Papmochani Ekadashi 2022 : पापमोचनी एकादशीला विष्णूंना 'ही' आठ फुले अर्पण करा : लेखिका सुधा मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 07:30 AM2022-03-28T07:30:00+5:302022-03-28T07:30:02+5:30

Papmochani Ekadashi 2022 : देवाच्या आपल्याकडून किती साध्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करता आल्या, तर आपण हर तऱ्हेच्या पापातून मुक्त का बरे नाही होणार? जाणून घ्या ती आठ पुष्प!

Papmochani Ekadashi 2022: Offer 'these' eight flowers to Vishnu on Papmochani Ekadashi: Author Sudha Murthy | Papmochani Ekadashi 2022 : पापमोचनी एकादशीला विष्णूंना 'ही' आठ फुले अर्पण करा : लेखिका सुधा मूर्ती

Papmochani Ekadashi 2022 : पापमोचनी एकादशीला विष्णूंना 'ही' आठ फुले अर्पण करा : लेखिका सुधा मूर्ती

Next

देवाची उपासना करत असताना आपण छोट्या छोट्या गोष्टींची बारकाईने तयारी करतो. जसे की, महादेवाला बेल, कृष्णाला तुळस, गणपतीला जास्वंद, देवीला केवडा, दत्तगुरुंना चाफा, तसे भगवान महाविष्णुंचे आवडते फुल कोणते, असे विचारले असता, तुम्ही चटकन उत्तर द्याल, कमळ! अगदी बरोबर. कमळ हे तर विष्णूंचे आवडते फुल आहेच, पण संतमंडळी म्हणतात त्याप्रमाणे, देव भावाचा भुकेला आहे. भक्ताचा सच्चा भाव त्याला अभिप्रेत आहे. मग आज पापमोचनी एकादशीनिमित्त भगवान महाविष्णूंची कृपादृष्टी मिळवण्यासाठी कोणती पुष्पे वाहिली पाहिजेत? सांगत आहेत, प्रख्यात लेखिका सुधा मूर्ती. 

प्रेम सुधेची मूर्ती असे सुधा मूर्ती यांचे वर्णन केले, तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांचे जीवन म्हणजे 'साधी राहणी, उच्च विचारसरणी'चे मूर्तीमंत उदाहरण. त्यांनी एकदा `कौन बनेगा करोडपती'च्या व्यासपीठावर आपल्या आजोबांकडून कृष्णभक्तीची कोणती शिकवण मिळाली, ते सांगितले. 

बालपणी सुधा मूर्ती यांना त्यांच्या आजोबांनी एक श्लोक शिकवला होता. त्यात, भगवान महाविष्णूंना प्रिय असलेली आठ पुष्पे कोणती, याची माहिती दिली होती. आजोबांनी अर्थासकट सांगितलेला श्लोक सुधा मूर्ती यांच्या बालमनावर ठसला. ती शिकवण आयुष्यभर आपल्या आचरणात आणून सुधा मूर्तींनी विष्णूभक्तीत कायमस्वरूपी आठ पुष्पे अर्पण केली. ती आठ पुष्पे कोणती, ते आपणही जाणून घेऊया.

अहिंसा प्रथमं पुष्पम् पुष्पम् इन्द्रिय निग्रहम् ।
सर्व भूतदया पुष्पम् क्षमा पुष्पम् विशेषत:।
ध्यान पुष्पम् दान पुष्पम् योगपुष्पम् तथैवच।
सत्यम् अष्टविधम् पुष्पम् विष्णु प्रसिदम् करेत।।

अर्थ : जाणते-अजाणतेपणी हिंसा न करणे, अर्थात अहिंसा, हे पहिले पुष्प, मनावर नियंत्रण ठेवणे हे दुसरे पुष्प, सर्वांवर प्रेम करणे हे तिसरे पुष्प, सर्वांना क्षमा करणे हे चौथे पुष्प, दान करणे, ध्यान करणे, योग करणे ही विशेष पुष्प आहेत. आणि नेहमी खरे बोलणे, सत्याची कास धरणे हे आठवे पुष्प आहे. जो भक्त भगवान महाविष्णूंना ही आठ पुष्पे अर्पण करतो, तो त्यांच्या कृपेस पात्र होतो. 

ही सर्व पुष्पे कुठे सापडतील? 

तर आपल्या देहरूपी वाटिकेत! या सर्व गोष्टी आपल्या वागणुकीशी निगडीत आहेत. म्हणून मोठे लोक नेहमी सांगतात, 'आचार बदला, विचार बदलेल.' कोणतीही कृती, विचारपूर्वक केली पाहिजे. आपले विचार चांगले असले, तर हातून वाईट काम, चुकीचे काम घडणारच नाही. कोणावर हात उगारणार नाही, अपशब्द बोलणार नाही, अतिरिक्त माया, संपत्ती गोळा करणार नाही, अनावश्यक गोष्टी साठवणार नाही, मनात कोणाबद्दल द्वेष ठेवणार नाही. कोणाही प्राणीमात्राचा, जीवजीवांचा दु:स्वास करणार नाही. ध्यान, दान, योग याबाबतीत सदैव तत्पर राहेन आणि शाळेतली शिकवण, म्हणजे `नेहमी खरे बोलेन.' 

देवाच्या आपल्याकडून किती साध्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करता आल्या, तर आपण हर तऱ्हेच्या पापातून मुक्त का बरे नाही होणार? ठरवून टाका मग, तुम्ही कोणते पुष्प अर्पण करणार?

Web Title: Papmochani Ekadashi 2022: Offer 'these' eight flowers to Vishnu on Papmochani Ekadashi: Author Sudha Murthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.