचे शुद्धीकरण करून पूजा करण्यात आली तसेच आरतीच्या वेळाही ठरवण्यात आल्या. ज्ञानवापीच्या व्यास तळघरात करण्यात आलेले पूजन अतिशय शुभ मुहुर्तावर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. रामलला प्राणप्रतिष्ठेप्रमाणेच हा मुहूर्त अतिशय अद्भूत होता, असे सांगितले जात आहे.
ज्ञानवापीतील व्यास तळघरात गणपती, श्रीविष्णू यांच्या एक, तर हनुमंतांच्या दोन, जोशीमठ येथील दोन प्रतिमांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर राम नाम लिहिलेली एक वीट स्थापन करण्यात आली आहे. एक मकर आणि एक अखंड ज्योत स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय दिवसातून पाच वेळा आरतीही करण्यात येणार आहे. काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओम प्रकाश मिश्रा आणि अयोध्येतील रामललाच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त ठरवणारे गणेश्वर द्रविड यांनी व्यास तळघरात पहिली पूजा केली.
गुरु ग्रहाच्या विशेष योगामुळे एक लाख दोष निवारण शक्य?
राम मंदिर आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठाप्रमाणेच तळघरात पूजेची वेळ होती. पंचग्रही योगात केलेल्या उपासनेच्या वेळी गुरुच्या विशेष संयोगाने एक लाख दोष दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जात आहे. तूळ लग्न मंगळ, शुक्र, बुध, मीन राशीत असलेला राहु आणि मेष राशीत असलेला गुरु यांमुळे विजयकारक योग जुळून येत होता, अशी माहिती देण्यात आली आहे.
तूळ लग्नात पाच ग्रहांचा शुभ मुहूर्त
राम मंदिराचा शुभ मुहूर्त सांगणारे पं.गणेश्वर शास्त्री यांचे थोरले बंधू पं. विश्वेश्वर शास्त्री द्रविड यांनी सांगितले की, व्यास तळघरातील पूजेसाठी संधिकालापूर्वीचा मुहूर्त मुहूर्त देण्यात आला होता. हा अतिशय शुभ मुहूर्त होता. रात्री ११:५५ ला तळघरात प्रवेश केल्यानंतर १२:१४ वाजता पूर्ण व्हायची वेळ होती. यानंतर पूजेची वेळ देण्यात आली. या काळात शुभ मुहूर्ताचा विचार केला तर तूळ लग्न असताना पाच ग्रहांचा शुभ योग तयार होत होता. धनु राशीत मंगळ आणि शुक्र, चौथ्या स्थानी बुध, सहाव्या स्थानी मीन राशीत राहु, सातव्या स्थानी मेष राशीत गुरू होता. गुरू केंद्रस्थानी असून, लग्नस्थानी शुभ दृष्टीत होता. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अशाच प्रकारचा अत्यंत शुभ मुहूर्त देण्यात आला होता. गुरु ग्रहामुळे एक लाख दोष दूर होण्याची क्षमता निर्माण झाली. यामुळे सर्व योग विधर्मींचा नाश करणारे विजयी योग निर्माण झाला, असा दावा करण्यात आला आहे.
एक लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले
व्यास तळघरात शुक्ल यजुर्वेद माध्यंदिनी शाखा मंत्राने देवतांची षोडशोपचार पूजा केली जात आहे. पाच प्रहर आरती व नैवेद्य देवतांना अर्पण करण्यात आले. तळघरात ठेवलेल्या मूर्तींचे एक लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. काशी नरेश महाराज विभूती नारायण सिंह यांच्या काळातील पूजा पद्धतीनुसार तळघरात पूजा केली जात आहे. ज्ञानवापीत ब्रह्ममुहुर्तावर पहाटे ३.३० वाजता मंगला आरती, दुपारी १२ वाजता भोग आरती, सायंकाळी ४ वाजता अपरान्ह आरती, ७ वाजता सायंकाल आरती आणि रात्री १०.३० वाजता शयन आरती करण्यात येणार आहे.
दरम्यान, काशी विद्वत परिषदेचे सरचिटणीस प्रा. रामनारायण द्विवेदी यांनी सांगितले की, व्यास तळघराचे नाव ज्ञान तळगृह ठेवण्यात आले आहे. देवाचे स्थान असलेल्या या तळघराचे नाव शास्त्रोक्त नव्हते. तळघराचे वर्णन कूर्म पुराणातही आढळते. त्याआधारे व्यास तळघराला ज्ञान तळगृह असे नाव देण्यात आले आहे.