Papmochani Ekadashi 2023: हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे क्षालन करायचे असेल तर करा पापमोचनी एकादशीचे व्रत!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 07:00 AM2023-03-17T07:00:00+5:302023-03-17T07:00:01+5:30
Papmochani Ekadashi 2023: वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात, प्रत्येक एकादशीचे आगळे वेगळे महत्त्व आहे. पापमोचनी एकादशी व्रताने पापक्षालन कसे होते ते पाहू!
पापमोचनी एकादशी ही नावाप्रमाणे सर्व पापांचे नाश करणारी एकादशी आहे. हे व्रत सर्वांनी केले पाहिजे असे पुराणात म्हटले आहे. आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे परिमार्जन व्हावे यासाठी हे व्रत केले जाते. असे म्हणतात, कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, त्या परिस्थितीत हे व्रत भक्तिभावाने केले असता भगवंताची कृपा लाभते. शनिवारी १८ मार्च रोजी एकादशी आहे. या व्रताचे लाभ आणि महत्त्व जाणून घेऊ.
शास्त्रात एकादशी व्रताला अतिशय महत्त्व दिले आहे. हे व्रत केल्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहांचा दुष्परिणाम कमी होऊन चांगले आयुरारोग्य लाभते. कारण ही तिथी भगवान विष्णू यांची आवडती तिथी आहे. त्यामुळे हे व्रत करणाऱ्याला विष्णूंची कृपा प्राप्त होऊन चन्द्र, मंगळ, शनी आदी ग्रहांकडून होणाऱ्या विपरीत प्रभावापासून स्वतःचा बचाव करता येतो. या व्रताचा परिणाम शरीरावर आणि मनावर पडतो. एकादशीचे पवित्र व्रत केले असता, मनातील विकार नष्ट होतात. तसेच पापमोचनी एकादशी व्रत केले असता, आजवर घडलेल्या पापातून मुक्तता होते आणि मनावरील दडपण दूर होते. अजाणतेपणी झालेल्या चुकांची देवाकडे क्षमा मागून आयुष्याची नवी सुरुवात करता येते.
पूजा आणि विधी : फाल्गुन कृष्ण एकादशीला येणारी तिथी पापमोचनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या एकादशीला भगवान विष्णूंना पिवळे फुल वहावे आणि नवग्रहांची देखील पूजा करावी. दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी एकादशीचा उपास सोडावा. उपासाला फलाहार करावा, बाकी पदार्थ खाऊ नयेत. 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' हा भगवान महाविष्णूंचा जप करावा. तसेच विष्णू सहस्रनाम आणि नवग्रह स्तोत्र यांचे पठण किंवा श्रवण करावे.
पापमोचनी एकादशीचा शुभ मुहूर्त
एकादशी तिथि प्रारम्भ- १७ मार्च सकाळी १४. ०८ मिनिटांपासून
एकादशी तिथि समाप्त- १८ एप्रिल सकाळी ११. १४ मिनिटांपर्यंत
एकादशीचा उपास: एकादशी तिथी १७ मार्च रोजी सुरु होत असली तरी १८ मार्च चा सूर्योदय पाहणारी असल्यामुळे एकादशीचा उपास १८ तारखेलाच करावा. उपास शक्य नसेल तर फलाहार करावा. औषधांमुळे उपाशी राहणे शक्य नसेल तर भगवान विष्णूंची उपासना करावी. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, हा मंत्र जप करावा!