Pandav Panchami 2022: पांडव पंचमीनिमित्त जाणून घ्या असंगाशी संग न करता सत्संग का जोडावा, याचे मुख्य कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 07:00 AM2022-10-29T07:00:00+5:302022-10-29T07:00:02+5:30

Pandav Panchami 2022: आपले शिक्षक आपल्या पालकांना नेहमी सांगत असत की मुलांची संगत बदला, त्यामागचे कारण या दोन उदाहरणांवरून सापडते!

Pandav Panchami 2022: On Pandav Panchami, Know importance of good company! | Pandav Panchami 2022: पांडव पंचमीनिमित्त जाणून घ्या असंगाशी संग न करता सत्संग का जोडावा, याचे मुख्य कारण!

Pandav Panchami 2022: पांडव पंचमीनिमित्त जाणून घ्या असंगाशी संग न करता सत्संग का जोडावा, याचे मुख्य कारण!

googlenewsNext

आपला जन्म कुठे व्हावा, हे आपल्या हातात नाही, परंतु आपण संगत कोणाशी ठेवू शकतो, हे आपल्या हातात आहे. कारण, आपण ज्या व्यक्तींच्या, विचारांच्या सान्निध्यात राहतो, तसे आपले विचार घडत जातात. आपल्याही नकळत दुसऱ्यांच्या लकबी, शब्द आत्मसात होतात. विशेषत: वाईट गोष्टी चटकन अंगवळणी पडतात. उदाहरण द्यायचे, तर अपशब्द किंवा शिव्या मुलांना शिकवाव्या लागत नाही. कुठून तरी ऐकून ते शिकतात आणि प्रसंगी पद्धतशीरपणे त्याचा प्रयोगही करतात. मात्र चांगले श्लोक, सुविचार त्यांना शिकवावे लागतात. नव्हे तर घोकून घ्यावे लागतात. तरी ऐनवेळेवर त्यांना ते सुचतील, आठवतील असे नाही. म्हणून तर शालेय जीवनात आपली अधोगती दिसू लागली, की शिक्षिका आपल्या रोजनिशीत शेरा लिहून देत, 'आपल्या पाल्याची संगत बदला.' हा नियम शाळेपुरता नाही, तर आयुष्यभराचा आहे.

बालपणी आपल्याला छान श्लोक शिकवला होता, तो आठवतोय का? चला उजळणी करू.
सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो,
कलंक मतीचा घडो, विषय सर्वथा नावडो,
सदंध्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो,
वियोग घडता रडो, मन भवत्चरित्री जडो!

याची आणखीही कडवी आहेत. परंतु, इथे पाहूया, या श्लोकाची पहिली ओळ. नेहमी चांगली संगतच हवी. कानावर सतत चांगल्याच गोष्टी पडल्या पाहिजेत.  एवढा एकच नियम जरी पाळला, तरी आपले आयुष्य खूप सोपे होईल. पण नाही. आपण सतत नकारात्मक गोष्टींच्या छायेत असतो आणि तसाच विचार करू लागतो. यासाठी रामायण आणि महाभारतातील दोन उदाहरणे पाहू.

'कैकयी' या नावाभोवती नकारात्मक छटा आहे. कारण, तिने रामाला वनवासाला पाठवून, आपला पूत्र भरत याच्यासाठी राज्यसिंहासन मागून घेतले होते. परंतु, तुम्हाला माहित आहे का? कैकयी आधी तशी नव्हती. कौसल्येपेक्षा रामावर ती जास्त प्रेम करत होती. एवढेच नाही, तर भरतापेक्षाही जास्त, ती रामाचे लाड करत असे. मग असे असतानाही ती एकाएक रामाच्या बाबतीत एवढी कठोर का झाली? तर उत्तर आहे, संगत! मंथरा नावाची दासी तिच्या सान्निध्यात आली. तिने तिचे वाईट आणि कुत्सित विचार कैकयीच्या डोक्यात भरले आणि कैकयी तिच्या विचाराने विचार करू लागली, मग तिलाही सगळे वाईटच दिसू लागले. अशी मंथरा केवळ कैकयीच्या नाही तर आपल्याही अवती भोवती असते. तिला वेळीच ओळखून पळवून लावले पाहिजे. कलियुगात मंथरेची रूपे अनेक आहेत. टीव्ही, इंटरनेट, महामालिका, चित्रपट, सोशल मीडिया इ. गोष्टी ज्ञानाबरोबर वाईट गोष्टींचाही प्रसार करत आहेत. त्यांचा पुरेसा वापर करून त्यांना चार हात लांब ठेवणे उत्तम!

दुसरे उदाहरण कृष्णाचे. युद्धाचा प्रसंग जवळ आलेला असताना दुर्योधन आणि अर्जुन कृष्णाजवळ आले. कृष्णाने विचारले, तुम्हाला मी हवा आहे की माझे सैन्य? दुर्योधनाने सैन्य तर अर्जुनाने कृष्णाला मागून घेतले. याचा परिणाम असा झाला, की कुरुक्षेत्रावर लढण्याऐवजी अर्जुनाला नकारात्मक विचारांनी घेरले, तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्गदर्शन केले. त्याच्या मनातील वाईट गोष्टी बाजूला करून चांगल्या गोष्टींसाठी, ध्येयासाठी, अधर्माविरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहित केले. आपल्याही आयुष्यात अर्जुनावर आली तशी वेळ वारंवार येत असते. तेव्हा आपल्याबरोबर कृष्णासारखी व्यक्ती असायला हवी. जी आपले विचार बदलून चांगल्या कामासाठी आपल्याला प्रवृत्त करेल.

म्हणून आजपासून डोळसपणे पहा. आपण कोणाच्या सहवासात आहोत? मंथरेच्या, की कृष्णाच्या? 

Web Title: Pandav Panchami 2022: On Pandav Panchami, Know importance of good company!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.