...तोच आनंदाच्या साम्राज्याचा राज्यधारी असतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 04:44 AM2020-05-19T04:44:06+5:302020-05-20T10:47:27+5:30

ही सत्ता त्याच्या आत्मबळावर कमवलेली असते, त्यामुळे इथे विचारांचा गोंधळ नसतो. तो खरा स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतो.

Parmarthi is the ruler | ...तोच आनंदाच्या साम्राज्याचा राज्यधारी असतो

...तोच आनंदाच्या साम्राज्याचा राज्यधारी असतो

googlenewsNext

- मोहनबुवा रामदासी

छंदोग्य उपनिषदात स्वानंद साम्राज्य उपभोगणाऱ्या माणसाला ‘स्वराट’ म्हणजे स्वत:चा राजा, अशी उपमा दिलेली आहे. देहबुद्धीच्या खोट्या आणि फसव्या ‘मी’ला बाजूला सारून, त्याची शक्ती क्षीण करून आत्मबुद्धीच्या ख-या ‘मी’ला स्वीकारतो, तोच खरा स्वत:च स्वत:चा स्वामी होतो. या त्याच्या स्वामित्वापुढे कोणाचीच सत्ता चालत नाही. ही सत्ता त्याच्या आत्मबळावर कमवलेली असते, त्यामुळे इथे विचारांचा गोंधळ नसतो. तो खरा स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतो. देहबुद्धीच्या तडाख्यातून निसटलेला आणि खोट्या दृष्यबंधनातून मोकळा झाल्याने तो स्वत:च्या साम्राज्यात अखंड स्वानंद उपभोगत असतो. त्याला त्याच्या स्वानंदाचा आनंद घेण्यासाठी कोणत्याही बाह्य साधनांची गरज नसते. मुळातच आनंदाचा पिंड घेऊन जन्माला आलेला हा जीव दु:खाच्या खाणीत कसा लोटला जातो? माणसाला स्वत:च्या गरजा माहिती असतात. त्या भागविताना तो पिढ्यान्पिढ्यांचा विचार करतो आणि खरे तर तो आनंदाच्या साम्राज्याचा राज्यधारी असतो; पण लाचारपणामुळे त्याची अवस्था भिका-याप्रमाणे होते. समाजात त्याच्यासारखा दु:खी तोच असल्याचे पाहावयास मिळते. परमार्थात हा स्वार्थ पाहणारा कधीच सुखी झालेला पाहायला मिळत नाही. नरदेहरूपी हे राज्यवैभव त्याला मिळालेले असूनही तो स्वार्थापायी स्वत:चा घात करून घेतो. स्वतंत्र असणारा जीव मायापाशात गुरफटल्याने परस्वाधीन झाला आहे. क्षणिक सुखाच्या आधीन झालेला जीव दु:ख विसरण्यासाठी व्यसनाधीन होतो आणि स्वत:चे व घरादाराचे भरून निघणार नाही अशा प्रकारचे नुकसान करून घेतो. म्हणून साधकाने स्वत:ची दिशा आणि मार्ग विवेकाने शोधावा! विवेक हीच खरी ईश्वरी शक्ती आत भरलेली आहे. त्या विवेक आणि विचाराने स्वत:चे साम्राज्य स्वत:च आबाधित ठेवावे. आंतरिक आत्मरूपी साम्राज्यातच तो खरा राज्यधारी असतो.

Web Title: Parmarthi is the ruler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.