Pandav Panchami 2022: कुरुक्षेत्रात विजय मिळाल्यावर श्रीकृष्णाने पांडवांना शांतीयज्ञ का करायला सांगितला? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 02:32 PM2022-10-28T14:32:57+5:302022-10-28T14:33:33+5:30

Pandav Panchami 2022: कौरव पांडवांच्या युद्धात पांडवांना विजय मिळाला तरी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती, त्यांचे मन विषण्ण झाले होते. त्यावर कृष्ण म्हणाले... 

Pandav Panchami 2022: Why did Lord Krishna ask the Pandavas to perform Shantyagya after victory in Kurukshetra? Find out! | Pandav Panchami 2022: कुरुक्षेत्रात विजय मिळाल्यावर श्रीकृष्णाने पांडवांना शांतीयज्ञ का करायला सांगितला? जाणून घ्या!

Pandav Panchami 2022: कुरुक्षेत्रात विजय मिळाल्यावर श्रीकृष्णाने पांडवांना शांतीयज्ञ का करायला सांगितला? जाणून घ्या!

googlenewsNext

संसाराकडे, जीवनाकडे कर्मभोग म्हणून पाहणारी अर्थातच स्वहिताकडे लहानपणापासून लक्ष ठेवून असणारी महामाता कुंती, भगवान श्रीकृष्णांना एकदा म्हणाली, 'भगवान कृष्ण, हा अहंकार आत्मोन्नतीसाठी घातक ठरतो. याला बाजूला सारण्याचा हुकुमी उपाय म्हणजे तुझे सतत नामस्मरण माझ्या मनाला हे वारंवार बजावीत असतानाही हे नाठाळ मन या अहंकाराच्या आहारी जाऊन कधीकधी मला तुझे विस्मरण होण्यास भाग पाडते. म्हणून भगवंता, तुझ्याजवळ एकच मागणे आहे, ते म्हणजे जगातील दु:खे आशीर्वाद म्हणून माझ्या पदरी टाक, जेणे करून 'भगवंता सोडव' त्यापलीकडे माझ्या मुखातून काहीही येणार नाही.'

महाभारत युद्धानंतर झालेली जीवितहानी पाहून पांडवांचे मन विषण्ण झाले. दोन कुटुंबांच्या वादात, अहंकारात अकारण निष्पाप जीवांचा बळी गेला. विजय मिळूनही त्याचा आनंद उपभोगावा अशी परिस्थिती नव्हती. आपल्या हातून घडलेल्या पातकाची टोचणी त्यांना अस्वस्थ करत होती. यावर भगवान श्रीकृष्णाने त्यांना एक यज्ञ करावयास सांगितला व त्याच्या मुख्य अधिकारपदासाठी जगातील घडामोडींचा संपर्कही नसलेल्या आणि निर्जन ठिकाणी आश्रम स्थापून राहिलेल्या वकदालभ्य मुनींना बोलवा, अशी आज्ञा केली. 

अनुक्रमे पाच पांडव त्यांना बोलवण्यास गेले. परंतु त्यांनी येण्यास नकार दिला. त्यांचे म्हणणे एकच! शंभर यज्ञ झाले असतील तरच त्या ठिकाणी मी जातो. अर्जुनाने तर महाभारत युद्धाचा विषय काढताच वीज कडाडावी तसे ते ओरडले, 'कसले युद्ध? आम्हाला असली भाषाच माहीत नाही. हा शांतिआश्रम आहे, चल नीघ इथून!' शेवटी कुंतिमातेने द्रौपदीच्या कानामध्ये काही सांगितले. शेवटचा उपाय म्हणून द्रौपदी त्यांना बोलवण्यास गेली. 

अहंकाररहित नम्र अशी ती पांचाली आश्रमात पोहोचताच त्यांना म्हणाली, 'मुनिवर्य, आपली शिष्या पांचाली आपणास अभिवादन करीत आहे. पांडवपत्नी द्रौपदी, आपण शांतियज्ञाला यावे अशी विनंती करत आहे. प्रत्येक जीवात्म्याला शांतता मिळावी, यासाठी भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्यावरून शांतीयज्ञाचे आयोजन करत आहोत. अन्यथा गत जीवात्म्यांना मुक्ती मिळणार नाही. आजवर पांडवांनी धर्माला अनुसरूनच प्रत्येक कार्य केले आणि ते कार्य श्रीकृष्णाला समर्पित केले.  मुनिराज, लहानपणापासून महामाता कुंतीदेवींनी स्वत:ला व पांडवांना प्रत्येक कर्म भगवान स्मरणात करण्याची सवय लावून घेतली आहे. इतकेच नव्हे, तर आपणापुढे उभा असलेला हा नश्वर देहसुद्धा सतत नामचिंतन करीत असतो आणि मुनिवर्य, 'नाम घेता वाट चाली, यज्ञ पावलो पावली' हे तर आपलेच वचन. यामुळे महामाता कुंतीच्या व त्यांच्या पुत्रसुनेच्या यज्ञांची संख्या कशी मोजणार?' एवढ्या संभाषणात 'मी' चा चुकूनसुद्धा उच्चार न झालेल्या व असंख्यात यज्ञ झाल्याची खात्री देणाऱ्या द्रौपदीला हसून मुनींनी होकार दिला.

पांचालीच्या नम्र आचरणाने आणि मधुर संभाषणाने शांतियज्ञ व्यवस्थितरित्या पार पडला. सर्व जीवात्म्यांना सदगती मिळाली. पांचालीच्या पुढाकाराने हे साध्य झाले. तिच्या ठायी एवढी विनम्रता आली, ती नामस्मरणामुळे आणि भगवंत भक्तीमुळे!  नामस्मरणाने अहंकार जातो व अहंकाररहित नामस्मरण जिवाला आध्यात्मिकदृष्ट्या उच्च पातळीवर नेते. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकांमध्ये लिहितात, 

रघुनायकावीण वाया शिणावे,
जनासारिखे व्यर्थ का वोसणावे,
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे,
अहंता मनी पापिणी ते नसो दे ।।श्रीराम।।

Web Title: Pandav Panchami 2022: Why did Lord Krishna ask the Pandavas to perform Shantyagya after victory in Kurukshetra? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.