पालकांनो मुलं तुमचं ऐकत नाहीत? मग 'ही' चाणक्यनीती जरूर आजमावून पहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 03:55 PM2022-06-18T15:55:17+5:302022-06-18T15:56:19+5:30

योग्य वेळी दिलेलं योग्य वळण मुलांच्या मनाला आकार देतं आणि आयुष्यालाही! त्यासाठी लक्षात ठेवा पुढील तीन गोष्टी!

Parents, children are not listening to you? Then definitely try this 'Chanakyaniti'! | पालकांनो मुलं तुमचं ऐकत नाहीत? मग 'ही' चाणक्यनीती जरूर आजमावून पहा!

पालकांनो मुलं तुमचं ऐकत नाहीत? मग 'ही' चाणक्यनीती जरूर आजमावून पहा!

googlenewsNext

'अगर किसी बच्चे को खिलोना ना दिया जाए, तो वह कुछ देर तकी रोएगा, मगर संस्कार ना दिए जाए तो जिंदगीभर रोएगा।' मध्यंतरी हे सुंदर वाक्य वाचनात आले होते. भारतात संस्कार, मूल्य, परंपरा या गोष्टींना महत्त्व का आहे, याचे सार वरच्या एका वाक्यात एकवटले आहे. आपले आयुष्य, जडणघडण, वागणूक या सर्वांवर संस्कारांचा मोठा हातभार असतो. ओल्या मातीला योग्य वयात वळण दिले, तरच ती चांगला आकार देते. ही ओली माती म्हणजे बाल्य दशा. याच वयात मुलांना प्रेम, आपुलकी, राग, लोभ, आदर, नम्रता या गोष्टींचे वळण लावायचे असते.

दुर्दैवाने आज घरोघरी या गोष्टींचा अभाव दिसत आहे. 'आमचा मुलगा आमचे ऐकत नाही', ही बाब आजचे पालक हसत हसत सांगतात. परंतु हेच हसू उद्या पाल्य आणि पालकांच्या डोळ्यातले आसू बनतात. यासाठी आचार्य चाणक्य म्हणतात, पुढच्या पिढीच्या हाती देशाचे भवितव्य आहे. त्यांना योग्य रीतीने घडवणे हे आपले कर्तव्य आहे. याची जाणीव ठेवून काही बाबतीत पथ्य जरूर पाळा. 

वाईट वळण, वाईट सवयी लागायला वेळ लागत नाही. मनुष्य स्वभाव वाईट गोष्टी पटकन आत्मसात करतो. लहान मुले त्याला अपवाद कशी असतील? म्हणून त्यांना वाईट गोष्टी कळण्याआधी जगात चांगले काय आहे, याची ओळख करून देणे ही पालकांची जबाबदारी आहे. माळी ज्याप्रमाणे ऊन, वारा, पाऊस यांपासून आपल्या बागेची राखण करतो, रक्षण करतो, तशी राखण पालकांना करायला हवी. आपल्या घरची बाग हसरी, खेळती राहावी वाटत असेल, तर स्वतः जातीने लक्ष घातले पाहिजे.

मुलांवर प्रेम करावे, माया करावी परंतु अति लाड करू नये. साखर गोड असते, परंतु त्याचे अति सेवन केले तर मधुमेह होतो आणि मधुमेहाने शरीर निकामी बनते. म्हणून नात्यात साखरेचा गोडवा असावा. परंतु अति लाडाने मुलांचेच नुकसान होते. त्यांचा स्वभाव हट्टी बनतो. राग राग करून, आक्रस्ताळेपणा करून, रडून, चिडून एखादी गोष्ट लगेच मिळवता येते हा चुकीचा संदेश मुलांना जातो. मुलांचे लाड जरूर पूरवा. परंतु गरज ओळखा आणि त्यांनी मागितलेली वस्तू त्यांना दोन दिवसांनी नाहीतर दोन महिन्यांनी द्या. त्यांचा संयम वाढेल आणि मिळणाऱ्या वस्तूची किंमत कळेल. 

मोठयांप्रमाणे लहान मुलांनाही मान अपमान कळतो. म्हणून त्यांच्याकडून चूक झाली असता चारचौघात त्याला ओरडण्यापेक्षा समजवून सांगा आणि चूक मोठी असेल, तर वेळीच एक फटका द्या. वेळेवर मारलेला एक फटका आयुष्यभराची शिकवण देऊन जातो. मुलांना अपमान वाटला तरी चालेल, परंतु मोठ्या अपराधाची शिक्षा वेळीच द्यायला हवी आणि नंतर त्यांची कानउघडणी देखील करायला हवी. मुलांना केवळ मारून मुटकून वळण लावता येत नाही. त्यांना त्यांच्या कलाने घेत समजवावे लागते. परंतु, पालकांकडे तेवढा संयम हवा. हा समतोल नीट राखला, तर मुलांकडून भविष्यात मोठे अपराध घडणार नाही. चुकीच्या गोष्टी करताना मन धजावणार नाही. आई वडिलांबद्दल आदरयुक्त भीती वाटेल आणि तेवढेच प्रेमही कायम राहील. 

Web Title: Parents, children are not listening to you? Then definitely try this 'Chanakyaniti'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.