Pandav Panchami 2021 : उत्तराखंड येथील छोट्याशा गावात साजरी होते पांडव पंचमी; कारण आजही तिथे राहतात पांडवांचे वंशज!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 11:42 AM2021-11-09T11:42:46+5:302021-11-09T11:44:22+5:30
Pandav Panchami 2021 : उत्तराखंड ही देवभूमी म्हणून ओळखली जाते. तिथले निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची बारमाही रीघ लागलेली असते. तेथील एक छोटेसे गाव रामायण आणि महाभारताशी संबंधित आहे.
महाभारताच्या महाग्रंथातून बोध घेताना आपल्याला नेहमी शिकवण दिली जाते, की बंधुभाव असावा तर पांडवांसारखा! तेच पांडव जे शंभर कौरवांना पुरून उरले. त्यांचा आदर्श ठेवून त्यांची शिकवण आत्मसात व्हावी म्हणून आजच्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुद्ध पंचमीला पांडव पंचमी साजरी केली जाते. आपण तर त्यांचा आदर्श ठेवायचाच, परंतु आजही भारतात असे एक गाव आहे जिथे कौरव पांडवांचे वंशज राहत असल्याचा दावा केला जातो. चला सविस्तर जाणून घेऊया.
उत्तराखंड ही देवभूमी म्हणून ओळखली जाते. तिथले निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची बारमाही रीघ लागलेली असते. तेथील एक छोटेसे गाव रामायण आणि महाभारताशी संबंधित आहे. तिथले वैशिष्टय म्हणजे आजही कौरव पांडवांचे वंशज राहतात असे म्हटले जाते. अशा गावी भेट द्यायला आपल्यापैकी प्रत्येकाला नक्कीच आवडेल, हो ना ? चला आज पांडव पंचमीनिमित्त त्या गावाबद्दल अधिक जाणून घेऊया.
उत्तराखंडच्या गढवाल येथे कलाप नावाचे गाव आहे. हे गाव इतर शहरी विभागापासून अलिप्त आहे. तिथे मानववस्तीदेखील विरळ आहे. त्यामुळे हे गाव पर्यटकांना फारसे परिचित नाही. परंतु हे गाव अनेक पौराणिक घटनांशी जोडलेले आहे. कलाप गाव एका लांब रुंद पसरलेल्या घाटात स्थित आहे. असे म्हणतात, की हे गाव महाभारताची जन्मभूमी आहे. एवढेच नाही तर या गावाशी रामायणाचाही संबंध आला होता असे म्हणतात. म्हणून इथले गावकरी आजही स्वतःला कौरव आणि पांडव यांचे वंशज असल्याचे सांगतात.
या गावात आजही आधुनिक सोयी सुविधा पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांचा उदर निर्वाह गावातले उद्योग धंदे यावर चालतो. अशा परिस्थितीमुळे हे गाव एकविसाव्या शतकातले वाटत नाही, तर ते पुराणकाळातलेच वाटते. परंतु, याच गोष्टीमुळे तेथील निसर्ग सौंदर्य अबाधित राहिले आहे. म्हणून पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने त्या गावापर्यंत दळणवळणाच्या सोयी सुविधा वाढवण्याचा पर्यटन क्षेत्राचा प्रयत्न सुरू आहे.
या गावाला पौराणिक इतिहास असल्यामुळे गावात महाभारतकालीन प्रसंगाशी संबंध सांगणारे उत्सव साजरे केले जातात. विशेषतः पांडव पंचमीच्या उत्सवाला आजूबाजूच्या गावचे लोकही उत्सवात सहभागी होतात. तिथे दर दहा वर्षांनी महारथी कर्ण याचा उत्सव केला जातो. तसेच जानेवारीत पांडव नृत्याचा सोहळा होतो. महाभारत व रामायण कथांमधील विविध प्रसंग नाट्यरूपात सादर केले जातात. उत्सवाच्या वेळी तिथे गव्हाची कणिक आणि गूळ घातलेला गोड पदार्थ बनवला जातो.
वरील सर्व वर्णन वाचल्यावर तुम्हालाही तिथे जाण्याबद्दल कुतूहल निर्माण झाले असेल ना? तर तिथे कसे जायचे पहा. कलाप दिल्ली पासून ५४० किमी दूर आहे. तर डेहरादून येथून २१० किमी दूर आहे. इथे वर्षभरात कधीही जाऊ शकता. तेथील हिमवृष्टीचा सोहळा अतिशय नयनरम्य असतो.